सिन्नर : प्रतिनिधी
येथील माळेगाव एमआयडीसीतील एका कंपनीतून तब्बल तीन टन व्हे प्रोटीन पावडर गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. 60 लाख 27 हजार रुपये किमतीच्या या पावडरच्या 121 बॅगांचा अपहार झाल्याची तक्रार कंपनी व्यवस्थापनाने केली आहे. याप्रकरणी कंपनीतील कर्मचारी आणि माथाडी कामगार अशा 13 जणांविरुद्ध मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनरल मिल्स प्रा. लि. कंपनीचे असिस्टंट मॅनेजर रावसाहेब रामदास माकोणे (वय 41, रा. चेहेडी पंपिंग) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. माळेगाव एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ए-82 येथील सिटीझन इंटरनॅशनल कंपनीत 29 ऑगस्ट ते 4 ऑक्टोबरदरम्यान हा प्रकार घडला. प्रत्येकी 25 किलो वजनाच्या 121 बॅगा, असे एकूण तीन हजार 25 किलो व्हे प्रोटीन कॉन्सन्ट्रेट पावडर गायब झाल्याचे फिर्यादीत
म्हटले आहे.
याप्रकरणी ऑपरेटर अनंत फकिरा सानप (रा. दोडी बु.), साफसफाई कर्मचारी सुदाम सूर्यभान गोराडे (रा. मनेगाव), माथाडी कामगार प्रेम सुनील ससाणे, दीपक भीमराव गवई, विठ्ठल उद्धव ढाकणे, परशुराम निजाबा गुट्टे, विकास गंगाधर राम, राहुल जयराम भारती, राहुल अशोक ससाणे, ज्ञानेश्वर सूर्यभान गोंधळे, रामभाऊ गंगाधर गुट्टेे (सर्व रा. ससाणे मळा, माळेगाव), संदीप बाळू पवार (रा. गवळीवाडा, सिन्नर) आणि किरण राजाराम बिन्नर (रा. हिवरे, ता. सिन्नर) अशा 13 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यातील एका व्यक्तीने माल चोरल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मुसळगाव एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Rs 60 lakh worth of powder stolen in Malegaon MIDC; 13 individuals under the scanner