संपादकीय

निवृत्ती : पूर्णविराम नव्हे, आयुष्याच्या दुसर्‍या सूर्योदयाची सुरुवात

दरवर्षी 1 जून ही तारीख आली की सरकारी कार्यालये, बँका, शैक्षणिक संस्था, उद्योग-व्यवसाय आणि विविध कार्यालयांत निरोप समारंभांची लगबग सुरू होते. साधारणपणे 1980 पूर्वी जन्मलेल्या अनेकांच्या शालेय दाखल्यांवर 1 जून हीच जन्मतारीख नोंदवली गेली. त्या काळी ग्रामीण भागात जन्मनोंदींची व्यवस्था आजइतकी काटेकोर नव्हती. त्यामुळे आजही दरवर्षी 31 मे आणि 1 जूनच्या सुमारास सेवानिवृत्ती घेणार्‍यांची संख्या मोठी असते.
या निरोप समारंभांत अनेक भावना एकत्र येतात. भाषणांमध्ये अनेकदा सल्ले दिले जातात. आता आराम करा, देश फिरा, नातवंडांमध्ये रमून जा, समाजकार्यात सहभागी व्हा. पण या सर्व शुभेच्छांमागे एक प्रश्न कायम उभा राहतो, निवृत्ती म्हणजे खरोखरच आपल्या कार्याचा शेवट असतो का?
आपल्या समाजाने निवृत्तीची व्याख्या अनेक वर्षे चुकीच्या पद्धतीने केली. नोकरी संपली म्हणजे आयुष्याचा सक्रिय टप्पा संपला, अशी धारणा रूढ झाली. साठ वर्षांनंतरचा काळ म्हणजे केवळ शारीरिक क्षीणता, आजारपण आणि घराच्या चौकटीत राहण्याचा काळ, अशी मानसिक चौकट तयार झाली. पण बदलत्या काळात ही व्याख्या वेगाने बदलताना दिसत आहे. आज निवृत्ती ही पूर्णविरामाची नव्हे, तर स्वल्पविरामाची अवस्था ठरत आहे. खरे पाहता, निवृत्ती ही माणसाला आयुष्यभराच्या धावपळीनंतर मिळालेली सर्वांत मोठी भेट असते.वेळेचे स्वातंत्र्य. नोकरी, व्यवसाय, संसार व जबाबदार्‍यांच्या गर्दीत अनेक स्वप्ने अपूर्ण राहिलेली असतात. निवृत्ती या सर्व स्वप्नांना नव्याने पंख देते. आयुष्यभर कमावलेल्या यशाला अर्थपूर्णतेत रूपांतरित करण्याची ही सुवर्णसंधी असते.
न्यूरोसायन्सच्या संशोधनानुसार मानवी मेंदू स्थिर नसतो. आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर नवीन गोष्टी शिकल्या, नवीन अनुभव घेतले किंवा नवीन कौशल्ये आत्मसात केली तर मेंदूमध्ये नवीन न्यूरल पाथ-वे तयार होतात. या प्रक्रियेला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात. ही क्षमता स्मृतिभ्रंश आणि अल्झायमर यांसारख्या आजारांविरुद्ध संरक्षण देण्यास मदत करते. म्हणूनच निवृत्तीनंतर सतत शिकत राहणे, वाचन करणे, चर्चा करणे आणि समाजात सक्रिय राहणे, हे आरोग्यदायी जीवनाचे सूत्र मानले जाते. आपल्या प्राचीन वानप्रस्थ परंपरेतही व्यक्ती जीवनाच्या उत्तरार्धात समाजासाठी अधिक वेळ देत असे. आपल्या अनुभवांचे, ज्ञानाचे आणि मूल्यांचे समाजहितासाठी समर्पण करणे हेच वानप्रस्थाचे सार होते.
आजी-आजोबांचे जीवनज्ञान आणि नातवंडांची जिज्ञासा यांचा संगम समाजाला नवी दिशा देऊ शकतो. तरुण पिढीकडे ऊर्जा आहे, तंत्रज्ञान आहे, स्वप्ने आहेत, पण त्या ऊर्जेला योग्य दिशा देणारा अनुभव आवश्यक असतो. ज्येष्ठ नागरिक हीच भूमिका पार पाडू शकतात. तामिळनाडूमधील बहात्तरवर्षीय सेल्वामणी यांनी निवृत्तीनंतर इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे शिक्षण सुरू केले. दररोज पन्नास किलोमीटरचा प्रवास, घरातील जबाबदार्‍या आणि पत्नीची सेवा सांभाळत ते महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून उपस्थित राहतात. ध्येय जिवंत असेल तर वय कधीच अडथळा ठरत नाही.
केरळच्या कात्यायनी अम्मा यांनी शहाण्णवाव्या वर्षी साक्षरता अभियानाच्या परीक्षेत 98 टक्के गुण मिळवून आश्चर्यचकित केले. उद्योगपती बी. डी. गरवारे यांनी निवृत्तीनंतर शिक्षण आणि समाजसेवेच्या क्षेत्रात योगदान दिले. मराठी वाचकांसाठी प्रेरणेचे आणखी एक मोठे उदाहरण म्हणजे अच्युत गोडबोले. त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी सॉफ्टवेअर क्षेत्रातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. अनेकांसाठी हा आराम करण्याचा काळ असता, पण गोडबोले यांनी तो सर्जनशीलतेचा काळ बनवला. त्यांनी स्वतःला लेखनाला वाहून घेतले. बोर्डरूम, किंमत, मनात, किमयागार, झपाटलेला, मनकल्लोळ यांसारख्या पुस्तकांनी मराठी साहित्यविश्व समृद्ध केले. आज पंच्याहत्तराव्या वर्षातही ते तितक्याच जोमाने लेखन करत आहेत. ही उदाहरणे सांगतात की, निवृत्ती म्हणजे निष्क्रियता नव्हे. ज्येष्ठ नागरिक केवळ स्वतःचे जीवन समृद्ध करत नाहीत, तर समाजालाही अधिक सक्षम बनवतात. ते मार्गदर्शक, शिक्षक, सल्लागार, स्वयंसेवक, लेखक, पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते किंवा उद्योजक अशा विविध भूमिकांमधून योगदान देऊ शकतात.
आज गरज आहे ती समाजानेही निवृत्तीच्या संकल्पनेकडे नव्या नजरेने पाहण्याची. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या क्षमतांनुसार योगदान देण्यासाठी व्यासपीठे निर्माण करणे आवश्यक आहे. शिक्षण, पर्यावरण, ग्रामीण विकास, आरोग्य, संस्कृती, वाचन चळवळी आणि सामुदायिक नेतृत्व यांसारख्या क्षेत्रांत त्यांचा अनुभव अमूल्य ठरू शकतो. निवृत्ती हा जीवनाचा शेवट नसून दुसर्‍या
सूर्योदयाची सुरुवात आहे. हा तो काळ आहे, जेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्त्वातील दडलेले रंग पुन्हा जगासमोर आणू शकतो.

Retirement : Not a complete end, but the beginning of another sunrise in life

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

3 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

3 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

3 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

3 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

4 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

4 hours ago