पाणीपुरवठ्यासाठी कृषी फीडरचा भार स्वतंत्र करा

आ. कोकाटे यांचे महावितरणला निर्देश; पंप वारंवार बंद पडण्यामागील तांत्रिक दोष दूर करा

सिन्नर : प्रतिनिधी
कडवा पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग स्टेशनवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिन्नर शहराच्या पाणीपुरवठ्याचे गणित बिघडत आहे.व्होल्टेजमधील चढउतार आणि तीन फेजमधील असंतुलनामुळे पंपांच्या मोटारी बंद पडण्याची समस्या निर्माण होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार माणिकराव कोकाटे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना कृषी फीडरचा विद्युत भार स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरवर वर्ग करण्यासह तातडीने तांत्रिक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. साकूर फाटा येथील वीज उपकेंद्रात झालेल्या बैठकीत कडवा आणि एसएमबीटी पंपिंग स्टेशनवरील वीजपुरवठ्याच्या समस्येवर चर्चा करण्यात आली.
कडवा पाणीपुरवठा योजनेच्या पंपिंग स्टेशनला वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, व्होल्टेजमध्ये चढ-उतार होणे आणि तीन फेजमध्ये असंतुलन निर्माण होणे, या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पंपांच्या मोटारींवर अतिरिक्त ताण येतो. परिणामी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित होऊन पंप बंद पडतात आणि शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. ही समस्या दूर करण्यासाठी साकूर फाटा येथील वीज उपकेंद्रात महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेण्यात आली. आमदार माणिकराव कोकाटे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभाग घेतला. कृषी फीडरचा विद्युत भार स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरवर वर्ग करणे, पंपिंग स्टेशनवरील विद्युत भाराचे योग्य व्यवस्थापन करणे आणि व्होल्टेज स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. बैठकीस नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, गटनेते मनोज देशमुख, पाणीपुरवठा सभापती पंकज मोरे, बांधकाम सभापती उदय गोळेसर, नगरसेवक अ‍ॅड. पंकज जाधव, अमोल झगडे, शुभम वारुंगसे, सागर कोथमिरे, सुनील खोळंबे, अमोल कासार, लोकेश धनगर, अक्षय कानडी आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता झटकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महावितरणने विद्युत भाराचे विभाजन, व्होल्टेजची स्थिरता आणि तीन फेजमधील संतुलन याबाबत आवश्यक कार्यवाही करावी. या उपाययोजनांमुळे पंप बंद पडण्याच्या समस्येत कितपत फरक पडतो, याचा आढावा घेण्यात येणार आहे.

वीजपुरवठ्यातील तांत्रिक त्रुटी दूर करा

पंप वारंवार बंद पडत असल्याने सुरक्षा यंत्रणेत बदल करण्याऐवजी वीजपुरवठ्यातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासंदर्भात सुचविण्यात आले. ट्रान्सफॉर्मरवरील अतिरिक्त ताण कमी करून तीन फेजमधील संतुलन राखणे आणि व्होल्टेज स्थिर ठेवणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगितले. नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांनीही पंपिंग यंत्रणा सुरक्षित ठेवून पाणीपुरवठ्यातील व्यत्यय टाळण्यासाठी वीजपुरवठा स्थिर आणि संतुलित ठेवण्याची गरज व्यक्त केली. कृषी फीडरचा भार स्वतंत्र केल्याने पाणीपुरवठा योजनेवरील ताण कमी होण्यासह शेतकर्‍यांच्या वीजपुरवठ्याचे नियोजन सुधारण्यासही मदत होऊ शकते, असेही ते म्हणाले.

Separate the load of agricultural feeders for water supply.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *