वडाळा-पाथर्डी रोडवरील गणेश मंडळाचा पर्यावरणपूरक देखावा
सिडको : प्रतिनिधी
इंदिरानगर परिसरातील वडाळा-पाथर्डी रोडवर श्री प्रतिष्ठान गणेश मंडळाने यंदा तेलंगणातील प्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वर स्वामी स्वर्णगिरी मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली आहे. धार्मिक वातावरणाची अनुभूती देणार्या या देखाव्याने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून भाविकांचे लक्ष वेधून घेतले असून, दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.
मंडळाचे संस्थापक, भाजप गटनेते तथा नगरसेवक अॅड. श्याम बडोदे यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला आहे. गेल्या सात वर्षांपासून मंडळाकडून दरवर्षी विविध विषयांवरील भव्य देखावे उभारले जात असून, मागील वर्षी मंडळाला विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. यंदाचा देखावा साकारण्यासाठी पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या सुमारे 45 कारागिरांनी दोन महिने परिश्रम घेतले. दोन शिफ्टमध्ये अहोरात्र काम करून त्यांनी मंदिराची प्रतिकृती पूर्ण केली. विशेष म्हणजे, बांबू, लाकडी पट्ट्या, बॉटम आणि कापड अशा साहित्याचा वापर करून हा संपूर्ण देखावा पर्यावरणपूरक पद्धतीने उभारण्यात आला आहे. 80 बाय 130 फूट क्षेत्रफळात उभारण्यात आलेल्या या देखाव्याची मंदिर प्रतिकृती सुमारे 70 फूट उंच आहे. प्रवेशद्वाराची उंची 30 फूट असून, 30 बाय 52 फूट आकाराचा पाण्याचा कुंडही उभारण्यात आला आहे. कुंडाच्या मध्यभागी शेषनागाच्या शय्येवर विराजमान भगवान विष्णूंची भव्य मूर्ती साकारण्यात आली आहे.
विष्णूंची आकर्षक मुद्रा, शेषनागाचा फणा, मुकुट आणि विविध अलंकार यामुळे मूर्तीला विशेष देखणेपणा प्राप्त झाला आहे. मंदिराची भव्य पार्श्वभूमी आणि त्याला दिलेली आकर्षक विद्युत रोषणाई यामुळे रात्रीच्या वेळी देखाव्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. तिरुपती बालाजी, गणेश आणि महालक्ष्मी यांच्या मूर्तीही देखाव्यात साकारण्यात
आल्या आहेत.
धार्मिक देखाव्यासोबत सामाजिक प्रबोधन
या देखाव्याला केवळ धार्मिक स्वरूप न देता सामाजिक संदेशाची जोड देण्यात आली आहे. कुंभमेळ्याची माहिती देणारे प्रदर्शन तसेच ‘नशामुक्त भारत’चा संदेश देणारे प्रबोधनात्मक प्रदर्शनही येथे मांडण्यात आले आहे. त्यामुळे दर्शनासोबतच भाविकांना विविध सामाजिक आणि धार्मिक विषयांची माहिती मिळत आहे. भव्य मंदिररचना, पाण्याचा कुंड, शेषशय्येवरील भगवान विष्णूंची मूर्ती आणि आकर्षक रोषणाई यामुळे हा देखावा भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. गणेशोत्सवाच्या प्रारंभापासूनच देखावा पाहण्यासाठी इंदिरानगर तसेच शहराच्या विविध भागांतून भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
The beautiful appearance of the Swarnagiri Temple was created in Indiranagar.
- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…
- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…
- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…
- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…
तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…
रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…