संपादकीय

15 Aug सत्तेपेक्षा तत्त्व मोठं : राजाभाऊ वाजे यांच्या निष्ठेचा प्रवास

महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षांत अनेक अभूतपूर्व घडामोडी अनुभवल्या. सत्तेची समीकरणे बदलली, पक्ष फुटले, विचारधारा बदलल्या आणि अनेक नेत्यांनी आपल्या राजकीय भवितव्यासाठी वेगवेगळे मार्ग स्वीकारले. अशा काळात राजकारणातील निष्ठा, तत्त्व आणि शब्द यांची किंमत संपल्याची भावना सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली होती. पण याच काळात नाशिकच्या मातीतून एक असा नेता उभा राहिला, ज्याने दाखवून दिले की राजकारणात अजूनही शब्दाला किंमत आहे, निष्ठेला अर्थ आहे आणि तत्त्वांसाठी त्याग करण्याची तयारी असलेले लोक आजही अस्तित्वात आहेत. त्या नेत्याचे नाव म्हणजे खासदार राजाभाऊ वाजे.

राजाभाऊ वाजे यांच्या घराण्याला राजकारणाचा वारसा लाभलेला असला तरी त्यांना स्वतःला कधी राजकारणात यायचे नव्हते. त्यांचे आजोबा आमदार, आजी नगराध्यक्षा, तर वडील प्रकाशभाऊ वाजे हे सिन्नरच्या राजकारणातील प्रभावी ’किंगमेकर’ म्हणून ओळखले जात होते. मात्र राजाभाऊंचा दिवस शेतात, डेअरीत, व्यवसायात आणि लोकांच्या अडचणी सोडवण्यात जात होता. त्यांच्या कार्यालयात मदतीसाठी येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला त्यांनी कधी मतदार म्हणून पाहिले नाही; तर आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून आधार दिला. हीच त्यांची खरी ओळख बनली.
सन 2013 मध्ये कार्यकर्त्यांनी त्यांना अक्षरशः विनवून राजकारणात आणले. त्यांनी स्वतःहून राजकारणाची निवड केली नव्हती; उलट समाजाने त्यांना नेतृत्वाची जबाबदारी दिली होती. 2014 मध्ये हजारो कार्यकर्त्यांसह ते मातोश्रीवर गेले आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना एक प्रश्न विचारला, राजाभाऊ, किती दिवस शिवसेनेत राहणार? क्षणाचाही विलंब न करता राजाभाऊ म्हणाले, साहेब, जोपर्यंत तुम्ही आहात आणि जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत मी शिवसेनेतच राहणार. हा केवळ संवाद नव्हता; तो आयुष्यभर जपलेला शब्द होता.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत सिन्नरच्या जनतेने निवडणूक अक्षरशः हातात घेतली. राजाभाऊ वाजे यांना दणदणीत विजय मिळाला. आमदार झाल्यानंतर त्यांनी रस्ते, जलसंधारण, भूजल वाढ, जलयुक्त शिवार, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासावर भर दिला. सिन्नर तालुक्यात भूजल पातळी वाढविण्यासाठी केलेल्या कामाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री यांनी विधानसभेत अनेकदा घेतली. गावोगावी अभ्यासिका उभारून स्पर्धा परीक्षांची चळवळ उभी करण्यामागेही त्यांची दूरदृष्टी होती. त्यांनी सत्तेला प्रतिष्ठा म्हणून नव्हे, तर जबाबदारी म्हणून स्वीकारले.
2019 मध्ये अवघ्या दोन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. राजकीय भाषेत तो पराभव होता; पण जनतेच्या मनात तो विजयच होता. मतमोजणीनंतर अनेक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक भावुक झाले. विरोधात मतदान केलेल्या काही मतदारांनाही हळहळ वाटत होती. मात्र राजाभाऊ दुसर्‍याच दिवशी पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू झाले. त्यांच्यासाठी पदापेक्षा माणूस मोठा होता.
यानंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. स्थानिक राजकीय समीकरणे बदलली. पुढील निवडणुकीत जागा दुसर्‍या पक्षाला जाण्याची शक्यता असतानाही त्यांनी पक्ष बदलण्याचा विचार केला नाही. 2022 मध्ये शिवसेनेत ऐतिहासिक फूट पडली. अनेकांसाठी हा राजकीय संधीचा क्षण होता. पण राजाभाऊंसाठी तो दिलेल्या शब्दाची परीक्षा होती. उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द त्यांनी विसरला नाही. त्यांनी सत्तेपेक्षा निष्ठा निवडली.
पक्ष मोठ्या संकटात असतानाच 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर उमेदवारीची जबाबदारी सोपविण्यात आली. समोर सत्ताधारी पक्षाची ताकद, प्रचंड आर्थिक बळ, यंत्रणा आणि संसाधने होती. दुसर्‍या बाजूला राजाभाऊंकडे होते जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि अनेक वर्षांच्या जनसेवेची कमाई. मोठे प्रचारतंत्र नव्हते, कोट्यवधींच्या जाहिराती नव्हत्या; पण लोकांचा विश्वास होता. त्याच विश्वासाच्या बळावर त्यांनी लोकसभेची निवडणूक दणदणीत जिंकली.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले. त्यानंतर त्यांच्या कामकाजात अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. निधी, मंजुरी, बैठका आणि विविध विकासकामांच्या प्रक्रियेत अडथळे येत असल्याचे आरोप होत राहिले. तरीही त्यांनी संघर्षाचा मार्ग सोडला नाही. नाशिकसाठी रेल्वे, विमानसेवा, लॉजिस्टिक पार्क, गोदावरी संवर्धन, आरोग्य, पायाभूत सुविधा अशा अनेक विषयांवर त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला.
यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेत मोठी राजकीय घडामोड घडली. पक्षातील नऊपैकी सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतली. विविध माध्यमांतून दबाव, राजकीय चर्चा, आमिषे आणि अफवा यांचे वातावरण निर्माण झाले. राजाभाऊ वाजे यांचे नावही वारंवार चर्चेत आले. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या भूमिकेवर ठाम राहणे पसंत केले. त्यांच्याबाबत विविध प्रकारच्या राजकीय ऑफर्स आणि दबावाच्या चर्चा रंगल्या; पण त्यांनी त्या सर्वांवर मौन राखत आपल्या तत्त्वाशी तडजोड केली नाही.
याच काळात शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत देशभरातील माध्यमांसमोर निष्ठा काय असते, ती राजाभाऊ वाजे यांच्याकडून शिकावी, असे गौरवोद्गार काढले. पक्षातील घडामोडींमुळे भावुक झालेल्या राजाभाऊ वाजे यांच्या डोळ्यांतील अश्रूंनी अनेकांना स्पर्श केला. तो क्षण एका राजकीय नेत्याचा नव्हता; तर आपल्या विचारांशी आणि सहकार्‍यांशी भावनिक नाळ जपणार्‍या कार्यकर्त्याचा होता.
दिल्लीतील संसदीय कामकाज आटोपून ते नाशिक रोड रेल्वे स्थानकावर परतले, तेव्हा हजारो नागरिक, शिवसैनिक आणि विविध समविचारी पक्षांचे कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. ढोल-ताशे, फुलांची उधळण, घोषणांचा गजर आणि उत्स्फूर्त जनसागर यामधून जनतेने त्यांच्या निष्ठेचा गौरव केला. त्यानंतर झालेला नागरी सत्कार, देशभरात सोशल मिडिया, दैनिक, माध्यम यावर उसळलेला शुभेच्छा व गौरवाचा वारू हा केवळ एका खासदाराचा सत्कार नाही; तो तत्त्व, शब्द आणि जनविश्वासाचा सन्मान आहे.
राजाभाऊ वाजे यांना या सर्वाबद्दल विचारले असता ते अत्यंत साधेपणाने म्हणतात, मी काही वेगळं केलं असं मला वाटत नाही… मी तर फक्त माझं कर्तव्य पार पाडलं. कदाचित याच एका वाक्यात त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचं सार दडलं आहे. आजच्या व्यवहारप्रधान राजकारणात निष्ठा, साधेपणा आणि जनसेवा ही मूल्ये अजूनही जिवंत आहेत, याचा पुरावा म्हणून राजाभाऊ वाजे यांचे नाव घेतले जाते आणि कायम घेतले जाणार.

Principles Above Power: The Journey of Rajabhau Waje’s Loyalty

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

सिंहस्थात स्वयंसेवी संस्थांचे योगदान

- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…

15 hours ago

सिंहस्थानंतरही नाशिकच्या विकासाला चालना मिळणार : शेखर सिंह

- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…

15 hours ago

अफगाणिस्तानमधील 25 लाख मुली शिक्षणाविना!

ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…

15 hours ago

सुपर पॉवर सीएम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…

16 hours ago

शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या 2,421 पदांसाठी मेगाभरती

आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…

16 hours ago

भूसंपादनावरून महासभा गाजली

पंचवीस वर्षांपासून शेतकर्‍यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…

16 hours ago