संपादकीय

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता ’पुणे तेथे गुन्हेगारांना काय उणे’, असे म्हणण्याची वेळ आली आहे. मागील महिन्यात वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या ’नीट’ परीक्षेच्या ’पेपरफुटी’मुळे राज्यात खळबळ उडाली होती. या प्रश्नपत्रिका पुण्यातीलच तीन ’पेपरसेटर्स’नी फोडल्याचे सीआयडी तपासात निष्पन्न झाले.
या ’कारनाम्या’च्या बातमीची शाई वाळत नाही तोच ’सुसंस्कृत’ पुणे पुन्हा एकदा ’विषारी दारूकांडा’मुळे बदनाम होऊन चर्चेत आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिस आयुक्तांना वाढत्या गुन्हेगारीबद्दल तीव्र चिंता व्यक्त करणारे पत्रही पाठवले आहे. अर्थात आयुक्तांनी त्याचा इन्कार केला आहे. मागच्या आठवड्यात पिंपरी चिंचवड, हडपसर, फुगेवाडी, दापोडी या भागांत विषारी दारू प्यायल्याने 22 तळीरामांनी आपला जीव गमावला.
ही दुर्घटना घडल्यानंतर नित्यनियमाप्रमाणे आपले पोलिस खाते
आणि केवळ दिवाळी-दसर्‍याला 2/4 छापे टाकून फक्त खवा व मावा जप्त करून बदनाम झालेले अन्न व औषध प्रशासन खाते खडबडून जागे झाले. पुण्याच्या दुर्घटनेनतर मात्र अपेक्षेप्रमाणे छापेमारीच्या बातम्यांचा ’रतीब’च घातला जात आहे.
ज्या वेळेस पुण्यात हे ’कांड’ घडले. तेव्हाच मनात आले की, उद्यापासून ’अवैध व्यवसायांवरील धाडसत्रा’च्या बातम्या झळकू लागतील. कारण आपल्या व्यवस्थेला ’वरातीमागून घोडे’ अशी सवयच जडलेली आहे. अन्न व औषध प्रशासन या खात्याचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यात अवैधपणे चालणार्‍या व्यवसायांवर धाडी टाकण्याचे आदेश जारी केले. पुण्याची दुर्घटना घडल्यानंतर ही मोहीम तीव्र करण्यात आली. ’अजगरा’सारख्या सुस्त पडलेल्या अन्न व औषध प्रशासन खात्याला ’चित्त्या’सारखा चपळ व तडफदार अधिकारी लाभल्याने खाते मरगळ झटकून वार्‍याच्या वेगाने कामाला लागले. या मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलिसांनी शहरातील द्वारकानगर परिसरात सुरू असलेल्या बनावट देशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर थाड टाकली. यात रसायने, बाटल्या, लेबल, कच्चा माल आणि 11 लाखांची रोकड, असा सुमारे 14.37 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. कळवण तालुक्यातील दह्याणे शिवार आणि विविध भागांत छापे टाकून 2200 लिटर हातभट्टीची दारू नष्ट करण्यात आली. 82,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सोलापूर येथे हातभट्टीची दारू आणि 23.56 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अकलूज येथील गांधी चौकातील दोन दुकानांवर धाड टाकून दोन लाखांचा भेसळयुक्त मावा जप्त केला. दोन्ही दुकाने सील करून मालकांवर प्रतिबंधित विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व खेड तालुक्यांत वेगवेगळ्या पाच ठिकाणांवर छापे टाकत गुटखा, पानमसाला आणि इतर संशयित अन्नपदार्थ असा सुमारे अकरा लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. कोल्हापूर येथे अवैधरीत्या देशी दारू वाहतूक करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 13.50 लाखांचा माल हस्तगत केला. कळंब, नवीन वाशी नाका या भागांतून वाहतूक केली जाणारी 6.5 लाखांची दारू ताब्यात घेत, एकाला अटक केली आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार, केज, पाटोदा, माजलगाव आदी गावांत छापेमारी करत, गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त दूध, पनीर, मसाले, क्रिम, लस्सी, सोयाबीन तेल व तूप, केमिकलने पिकवलेले आंबे, बनावट व मुदतबाह्य औषधे अशा प्रकारचा लाखांचा माल जप्त केला आहे.
अशा प्रकारे राज्यातील विविध जिल्ह्यांत आठवड्यात अनेक ठिकाणी छापे टाकत सुमारे 102 भेसळ करणार्‍या आणि अवैध व्यवसाय करणार्‍यांना गजाआड करण्यात आले. 25 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. जवळपास 86 दुकानांना टाळे ठोकण्यात आले आहे. 24 तारखेला एकाच दिवसात 40 कारवाया होऊन 27 दुकाने सील करण्यात आली. आजपर्यंतचा हा अन्न व औषध प्रशासन खात्याचा विक्रमच म्हणावा लागेल. अर्थातच या विक्रमाचे सर्व श्रेय शिस्तप्रिय, धडाकेबाज आणि प्रामाणिक अधिकारी मुंढे यांनाच द्यावे लागेल. त्यांनी आता आपली वक्रदृष्टी तंबाखूजन्य पदार्थांवर टाकली आहे. तंबाखू, गुटखा, पानमसाला निर्माते, त्याची जाहिरात करून दिशाभूल करणार्‍या संस्था आणि जाहिरातीत काम करणारे अभिनेते यांना तसा इशाराही दिला आहे. एकीकडे विविध जिल्ह्यांत छापेमारीचा धडाका सुरू असताना, सातारा जिल्ह्यातील पाटण येथील काही लाचखोर पोलिसांनी मात्र या मोहिमेला काळिमा फासण्याचे कृत्य केले आहे.
पाटण तालुक्यात मल्हारपेठ पोलिसांनी एका गुटखा विक्रेत्याकडे छापा टाकत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गुटखा जप्त केला होता. पण त्यांनी या कारवाईची कोणतीही माहिती आपल्या वरिष्ठांना दिली नाही. जप्त केलेला लाखो रुपयांचा गुटखा व्यापाराला परत देण्यासाठी आठ लाखांची लाच घेतली गेली. याची कुणकुण वरिष्ठ अधिकार्‍यांना लागताच त्यांनी माहिती घेऊन चौकशीलाही सुरुवात केली आहे. सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याशी खेळणार्‍या ’गुटखामाफिया’ला अभय देणार्‍या व मोहिमेला कलंक फासणार्‍या लाचखोर पोलिसांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. एखाद्या घडलेल्या दुर्घटनेनतर पुन्हा तिची पुनरावृत्ती होऊ नये, याची प्रामाणिकपणे काळजी घेईल तर ते प्रशासन कसले?

‘Race session’ should not be just ‘show’…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

6 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत…

2 days ago

सौर कृषिपंपांमध्ये महाराष्ट्राची विक्रमी झेप

देशात सर्वाधिक 10 लाखांचा टप्पा गाठला नाशिक : प्रतिनिधी सौर कृषिपंपांमध्ये विश्वविक्रम करणार्‍या महाराष्ट्राने सर्वाधिक…

2 days ago