ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन

पुणे : मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि लोककलेच्या क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचे आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पुण्यातील शास्त्रीनगर, येरवडा येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वातील एका अष्टपैलू कलावंताचा प्रवास थांबला असून, चित्रपटसृष्टीसह लावणी आणि रंगभूमीच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मधू कांबीकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज सायंकाळी चार वाजेपर्यंत शास्त्रीनगर, येरवडा येथे ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे मानलेले बंधू शाहीर दादा पासलकर यांनी दिली.

नृत्य करताना कोसळल्या; प्रकृतीला गंभीर वळण
२०१६ मध्ये मराठी रंगभूमीशी संबंधित एका कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधू कांबीकर यांना अचानक चक्कर आली आणि त्या कोसळल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून त्या गंभीर आरोग्यसमस्यांचा सामना करत होत्या, अशी माहिती शाहीर दादा पासलकर यांनी दिली.

‘शापित’ चित्रपटातून मिळाली विशेष ओळख
मधू कांबीकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केले. राजदत्त दिग्दर्शित ‘शापित’ या चित्रपटामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. त्यानंतर ‘राघू मैना’, ‘हेच माझं माहेर’, ‘एक होता विदूषक’, ‘रावसाहेब’, ‘झपाटलेला’, ‘झपाटलेला २’, ‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी’, ‘मला घेऊन चला’, ‘येऊ का घरात’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘धोंडी धोंडी पाणी दे’, ‘डेबू’, ‘संत गाडगे महाराज’, ‘संघर्ष जीवनाचा’ आणि ‘आभ्राण’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

विशेषतः ‘एक होता विदूषक’मधील त्यांची भूमिका, ‘झपाटलेला’मधील लक्ष्याच्या आईची व्यक्तिरेखा आणि ‘डेबू’ चित्रपटातील संत गाडगे महाराज यांच्या आईची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. गंभीर, भावनिक तसेच विनोदी आशयाच्या भूमिकांमध्येही त्यांनी आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले.

हिंदी आणि गुजराती चित्रपटांतही उमटवला ठसा
मधू कांबीकर यांनी केवळ मराठी चित्रपटांपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी काम केले. ‘हम दोनों’, ‘सातवाँ आसमान’, ‘अपनापन’, ‘यशवंत’ आणि ‘शोला और शबनम’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. गुजराती चित्रपट ‘साद’मधील त्यांच्या अभिनयाचेही कौतुक झाले.

रंगभूमीवरील समर्थ अभिनेत्री

चित्रपटांबरोबरच मधू कांबीकर यांनी रंगभूमीवरही विविध भूमिका साकारल्या. ‘पुत्रकामेष्टी’, ‘पेईंग गेस्ट’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘आकाश पेलताना’, ‘सूर राहू दे’, ‘लावणी भुलली अभंगाला’, ‘आमदार सौभाग्यवती’, ‘फुलवंती’ आणि ‘सखी माझी लावणी’ या नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची आणि रंगभूमीवरील अनुभवाची प्रचिती दिली.

लोकनाट्य, तमाशा आणि पारंपरिक लावणीच्या सादरीकरणातून त्यांनी लोककलेशी असलेले नाते जपले. दादू इंदुरीकर यांच्या ‘गाढवाचं लग्न’, ‘विच्छा माझी पुरी करा’ आणि ‘मुजरा घ्या सरकार’ यांसारख्या लोकनाट्यांशीही त्यांचे नाव जोडले गेले.

‘सखी माझी लावणी’मधून पारंपरिक कलेचे जतन
मधू कांबीकर यांचे लावणीवरील प्रेम केवळ सादरीकरणापुरते मर्यादित नव्हते. पारंपरिक लावणीचा इतिहास, तिची सांस्कृतिक परंपरा आणि तिचे अस्सल स्वरूप पुढील पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ‘मधुप्रीतम’ या संस्थेच्या माध्यमातून ‘सखी माझी लावणी’ हा कार्यक्रम सादर करून त्यांनी पारंपरिक लावणीच्या जतन आणि संवर्धनासाठी योगदान दिले.

दूरदर्शन मालिकांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला
चित्रपट आणि नाटकांबरोबरच त्यांनी दूरदर्शन मालिकांमध्येही काम केले. ‘होळी रे होळी’, ‘सर्जा राजा’, ‘वैभव’, ‘श्रावणधारा’ आणि ‘मुक्ती’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांशी नाते जोडले.

पुरस्कारांनी गौरवलेली कारकीर्द
मधू कांबीकर यांना त्यांच्या अभिनयासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य चित्रपट पुरस्कारांसह विविध सन्मानांनी गौरवण्यात आले. ‘हेच माझं माहेर’, ‘रावसाहेब’, ‘आई तुळजाभवानी’ आणि ‘संघर्ष जीवनाचा’ या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाला विशेष दाद मिळाली. गुजराती चित्रपट ‘साद’मधील अभिनयासाठीही त्यांना पुरस्कार मिळाला होता.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी मनोरंजनविश्वात स्थान निर्माण केले. चित्रपट, नाटक, लोकनाट्य, लावणी आणि दूरदर्शन अशा विविध माध्यमांतून त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. त्यांच्या निधनाने मराठी कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील एका ज्येष्ठ कलावंताला मुकावे लागले आहे.

Veteran actress Madhu Kambikar passes away.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *