रामवाडीत भरधाव कारने चौघांना उडविले

नाशिक : रामवाडी परिसरातील श्रद्धा पार्क इमारतीसमोर रस्त्याच्या कडेला गप्पा मारत उभ्या असलेल्या पती-पत्नी तसेच इतर दोघे भाऊ अशा चौघांना भरधाव कारने धडक दिल्याची घटना रविवारी (दि. 4) रात्री सव्वाअकरा वाजता घडली. अपघातानंतर कार पुढे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनावर आदळली. अपघातात चौघे जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. इनोव्हाचालकाने घटनास्थळातून वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले. ज्या कारने चौघांना धडक दिली त्या वाहनाचा चालक व वाहनातील इतर चौघे तरुण मद्यधुंद अवस्थेत होते. अपघात प्रकरणी मखमलाबाद रोड, वडजाईमातानगरला राहणार्‍या शुभम रमेश क्षीरसागर यांनी पंचवटी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, त्यावरून निफाड तालुक्यातील चांदोरी येथील कारचालक चेतन संतोष विसपुते याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शुभम क्षीरसागर, त्याचा भाऊ सौरभ क्षीरसागर, त्यांचे भाडेकरू सागर कापडे व त्यांची पत्नी कुसुम कापडे असे चौघे जण गप्पा मारत असताना चौघुले पेट्रोलपंपाकडून भरधाव वेगाने आलेल्या कारने (एमएच 15 जीए 7821) सागर यांना व त्यांच्या पत्नीला उडविले. त्यानंतर बाजूला उभ्या दोघा क्षीरसागर बंधूंवर कार धडकली आणि कार पुढे रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या मालवाहू वाहनावर जाऊन आदळली. अपघातात क्षीरसागर बंधू तसेच कापडे पती-पत्नी जखमी
झाले आहेत.
या अपघातात सागर कापडे याच्या पोटाला व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Speeding car hits four people in Ramwadi

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *