अल्पवयीन मुलीचाही विनयभंग; गुन्हा दाखल
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
पैसे परत देण्याच्या बहाण्याने महिलेला लॉजवर बोलावून तिच्या फोटोद्वारे बदनामी करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचा, तसेच तिच्या दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विकी शिराळ (वय 28) याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेकडून वेळोवेळी घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने तिला नाशिकरोड येथील साईशक्ती लॉजवर बोलावले. तेथे तिचे फोटो भावाला आणि वडिलांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतरही आरोपीने धमकावून महिलेच्या घरी तसेच स्वतःच्या घरी तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी महिला घरी नसल्याची संधी साधून आरोपीने तिच्या दहा वर्षीय मुलीशी अश्लील कृत्य केले. मुलगी रडू लागल्याने आरोपी तेथून
पळून गेला.
याबाबत महिलेने जाब विचारला असता, आरोपीने ही बाब कोणाला सांगितल्यास मुलींना शाळेतून गायब करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी पैसे देण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेला पुन्हा स्वतःच्या घरी बोलावले आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. याबाबत पतीला सांगितल्यास त्यालाही खोट्या प्रकरणात अडकविण्याची
धमकी दिली.
सततच्या धमक्या आणि अत्याचाराला कंटाळून अखेर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार विकी शिराळ याच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नेहते करीत आहेत.
Woman subjected to repeated abuse under threat of defamation