वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’

वेबविश्वाला हादरवून टाकणारा ‘रानबाजार’
‘रेगे’, ‘ठाकरे’ असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘रानबाजार’ असे नाव असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनीने केली असून नुकतेच या वेबसिरीजचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. 
या वेबसिरीजबद्दल दिग्दर्शक अभिजित पानसे म्हणतात, ” आज सर्वांच्या हातात बघायला ग्लोबल कॅान्टेन्ट आहे तसं पाहिलं तर भाषेचा अडथळा कधीच पार झालाय. त्यामुळे एका सशक्त विषयाची मांडणी उत्तमरीत्या केली तर ती निश्चितच लोकांना आवडेल, सर्वदूर पोचेल असा विश्वास मला आणि अक्षय ला वाटला. आणि मग मराठीतल्या सर्वात सर्वार्थाने मोठ्या अशा ‘रानबाजार’ ची निर्मिती झाली. यात राजकारण आहे, गुन्हेगारी आहे, याशिवाय थरारही आहे. अशा काही गोष्टींवर भाष्य करण्यात आले आहे, ज्या कदाचित आधी घडून गेल्या आहेत. हा एक वादग्रस्त आणि बोल्ड विषय आहे. अनेक गोष्टी ‘रानबाजार’ पाहिल्यावरच उलगडतील. जाणकारांच्या मते विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आतापर्यंतच्या कॅान्टेन्टमध्ये हा सर्वोत्कृष्ट कन्टेंन्ट असणार आहे.” 
प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” यापूर्वी मी अभिजित पानसेंचे काम पाहिले आहे. आतापर्यंत त्यांनी जे विषय हाताळले आहेत; त्याला तोड नाही. ज्यावेळी त्यांनी मला ‘रानबाजार’विषयी सांगितले, त्याचवेळी मी या प्रोजेक्टचा भाग होण्याचा निर्णय घेतला. अतिशय थरारक कथानक असलेल्या या वेबसिरीजमध्ये कलाकारही तितक्याच ताकदीचे आहेत. आजपर्यंत ओटीटीवर अशी वेबसिरीज कधीच प्रदर्शित झाली नसेल. इतका दमदार आशय यात पाहायला मिळणार आहे. दहा भागांची ही वेबसिरीज प्रत्येक वेळी एका अशा वळणावर येऊन थांबणार आहे, जिथे प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचेल. 
प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत रावण फ्युचर प्रॉडक्शन्स, अभिजित पानसे आणि अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ ही वेबसिरीज २० मे पासून  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *