महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य प्राधिकार मतदारसंघांतील निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ’ऑपरेशन टायगर’ यशस्वी करण्यात गुंतले होते. त्याचवेळी त्यांना पक्षाला नाशिकमध्ये जबरदस्त धक्का बसला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अनपेक्षित पराभव झाला. ते केवळ शिवसेनेचे नव्हे, तर महायुतीचे उमेदवार होते. महायुतीकडे कागदावर खणखणीत बहुमत असल्याने दराडे यांचा विजय निश्चित मानला जात होता; परंतु अपक्ष गोकुळ गिते यांनी पडद्याआड सूत्रे हलवून महायुतीचे मतदार फोडण्यात यश मिळविले. त्यांना महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी साथ दिल्याचे स्पष्ट दिसते. शिंदे यांनी ’ऑपरेशन टायगर’ मतमोजणीनंतर यशस्वी केले. त्यामुळे दिल्लीत त्यांची ताकद वाढली असून, अंतिमतः लाभ भाजपाला आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला होणार आहे. शिंदेंनी मुंबई व दिल्लीत मोठा डाव जिंकला, तरी नाशिकमध्ये त्यांचा पाय घसरला. निवडून आलेल्या गोकुळ गितेंना त्यांनी जवळ करून भरपाई केली असली, तरी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव तो पराभवच. महायुतीची मते फुटल्याचा हा परिणाम आहे. महायुतीतील कोणत्या पक्षाची मते फुटली हा गहन प्रश्न असला, तरी दराडे यांनी गिरीश महाजन यांच्याकडे बोट दाखवले असून, आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर संशय व्यक्त केला आहे. यावरून विरोधकांना भुईसपाट करण्यास निघालेल्या महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. दगाफटका कोणी केला, यावर शिंदेंना आत्मपरीक्षण करावे लागेल. एका पराभवाने काही फरक पडत नाही असे मानले, तरी भविष्यात त्याचे परिणाम दिसू शकतील, हेच शिंदेंना लक्षात घ्यावे लागेल. स्थानिक प्राधिकार मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतांमध्ये मोठ्या प्रमाणात फाटाफूट झाल्याचेही स्पष्ट झाले. महायुतीच्या विजयी उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. काही मतदारसंघांत महायुतीची मते फोडण्यात आघाडीच्या उमेदवारांना यश मिळाले, तरी ती मते आघाडीच्या उमेदवारांना विजयी करू शकली नाहीत. या निवडणुकीत महायुतीने 11 पैकी 10 जागा जिंकून निर्विवाद यश मिळवले, तर अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सहा मतदारसंघांतील निवडणूक बिनविरोध झाली. उर्वरित 11 जागांसाठी 18 जूनला मतदान होऊन त्याचे निकाल सोमवारी (दि. 22) जाहीर करण्यात आले. या निकालात अनेक ठिकाणी मतदारांनी पक्षादेशाच्या विरोधात मतदान केल्याचे स्पष्ट झाले. महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा निभाव लागू शकला नसला, तरी आघाडीच्या उमेदवारांनी परभणी-हिंगोली व सांगली-सातारा मतदारसंघांत महायुतीची मते खेचण्यात यश मिळवले. मात्र, अमरावतीत काँग्रेस उमेदवाराला एकही मत मिळू शकले नाही. बसवराज पाटील (उस्मानाबाद-लातूर-बीड), नंदकिशोर महाजन (जळगाव), प्रवीण पोटे-पाटील (अमरावती), अविनाश ब्राह्मणकर (भंडारा-गोंदिया), अमर राजूरकर (नांदेड), सुहास शिरसाट (औरंगाबाद- जालना), धैर्यशील कदम (सांगली-सातारा), राजेंद्र राऊत (सोलापूर) आणि डॉ. राजीव पोतदार (नागपूर) हे भाजपाचे विजयी उमेदवार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सईद खान परभणी-हिंगोलीतून विजयी झाले. नाशिकमधून निवडून आलेले अपक्ष गोकुळ गिते महायुतीच्याच बाजूला जाणारे आहेत. प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर) व अरुण लखानी (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली) हे भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र फाटक (ठाणे) व दुष्यंत चतुर्वेदी (यवतमाळ) बिनविरोध निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अनिकेत तटकरे (रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग) व विक्रम काकडे (पुणे) हेही बिनविरोध निवडून आले. काही जिल्हा परिषदा व पंचायत समित्या वगळता अलीकडे झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीचे वर्चस्व दिसले. ते निकाल पाहता विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार निवडून येतील, हे स्पष्ट होते. त्याप्रमाणे अपेक्षित निकाल लागले. नाशिक अपवाद ठरले. ज्या पद्धतीने महायुतीचे राज्यात आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे केंद्रात वर्चस्व आहे, ते पाहता विरोधकांना अशा निवडणुकांमध्ये आता फारसा वाव राहिला नसल्याचे दिसले. एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर फत्ते केले, तरी नाशिकमध्ये त्यांना एक लहानसा झटका बसल्याने महायुतीमधील अंतर्गत अविश्वास चव्हाट्यावर आला आहे. आम्हाला पाठिंब्याचे आश्वासन मिळाले होते, मग मते कुठे गेली, असा सवाल निकालानंतर शिंदे गटाच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केला. दुसरीकडे, दराडे यांनी महायुतीच्या नेत्यांवर संताप व्यक्त केला. त्यात निवडणुकीची रणनीती आखणारे सर्वच आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा लोकसभा सदस्य शिंदेंनी गळाला लावले. या सहा सदस्यांना भाजपातही जाता आले असते, पण त्यांनी शिंदेंवर विश्वास ठेवला. राज्यात व केंद्रात शिंदे आपली ताकद वाढवत आहेत. केंद्रातील सरकार बिहारमधील युनायटेड जनता दल (नितीश कुमार) व तेलुगू देसम (चंद्राबाबू नायडू) यांच्या पाठिंब्यावर टिकून आहे. नजीकच्या काळात शिंदेही दबावतंत्राचे राजकारण करू शकतील काय, हा वेगळा प्रश्न असला, तरी शिंदे त्यांचा पक्ष मोठा करत असतील तर तो भाजपाला एक सूचक इशारा आहे. तुम्ही तळात आमची वाट अडवू शकता, पण वर आम्ही तुम्हाला खिंडीत पकडू शकतो, हेच दाखवून देण्याची तयारी शिंदे करत असतील तर? सन 2022 मध्ये शिवसेना फोडून शिंदेंना आपल्या कवेत आणल्याचा आनंद भाजपा आजही व्यक्त करत असेल, तर त्यात काही हरकत नाही, पण शिंदेशाही जड होत असेल तर तिला अटकाव करण्याचा प्रयत्न भाजपा करणार नाही, असे कशावरून? नाशिकचे उदाहरण किरकोळ म्हणून सोडून देता येणार नाही. शिंदे यांनी केलेल्या ऑपरेशन टायगरमुळे लोकसभेत शिंदे गटाची संख्या वाढणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिंदे यांचे महत्त्व अधिक वाढण्याची शक्यता आहे. सहा खासदारांच्या बंडामुळे शिंदे यांचे राजकीय वजन वाढलेच. मात्र, त्याचबरोबर राज्यातील महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यातील सत्तासंघर्षाची सुप्त स्पर्धा आता सुरू होण्याची शक्यता आहे. मला हलक्यात घेऊ नका, असे शिंदे नेहमी आपल्या भाषणात म्हणतात. ’ऑपरेशन टायगर’च्या माध्यमातून शिंदे यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे.

Shindeshahi

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

8 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

8 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

8 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

8 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

8 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

8 hours ago