घटस्थापनेने उत्सवाची मंगलमय सुरुवात; पहिल्या माळेला गर्दी
सिडको : प्रतिनिधी
नाशिकचे अतिप्राचीन ग्रामदैवत आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संस्थान कालिकादेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी (दि. 11) पहाटे अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी विश्वस्तांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती. मंगल सनई-चौघड्याचे मंजुळ स्वर, मंत्रोच्चार, देवीच्या जयघोषाने दुमदुमलेला मंदिर परिसर आणि भक्तांच्या मनातील श्रद्धाभाव यामुळे संपूर्ण वातावरण शक्तीच्या उपासनेत न्हाऊन निघाले.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते श्री कालिका देवीचा महाभिषेक, महापूजा आणि महाआरती करण्यात आली. या धार्मिक विधींमुळे नवरात्रोत्सवाच्या उत्साहात भर पडली.
खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनीही नवरात्रीच्या पहिल्या माळेला कालिकादेवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्या दिल्ली येथे महत्त्वाच्या बैठकीसाठी रवाना झाल्या. नवरात्रीची पहिली माळ ही आदिशक्तीच्या उपासनेचा शुभारंभ मानली जाते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या प्रतिपदेला नवदुर्गेचे प्रथम स्वरूप असलेल्या माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. हिमालयाची कन्या म्हणून ओळखल्या जाणार्या शैलपुत्री देवीच्या पूजनातून भक्ती, सामर्थ्य, स्थैर्य आणि नवचैतन्याचा संदेश दिला जातो. नऊ दिवस चालणार्या या उत्सवात देवीच्या विविध रूपांची आराधना करून सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. पहिल्या माळेला घटस्थापना करण्यामागेही विशेष धार्मिक महत्त्व आहे. घट हा मांगल्य, समृद्धी आणि चैतन्याचे प्रतीक मानला जातो.
विधिवत घटस्थापना करून देवीचे आवाहन केले जाते आणि पुढील नऊ दिवसांच्या शक्ती उपासनेला प्रारंभ होतो. त्यामुळे नवरात्रीची पहिली माळ हा केवळ उत्सवाचा पहिला दिवस नसून भक्तांच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित करणारा आणि आध्यात्मिक ऊर्जेची जाणीव करून देणारा मंगल क्षण मानला जातो. कालिकादेवी मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. देवीचे दर्शन सुलभतेने आणि सुरक्षितपणे घेता यावे, यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांना कमी वेळेत दर्शन घेता यावे, यासाठी तत्काळ दर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. नवरात्रोत्सवात देवीच्या चरणी अखंड श्रद्धेने ज्योत प्रज्वलित करण्याला विशेष महत्त्व असते. त्यानुसार दिवसभर विविध देवी मंदिरांचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि देवीभक्त वाजतगाजत कालिका देवी मंदिरात दाखल होत होते.
देवीच्या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात ज्योत प्रज्वलित करण्यासाठी येणार्या भाविकांमुळे मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. प्रत्येकाच्या चेहर्यावर भक्तिभाव, मनात देवीच्या दर्शनाचे समाधान आणि नवरात्रोत्सवाच्या प्रारंभाचा आनंद दिसत होता.
रात्री पाथर्डी येथील गोंधळी समाजाच्या वतीने कालिकादेवी मंदिरात पारंपरिक जागर व गोंधळाचा कार्यक्रम सादर करण्यात आला. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतील गोंधळ हा देवीच्या उपासनेचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. पारंपरिक वाद्यांचा निनाद, देवीचे गजर आणि गोंधळी समाजाच्या सादरीकरणातून या प्राचीन धार्मिक परंपरेचे दर्शन घडले. दिवसभरातील पूजाविधी, भजनसेवा आणि रात्रीच्या जागरण-गोंधळामुळे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता भक्तिमय वातावरणात झाली.
श्रद्धा, परंपरा आणि सामूहिक भक्तिभाव यांचा सुंदर संगम साधणार्या कालिकादेवी मंदिरातील नवरात्रोत्सवाच्या प्रारंभाने नाशिक शहरात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील नऊ दिवस देवीच्या दर्शनासाठी, पूजाअर्चेसाठी आणि विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे.
महिलांच्या भजनातून देवीचरणी सेवा
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध महिला भजनी मंडळांनी भक्तिगीतांचे सादरीकरण करून देवीच्या चरणी आपली सेवा अर्पण केली. भजनांच्या स्वरांनी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. देवीची स्तुती करणारी पदे, पारंपरिक भजने आणि सामूहिक नामस्मरण यामुळे भाविकांना आध्यात्मिक समाधानाचा अनुभव मिळाला.
Sharad Navratri festival begins at Kalika Temple