जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत निवडीची प्रक्रिया
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण सभापतिपदी प्रा. शरद मोरे तर महिला-बालकल्याण समिती सभापतिपदी कोमल मेहरोलिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्थायी समिती सभागृहात गुरुवारी (दि. 8) दोन विशेष समित्यांच्या सभापती, उपसभापती पदाची निवडणूक विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (पीठासन अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता नाशिक महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी कोमल प्रताप मेहरोलिया व उपसभापतिपदासाठी चित्रा जगन्नाथ तांदळे तसेच शिक्षण समिती सभापतिपदासाठी शरद द्रौपदा चिंतामण मोरे व उपसभापतीसाठी सोनाली तुषार भंदुरे यांचे एकमेव अर्ज असल्याने त्यांची नियुक्ती केल्याची घोषणा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (पीठासन अधिकारी) यांनी केली. दोन्ही समित्यांच्या नवनियुक्त सभापती व उपसभापती यांना प्रमाणपत्र देत सत्कार करण्यात आला. दोन्ही समित्यांचे सभापती व उपसभापतींचा सत्कार महापौर हिमगौरी आहेर -आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, गटनेते श्याम बडोदे, सीमा ठाकरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका यांनी केला. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने नगरसचिव संजय नेरकर यांच्यासह किशोर कोठावळे, मुकेश बैरागी व नगरसचिव विभागाचे कर्मचारी कार्यरत होते.
दरम्यान, भाजपने दोन्ही समित्यांवर उच्च शिक्षित सभापती दिल्याने त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. शिक्षण सभापती मोरे व महिला-बालकल्याण सभापती मेहरोलिया हे दोन्हीही उच्च शिक्षित असल्याने त्यांचा फायदा या दोन्ही विभागांना होणार आहे.
आज तीन समित्यांची प्रक्रिया
गुरुवारी शिक्षण व महिला- बालकल्याण सभापतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी
(दि. 9) विधी, आरोग्य व शहर सुधारणा समितीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. या समित्यांचीही बिनविरोध निवडणूक होणार असून, केवळ औपचारिकता बाकी आहे.
शाळांसह विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य
शहरातील महापालिका शाळांची परिस्थिती सुधारण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला विशेष प्राधान्य दिले जाईल. मनपा शाळांमध्ये पटसंख्यावाढीसाठी प्रयत्न केले जातील. विद्यार्थीहितालाच प्रथम प्राधान्य असेल.
– प्रा. शरद मोरे, सभापती, शिक्षण समितीशहरातील महिला व बालकांसाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत, त्या माध्यमातून त्यांच्यासाठी जास्तीत जास्त काम केले जाईल. महिला सक्षमीकरणासह बालकांचा सर्वांगीण विकास साधण्याचा
प्रयत्न असेल.
– कोमल मेहरोलिया, सभापती, महिला व बालकल्याण समिती
Prof. More appointed Education Committee Chairman; Mehrolia appointed Women and Child Welfare Committee Chairman.