39 हजार शेतकरी बाधित, एकाच दिवसात 28 हजार हेक्टर पिके मातीमोल
♦ नुकसान भरपाईची मागणी.
♦ द्राक्ष, कांदा, डाळिंबाला फटका.
♦ शेतकरी आर्थिक अडचणीत.
♦ हातातोंडाशी आलेला घास हिरावला.
♦ रब्बी पिकांचे मोठे नुकसान.
नाशिक : प्रतिनिधी
जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर कायम आहे. गुरुवारी (दि. 2) झालेला पाऊस व गारपिटीचा तडाखा दहा तालुक्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. दरम्यान, एकाच दिवसात 39 हजार शेतकर्यांचे 28 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात भाग बदलत होत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गारपीट आणि वादळी वार्यांसह झालेल्या पावसामुळे हाताशी आलेली रब्बी पिके मातीमोल झाली आहेत. शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. शासनाने त्वरित पंचनामे पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
हवामान खात्याने गुरुवारी (दि. 2) जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार जिल्ह्यातील 10 तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपले. यात 39 हजार 814 शेतकर्यांचे 28 हजार 364 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यापूर्वीहीदेखील 18 मार्चला, 270 हेक्टर, तर 29 मार्चला 482 तर 1 एप्रिलला झालेल्या अवकाळी पावसामुळे 3 हजार 33 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून, उभ्या पिकांसह काढणीस आलेल्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
मालेगाव, सटाणा, देवळा, नाशिक, निफाड, सिन्नर आणि चांदवड या तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. विशेषतः बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाने सर्वाधिक कहर केला असून, मोठ्या क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. जिल्ह्यातील इतर काही तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याने तेथील शेतकर्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सततच्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेती मोठ्या संकटात सापडली आहे. शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदत व पंचनाम्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.
कांदा, गहू, डाळिंबाला सर्वाधिक फटका
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका कांदा, गहू व डाळिंब या पिकांना बसला आहे. 22 हजार 726 हेक्टर कांदा, तर गहू एक हजार 920 हेक्टर आणि एक हजार 798 हेक्टरवरील डाळिंब फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Ten talukas hit by unseasonal rain