अग्रलेख

टाटा विरुद्ध टाटा

जगभर नावलौकिक असलेल्या टाटा उद्योग समूहात टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांना टाटा सन्सच्या काही संचालकांनी आव्हान दिले आहे. टाटा सन्सची शेअर बाजारात नोंदणी करण्यास टाटा ट्रस्टचा विरोध असतानाही संचालकांनी वेगळी वाट धरली. रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांच्याकडे समूहाची सूत्रे आली. टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून 11 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांची एकमताने निवड झाली. टाटा समूहाची होल्डिंग (धारक) कंपनी असलेल्या टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा सुमारे 66 टक्के हिस्सा आहे. त्यामुळे ट्रस्टचे अध्यक्ष हेच संपूर्ण टाटा समूहाचे प्रमुख मानले जातात. रतन टाटा अविवाहित होते. त्यांना अपत्य नव्हते. नोएल हे नवल टाटा आणि सिमोन टाटा यांचे पुत्र. म्हणजेच रतन टाटा यांचे सावत्रभाऊ. त्यामुळे टाटा परिवाराचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांची निवड नैसर्गिक ठरली. ते ट्रस्टचे आधीपासून विश्वस्त होते. समूहातील कंपन्यांचे कामकाज पाहण्याचा मोठा अनुभव आणि पारिवारिक नाते यामुळे विश्वस्तांनी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली होती. नोएल टाटा यांचा विरोध डावलून टाटा सन्सच्या संचालक मंडळाने गुरुवारी (दि. 17 सप्टेंबर 2026) एन. चंद्रशेखरन यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून आणखी पाच वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यास मंजुरी दिली. तसेच टाटा सन्सच्या शेअर बाजारातील नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णयही घेतला. हे दोन्ही निर्णय बेकायदेशीर असल्याचे टाटा ट्रस्टने म्हटले आहे. नोएल टाटा यांनीही बैठकीत विरोध नोंदवला. येथेच टाटा ट्रस्ट विरुद्ध टाटा सन्स ही लढाई उघड झाली. दि. 20 फेब्रुवारी 2027 रोजी कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा अध्यक्षपद घ्यायचे नाही, असे चंद्रशेखरन यांनी 12 ऑगस्ट 2026 रोजी संचालक मंडळाला पत्राद्वारे कळविले होते. तरीही 17 सप्टेंबरच्या बैठकीत पुनर्नियुक्तीचा ठराव 4-1 अशा बहुमताने मंजूर झाला. नोएल टाटा यांनी विरोधात मतदान केले, तर चंद्रशेखरन यांनी मतदानात भाग घेतला नाही. टाटा सन्सची बिगरबँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) म्हणून असलेली नोंदणी रद्द करण्याचा कंपनीचा अर्ज रिझर्व्ह बँकेने 11 सप्टेंबर 2026 रोजी फेटाळला, तसेच कंपनीला शेअर बाजारात नोंदणी करण्यास सांगितले. त्यासाठी टाटा सन्सला प्रारंभिक सार्वजनिक भागविक्री करावी लागेल. (इनिशियल पब्लिक ऑफर-आयपीओ) चंद्रशेखरन हे मोठ्या भांडवली गुंतवणुकींवर भर देतात. त्यासाठी निधी लागतो, तो आयपीओतून मिळू शकेल, असा विचार करून संचालक मंडळाने दोन्ही ठराव मंजूर केले, असे दिसते. नोएल टाटा आणि ट्रस्टच्या विरोधामागे काही कारणे आहेत. टाटा सन्समध्ये ट्रस्टचा सर्वाधिक हिस्सा आहे. शेअर बाजारात नोंदणी झाली, तर नवीन गुंतवणूकदार येतील, मालकीचे स्वरूप बदलेल आणि ट्रस्टची सन्सवरील पक्कड सैल होईल, असे नोएल यांना वाटते. टाटा सन्सकडून ट्रस्टना मिळणारा लाभांश धर्मादाय कामांसाठी निधी म्हणून वापरला जातो. नोएल टाटा या निधीला समाजहिताशी जोडतात. ट्रस्टच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम (परोपकारी) राबवणे ही टाटा परिवाराची परंपरा आहे. नोंदणी झाल्यास ती खंडित होण्याची शक्यता त्यांना वाटते. शापूरजी पल्लोनजी समूहाचा सन्समध्ये सुमारे 18.4 टक्के हिस्सा आहे. या समूहावर मोठे कर्ज असल्याने नोंदणी झाल्यास तो समूह कर्जफेडीसाठी आपला हिस्सा विकू शकतो, असे बोलले जात आहे. टाटा ट्रस्टमध्येही मतभेद असल्याचे समोर आले आहे. सर दोराबजी टाटा ट्रस्टने 16 सप्टेंबरच्या उत्तररात्री परिपत्रक काढून आपले नामनिर्देशित संचालक वेणू श्रीनिवासन यांना शेअर्सच्या नोंदणीवर चर्चा किंवा मतदान करण्यास मनाई केली होती. मात्र, सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट यांचे संयुक्त
नामनिर्देशित संचालक म्हणून मंडळावर असताना स्वतंत्र संचालक म्हणून आपले कर्तव्य असल्याचे सांगत श्रीनिवासन यांनी हा निर्देश फेटाळला. त्यांनी चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीच्या बाजूने, तसेच शेअर बाजारातील नोंदणीच्या बाजूने मतदान केले. दोन्ही निर्णयांना कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची मंजुरी घ्यावी लागेल. कंपनीच्या नियमावलीनुसार महत्त्वाच्या निर्णयांना ट्रस्टच्या नामनिर्देशित संचालकांच्या बहुमताची मान्यता लागते. दोन्ही नामनिर्देशित संचालक (नोएल टाटा आणि श्रीनिवासन) विरोधी बाजूला असल्याने ठराव मंजूर झालेला नाही, अशी ट्रस्टची भूमिका आहे. यातून टाटा ट्रस्ट विरुद्ध टाटा सन्स हा संघर्ष अधिक स्पष्ट झाला आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून काढून टाकल्यानंतर चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मिस्त्री हे शापूरजी पल्लोनजी समूहाचे वारस होते. त्यांचे वडील पल्लोनजी मिस्त्री यांच्या कुटुंबाकडे टाटा सन्समध्ये सुमारे 18.4 टक्के हिस्सा होता. याच आधारावर सायरस मिस्त्री 2006 मध्ये टाटा सन्सच्या संचालक मंडळावर आले. रतन टाटा निवृत्त होणार असल्याने निवड समितीने त्यांची निवड केली आणि डिसेंबर 2012 मध्ये ते टाटा समूहाचे सहावे अध्यक्ष झाले. त्यांच्यावरील विश्वास उडाल्याचे कारण देत 24 ऑक्टोबर 2016 रोजी संचालक मंडळाने त्यांना अध्यक्षपदावरून हटवले. त्यांच्या कामगिरीबाबतचे असमाधानाचे मुद्दे तेव्हा पुढे आले. मिस्त्री यांनी रतन टाटा यांच्या काळात घेतलेल्या निर्णयांमुळे झालेल्या तोट्याकडे बोट दाखवले होते आणि रतन टाटा यांच्यावर हस्तक्षेपाचा आरोप केला होता. त्यानंतर मिस्त्री यांना संचालक पदावरूनही हटवण्यात आले. हा वाद पुढे न्यायालयात गेला आणि 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने टाटा सन्सच्या बाजूने निकाल दिला. सप्टेंबर 2022 मध्ये मिस्त्री यांचे रस्ते अपघातात निधन झाले. मिस्त्री यांना हटवल्यानंतर रतन टाटा हंगामी अध्यक्ष झाले. नवा अध्यक्ष शोधण्यासाठी पाच सदस्यीय निवड समिती (रतन टाटा, वेणू श्रीनिवासन, अमित चंद्रा, रोनेन सेन, लॉर्ड कुमार भट्टाचार्य) नेमली गेली. मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी समूहातीलच अनुभवी व्यक्ती अध्यक्ष म्हणून हवी होती. सन 1987 पासून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) काम करणारे आणि 2009 पासून टीसीएसचेच मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले चंद्रशेखरन योग्य ठरले. समितीच्या एकमताच्या शिफारशीनंतर संचालक मंडळाने 12 जानेवारी 2017 रोजी त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली आणि 21 फेब्रुवारी 2017 पासून त्यांनी पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे, नोएल टाटा हे मिस्त्री यांचे मेहुणे आहेत. त्यांच्या पत्नी आलू मिस्त्री या सायरस मिस्त्री यांच्या सख्ख्या भगिनी आहेत. दुसरे विशेष म्हणजे, चंद्रशेखरन यांचा टाटा किंवा मिस्त्री कुटुंबाशी कोणताही नातेसंबंध नाही. आयुष्यभर समूहातच राहिलेली व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. ते ट्रस्टचे विश्वस्तही नाहीत. शेअर्सच्या नोंदणीबाबत चंद्रशेखरन आणि शापूरजी पल्लोनजी समूह एकाच विचाराचे आहेत, तर नोएल टाटा विरोधात आहेत. टाटा ट्रस्ट विरुद्ध टाटा सन्स ही लढाई गुंतागुंतीची आहे. नोएल टाटा यांना संचालक मंडळाच्या निर्णयांविरोधात न्यायालयात जावे लागेल, असे दिसते. न्यायालयीन निवाड्यानंतरच संघर्ष संपुष्टात येईल. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांनी वडिलांच्या व्यापारी पेढीत काम केल्यानंतर वयाच्या 29 व्या वर्षी म्हणजे 1868 मध्ये मुंबईत एक खासगी व्यापारी पेढी स्थापन केली. हीच टाटा समूहाची सुरुवात मानली जाते. समूहाच्या विविध व्यवसायांचे (कापड गिरण्या, व्यापार इत्यादी) एकत्रित व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी 1887 मध्ये टाटा अँड सन्स या नावाने भागीदारी संस्था स्थापन केली. यातूनच पुढे होल्डिंग कंपनीचे टाटा सन्स हे नाव आले. या व्यवसायांचे औपचारिक एकत्रीकरण झाल्यानंतर 8 डिसेंबर 1917 रोजी मुंबईत टाटा सन्स या नावाने कंपनीची नोंदणी झाली. टाटा ट्रस्टमध्ये दोन मोठे ट्रस्ट आहेत, जे जमशेदजींच्या दोन पुत्रांच्या नावाने आहेत.
पहिल्या ट्रस्टची स्थापना 1919 मध्ये झाली. जमशेदजींचे धाकटे पुत्र सर रतनजी टाटा यांच्या नावाने हा ट्रस्ट उभा राहिला. रतनजी कला व संस्कृतीचे संवर्धक होते. 1916 मध्ये त्यांना सर ही पदवी मिळाली होती. 1913 च्या मृत्युपत्रात त्यांनी आपली संपत्ती शिक्षण, अध्ययन व उद्योगासाठी वापरण्याचे निर्देश दिले होते. 5 सप्टेंबर 1918 रोजी इंग्लंडमध्ये त्यांचे निधन झाले आणि त्यांच्याच मृत्युपत्रानुसार 1919 मध्ये हा ट्रस्ट स्थापन झाला. त्यांच्या पत्नी नवाजबाई या ट्रस्टच्या पहिल्या अध्यक्षा बनल्या. जमशेदजींचे थोरले पुत्र सर दोराबजी टाटा यांच्या नावाने सर्वांत मोठा ट्रस्ट उभा राहिला. ते निपुत्रिक होते. 1931 मध्ये पत्नी मेहेरबाई यांच्या निधनानंतर 11 मार्च 1932 रोजी दोराबजींनी आपली संपूर्ण संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या तीन महिन्यांनी, 3 जून 1932 रोजी जर्मनीत त्यांचे निधन झाले. त्यांच्याच नावाने हा ट्रस्ट स्थापन झाला. याशिवाय काही लहान ट्रस्ट आहेत. हे सर्व ट्रस्ट टाटा ट्रस्ट या नावाखाली समाजोपयोगी कार्ये करतात. ट्रस्ट आणि सन्स वेगळे असले, तरी ते एकमेकांना पूरक आहेत. मात्र, परस्परविरोधी भूमिकेमुळे संघर्षाला तोंड फुटले आहे.

Tata vs. Tata

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago