संपादकीय

भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या ‘अग्निडोंबात’ होणारे दुर्दैवी मृत्यू

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका हॉटेलच्या बेसमेंटमध्ये आगीची दुर्घटना घडली. या घटनेत जवळपास 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर दोनच दिवसांत बिहारमधील मुझफ्फरपूर येथील हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये आग लागली आणि त्यातही दहा जणांचा मृत्यू झाला. कुठे ना कुठे आगीच्या दुर्घटना सातत्याने घडत असतात. त्यात मोठी जीवित व वित्तहानी होते. मात्र, आगीच्या घटना घडणे काही केल्या नियंत्रणात येत नाहीत.
आग लागण्याची अनेक कारणे आहेत. आता पुन्हा एकदा लखनौमध्ये एका इमारतीला आग लागली आणि यात पंधरा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. युवा हे देशाचे भवितव्य, भविष्य आहे. पंधरा विद्यार्थ्यांचा मृत्यू अशा पद्धतीने होणे हे अतिशय दुर्दैवी आहे. बरीच वर्षे अगोदर दिल्लीत उपहार सिनेमागृहात 1997 मध्ये आगीची मोठी घटना घडली होती. त्यात 60 मृत्यू, तर शंभराहून अधिक जखमी झाले होते. मुंबईतदेखील काही वर्षांपूर्वी 2017 लोअर परेल येथील कमला मिल कंपाउंडमध्ये सरत्या वर्षाला निरोप देताना आगीची घटना घडली होती. त्यात 14 जणांचा मृत्यू झाला होता. 2025 वर्ष संपत आले असताना एका नाइट क्लबमध्ये आग लागली आणि बघता-बघता या आगीने 25 जणांचा मृत्यू झाला. त्यावेळी हॉटेलचे मालक लुथरा कुटुंबीय जे दिल्लीत राहत होते ते मात्र एवढी भयंकर घटना घडूनदेखील परदेशात पळून गेले.
विशेष म्हणजे, ज्या इंडिगोची सेवा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झालेली असताना, देशभर गदारोळ माजलेला असताना, विमाने उशिराने चालवली जात असताना अनेक उड्डाणे रद्द झाली होती. मात्र, लुथरा कुटुंबीयांना घेऊन जाणारे विमान मात्र वेळेवर पहाटेच्या सुमारास उडाले आणि लुथरा कुटुंबीय सुरक्षित देशाबाहेर पळून गेले. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील शिक्षण विभागात आग लागली होती. नुकतीच पश्चिम बंगाल निवडणुकीतील ईव्हीएम ठेवलेल्या जागेला आग लागली. आणि जवळपास चार हजार ईव्हीएम मशिन जळून खाक झाले. यापूर्वीदेखील राज्याचा कारभार चालतो त्या मंत्रालयात आगीच्या घटना घडल्या आहेत. 2025 मध्ये मुंबईतील प्रवर्तन निदेशालय (ईडी) च्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली.
मुंबईतील ईडीचे कार्यालय हे बॅलार्ड पिअर येथील ब्रिटिशकालीन दगडी इमारतीत असलेल्या जागेत आहे. ही आग रात्री दोनच्या दरम्यान लागल्याचे सांगितले जाते आणि यात महत्त्वाची अनेक कागदपत्रे, फाइल जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या उन्हाचा पारा चढला आहे. आगीच्या घटना घडणे साहजिकच आहे. मात्र, ईडी कार्यालयासारख्या महत्वाच्या कार्यालयाला लागलेली आग संशयकल्लोळाचा धूर निर्माण करते.
या आगीत सात-आठ वर्षांपूर्वी भारतीय बँकांकडून करोडो रुपये कर्ज घेऊन परदेशी पळून गेलेल्या विजय मल्ल्या तसेच पंजाब नॅशनल बँकेला सुमारे साडेतेरा हजार कोटी रुपयांचा चुना लावून परदेशी पळून गेलेल्या निरव मोदी यांच्या संबधित फाइल जळून नष्ट झाल्याची चर्चा होती. आगीच्या दुर्घटना सातत्याने घडतच असतात कुठे औद्योगिक वसाहतीत तर कुठे रहिवासी भागात. देवनार डम्पिंग ग्राउंंड, बांद्रा झोपडपट्टी, परेल येथील क्रिस्टल टॉवर, महालक्ष्मी येथील एसआरए बिल्डिंगची आग, अशा अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी निष्काळजीपणा, नियमांचे उल्लंघन, परिस्थितीचे गांभीर्य न बाळगणे यामुळे दुर्घटना घडतात. अनेक ठिकाणी डंपिंग ग्राउंंडला लागणार्‍या आगीतून संशयाचा धूर येतो. काही आगी तांत्रिक कारणांमुळे, तर काही आगी अनाकलनीय कारणाने लागतात, तर कधी आग ही दुर्घटना असते. मात्रस आगीच्या संशयाचा धूर मात्र कधीकधी अनेक प्रश्न निर्माण करतो आणि त्याची उत्तरे कधीच मिळत नाहीत.
अनेक महत्त्वाची कागदपत्रे, पुरावे नष्ट होतात. मात्र, ना कोणी दोषी ठरते, ना कोणाला शिक्षा होते. फायर आँडिटबाबत कठोर नियम, अटी-शर्ती आहेत. मात्र, त्याचे पालन होत नाही, एखादी दुर्घटना घडली की सगळे खडबडून जागे होतात. कारवाईचा फार्स होतो, कारवाईचे इशारे दिले जातात, दोषींवर कारवाई होणारच असे ठणकावून सांगितले जाते, पीडितांना आर्थिक मदत जाहीर केली जाते, पुन्हा आगीची दुर्घटना घडणार नाही, असे सांगितले जाते आणि पुन्हा कुठेतरी आग लागते. कारण वरपासून खालपर्यंत सगळ्या यंत्रणा, व्यवस्था भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत आणि ना कोणाला कायद्याचा धाक, ना शिक्षेची भीती राहिली आहे. कुठलाही आपत्तीचा सामना करण्याइतकी आपली यंत्रणा खरोखरच सक्षम आहे का? यावर मात्र प्रश्नचिन्ह उभे राहते. उंचच उंच इमारतींची जंगले उभे करण्याची चढाओढच सर्वत्र सुरू आहे. मात्र, तिथपर्यंत आपली अग्निशमन यंत्रणा पोहोचू शकत नाही, हे अनेकदा समोर आले आहे. भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या आगडोंबात मात्र सत्य, नैतिकता, नीतिमूल्ये, मानवता, प्रामाणिकता, जळून खाक होत आहे. 70-75 वर्षांनंतरदेखील आपण सक्षम अग्निरोधक यंत्रणा का उभारू शकलो नाही, याचे उत्तर कोणी द्यायचे?

Tragic deaths in the ‘inferno’ of a corrupt system

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

अशांत बलुचिस्तान

पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…

8 hours ago

राजकीय संवेदनशीलता

- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…

9 hours ago

अंतराळ कचर्‍याचे वाढते संकट : पृथ्वीच्या भवितव्याला नवे आव्हान

एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…

9 hours ago

दिलासा!

प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय असल्याने देशात यंदा कमी पाऊस पडण्याचा अंदाज असताना जून महिना…

9 hours ago

संततधार पावसाने नंदिनी नदीला पूर

सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…

9 hours ago

पोलिसांसाठी मंत्री महाजन ठरले ‘संकटमोचक’

चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…

9 hours ago