फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
सिडको : प्रतिनिधी
लग्न करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तरुणीला मारहाण करून तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात 25 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून संबंधित तरुणाने तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात
आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षक संतोष भालेराव (25, रा. मोरे मळा, पवारवाडी, राजराजेश्वरीजवळ, जेलरोड) याच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 ऑगस्ट 2024 रोजी तरुणी त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जात असताना आरोपीने तिला पिंपळगाव बहुला-त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा तसेच तिच्या नकळत त्याचे फोटो व व्हिडिओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या फोटो आणि व्हिडिओंचा आधार घेत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. त्यानंतर 22 ऑगस्ट 2024 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीत त्र्यंबकेश्वर रोडवरील विविध हॉटेल आणि लॉजमध्ये नेऊन तरुणीशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, तरुणीने आरोपीशी लग्न करण्यास नकार दिल्यानंतर 25 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. यावेळी आरोपीने तरुणीला हाताने मारहाण केली. तसेच तिच्या आईला फोटो व व्हिडिओ दाखवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे, पोलीस उपनिरीक्षक बाबूलाल बोरसे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रोंदळे करीत आहेत.
Young woman beaten for refusing marriage proposal