– मुकुंद बाविस्कर
नाशिकची सांस्कृतिक आणि नाट्यपरंपरा नेहमीच समृद्ध राहिलेली आहे. आजच्या काळात जेव्हा तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे माणूस एकाकी किंवा ’एकलकोंडा’ होत चालला आहे, अशा वेळी ’बाबाज थिएटर’सारख्या सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरते. आजच्या डिजिटलाइज्ड जगाच्या पाश्वर्र्भूमीवर बाबाज थिएटरसारख्या संस्थांचे कार्य आणि त्यांची गरज अत्यंत आवश्यक व महत्त्वाची म्हणावी लागेल.
आजच्या काळात अनेक नवोदित कलाकार, गायक, अभिनेते आणि लेखक यांच्याकडे गुणवत्ता असूनही त्यांना सादरीकरणासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही. ’बाबाज थिएटर’ अशा कलावंतांना केवळ स्टेज उपलब्ध करून देत नाही, तर त्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांना आत्मविश्वास मिळवून देते. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यवाचन, एकपात्री प्रयोग आणि लोककला यांसारख्या विविध कलाप्रकारांना जोपासण्याचे काम ही संस्था करते. बाबाज थिएटरसारख्या संस्था सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने लोकांना एकत्र आणतात. प्रेक्षक आणि कलाकार प्रत्यक्ष एकत्र आल्यामुळे विचारांची देवाणघेवाण होते आणि समाजात एक जिव्हाळ्याचे नाते तयार होते. आज अनेक पारंपरिक आणि सांस्कृतिक कलाप्रकार लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. संस्थात्मक स्तरावर सातत्यपूर्ण उपक्रम राबवून बाबाज थिएटरने अशा कलाप्रकारांना जिवंत ठेवण्याचे कार्य केले आहे. व्याख्याने, संगीत सभा, नाट्य कार्यशाळा आणि सांस्कृतिक महोत्सव यांद्वारे तरुणांमध्ये कलेची आवड निर्माण केली जाते.
सामाजिक भान आणि प्रबोधन :
केवळ मनोरंजन न करता कलेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर प्रकाश टाकणे हा सांस्कृतिक संस्थांचा मुख्य उद्देश असतो. बाबाज थिएटरने आपल्या विविध प्रयोगांमधून आणि उपक्रमांमधून सामाजिक विषयांवर भाष्य करत प्रेक्षकांमध्ये प्रबोधन घडवून आणले आहे. सध्याच्या काळात आर्थिक अडचणी, प्रेक्षकांचा बदलता दृष्टिकोन आणि डिजिटल माध्यमांचे आक्रमण यामुळे अनेक नावाजलेल्या सांस्कृतिक संस्था बंद पडत आहेत. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही निष्ठावंत कार्यकर्ते, कलावंत आणि रसिकांच्या पाठिंब्यावर बाबाज थिएटरचे कार्य सुरू आहे. नाशिकच्या कला-सांस्कृतिक विश्वात ’बाबाज थिएटर्स’ आणि तिचे संस्थापक प्रशांत जुन्नरे हे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. गेल्या 25 वर्षांहून अधिक काळापासून ही संस्था नाशिकमध्ये कला, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक प्रवाह अखंडपणे वाहता ठेवण्याचे कार्य करत आहे. दि. 17 सप्टेंबर 2000 रोजी प्रसिद्ध व संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते बाबाज थिएटर्सची मुहूर्तमेढ रोवली गेली. संस्थेने 2025 मध्ये आपला रौप्यमहोत्सव (25 वर्षे) साजरा केला. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत जुन्नरे गेल्या 26 वर्षांपासून शहराची कलासंस्कृती जोपासणारे संवेदनशील कलावंत आहेत. संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे नवोदितांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि ज्येष्ठांचा सन्मान करणे, प्रमुख सांस्कृतिक व नाट्य उपक्रम म्हणजे व्यावसायिक नाटके व संगीत कार्यक्रम आयोजित करणे होय. सुरुवातीच्या काळात नाशिकमधील कलाकारांना घेऊन प्रा. नर्किले सर दिग्दर्शित विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याचे 40 प्रयोग व्यावसायिक रंगभूमीवर सादर केले. तसेच आपली आवड या मराठी गाण्यांच्या कार्यक्रमाचे 50 प्रयोग महाराष्ट्रात सादर केले.
बाबाज करंडक (राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा):
गेल्या 22 वर्षांपासून या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते. यात मुंबई, पुणे, धुळे, जळगाव, सोलापूर आणि नाशिक यांसारख्या विविध भागांतून नाट्यसंघ सहभागी होतात.
मासिक संगीत मैफल व
कृतज्ञता सन्मान :
2019 च्या गुढीपाडव्यापासून स्थानिक व नवोदित कलावंतांसाठी मासिक उपक्रम सुरू करण्यात आला. दर महिन्याच्या 1 तारखेला गंगापूर रोडवरील कुर्तकोटी शंकराचार्य संकुलात रसिकांसाठी विनामूल्य संगीतमय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
कृतज्ञता पुरस्कार :
साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांना कृतज्ञता सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जाते. आतापर्यंत 70 हून अधिक पुष्प गुंफले गेले असून, 1,200 हून अधिक स्थानिक कलावंतांनी या व्यासपीठावरून सादरीकरण केले आहे.
श्याम रंग संगीत समारोह :
सुमारे दहा वर्षे शास्त्रीय संगीतावर आधारित सोहळ्याचे आयोजन केले गेले.
’पाडवा पहाट’ संकल्पना :
नाशिकमध्ये ’पाडवा पहाट’ ही सांस्कृतिक संकल्पना रुजवण्यात प्रशांत जुन्नरे आणि ज्येष्ठ समाजसेवक शाहू (महाराज) खैरे यांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे. आविष्कार संस्था आणि बाबाज थिएटर्सच्या आयोजनातून नाशिकच्या 50 कलाकारांना घेऊन स्व. लता मंगेशकर यांच्या 100 नॉन-स्टॉप गीतांचा कार्यक्रम सादर करून वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवले गेले.
कला क्षेत्रातील योगदान :
बाबाज थिएटर्सच्या व्यासपीठावरून घडलेले अनेक कलावंत आज नाट्य, चित्रपट, टीव्ही मालिका, गायन आणि वादन क्षेत्रांत आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. तरुणांचे प्रश्न, शिक्षण, सामाजिक वास्तव, कृषी संकट आणि मानवी नातेसंबंध अशा गंभीर व नावीन्यपूर्ण विषयांवर आधारित नाटकांच्या निर्मितीवर संस्थेने भर दिला आहे. सावानाच्या परशुराम साईखेडकर नाट्यगृहासारख्या ऐतिहासिक रंगमंचावर ही संस्था सातत्याने सक्रिय असते. अनेक अडचणीचा सामना करत, स्वखर्चाने जुन्नरे यांनी हा कलायज्ञ अविरत सुरू ठेवला आहे. या चळवळीत कैलास पाटील, प्रा. प्रीतिश कुलकर्णी, डॉ. अतुल पुराणिक, शामराव केदार, जे.पी. जाधव, दिलीपसिंह पाटील, साहिल शहा, एन.सी. देशपांडे, राजा पाटेकर, राजा पाथ्रडकर, मिलिंद जोशी, शिल्पा फासे, मयूरी कांबळे, प्रशांत कापसे, योगिता पाटील, डॉ. नीलेश पुरकर, किरण चव्हाण आणि सुमेध वैद्य अशा अनेक सहकार्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
Babaj Theatres: A Hub of Energy for Nashik’s Art and Culture
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…