आस्वाद

तुमची गोष्ट, तुमचा निर्णय

– अनुराधा सोनवणे
आपल्या प्रत्येकाची एक गोष्ट असते.
काही गोष्टी आपण निवडलेल्या असतात, काही आपल्या वाट्याला आलेल्या असतात, तर काही अशा असतात ज्या कितीही प्रयत्न केला तरी बदलता येत नाहीत. आपला भूतकाळ, अनुभव, माणसं, यश-अपयश, आनंद-दुःख आणि आपल्यासोबत घडलेल्या घटना-या सगळ्यांनी मिळून आपली गोष्ट तयार होते. पण आयुष्याची दिशा केवळ या गोष्टीवर ठरत नाही. कारण भूतकाळ आपल्याला सांगतो काय घडलं; पण त्यानंतर आपण काय करतो, हे ठरवतं पुढे काय घडणार. प्रत्येक कठीण परिस्थितीसमोर एक प्रश्न उभा राहतो- आता काय? थांबायचं की पुढे जायचं? लगेच प्रतिक्रिया द्यायची की विचार करून उत्तर द्यायचं? दबावापुढे झुकायचं की आपल्या मूल्यांवर ठाम राहायचं? याच क्षणी आपला प्रतिसाद महत्त्वाचा ठरतो.
कारण माणसाची खरी ओळख त्याला कोणती परिस्थिती मिळाली यापेक्षा त्या परिस्थितीत त्याने कोणती भूमिका घेतली, यात अधिक दिसते.
याचं एक ठळक उदाहरण म्हणजे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे. प्रशासकीय सेवेत काम करताना त्यांच्या वाट्याला नेहमीच सोप्या परिस्थिती आल्या नाहीत. निर्णयांना विरोध झाला, टीका झाली, बदल्या झाल्या. पण त्यांच्या प्रवासाकडे पाहताना महत्त्वाचा प्रश्न हा नाही की- त्यांच्यासोबत काय घडलं? तर प्रश्न आहे- त्या परिस्थितीत त्यांनी काय निवडलं? त्यांच्या कार्यशैलीत कर्तव्याला दिलेलं प्राधान्य ठळकपणे जाणवतं. सगळ्यांना आपला निर्णय आवडेलच असं नाही. योग्य निर्णयाला प्रत्येक वेळी दाद मिळेलच असंही नाही. कधी विरोध होतो, गैरसमज होतात, किंमत मोजावी लागते. पण म्हणून योग्य वाटणारी भूमिका सोडायची का? नाही. कारण परिस्थितीपेक्षा तिच्यावरील आपला प्रतिसाद अनेकदा आपली ओळख घडवतो. योग्य निर्णय म्हणजे काय? योग्य निर्णय नेहमी मोठा किंवा धाडसी असतोच असं नाही. समजा, कार्यालयात वरिष्ठांनी सगळ्यांसमोर तुमच्या कामावर टीका केली. मनात विचार येतात- माझ्यावरच का? त्यांना माझं कामच कळत नाही. आता मीही त्यांना उत्तर देतो. रागाच्या भरात आपण लगेच बोलतो. संभाषण वाढतं, वातावरण बिघडतं आणि काही क्षणांच्या प्रतिक्रियेचा परिणाम अनेक दिवस राहतो. पण त्याच क्षणी आपण थोडं थांबलो आणि स्वतःला विचारलं- मला आत्ता काय सिद्ध करायचं आहे-मी बरोबर आहे हे, की परिस्थिती सुधारायची आहे? तर आपला प्रतिसाद बदलू शकतो.
आपण शांतपणे म्हणू शकतो- तुमच्या सूचनेबद्दल धन्यवाद. नेमकं कुठे सुधारणा हवी आहे, ते आपण नंतर बोलू शकतो का? परिस्थिती तीच. टीका तीच. पण प्रतिसाद बदलला. आणि प्रतिसाद बदलला की कृती बदलते. कधी कधी स्वतःच्या पहिल्या प्रतिक्रियेला थांबवणं हीच योग्य पुढची चाल असते.
परिस्थिती एक; निवड वेगळी
नात्यात गैरसमज झाला-तो प्रसंग आहे. त्यावर रागाने प्रतिक्रिया द्यायची की संवाद साधायचा, ही आपली निवड आहे. कामाच्या ठिकाणी अन्याय वाटला-ती परिस्थिती आहे. पण कसं बोलायचं, कोणती भूमिका घ्यायची, हे आपल्या हातात असतं. अपयश आलं-तो अनुभव आहे. पण त्यातून तुटून जायचं की शिकून पुन्हा उभं राहायचं, हा निर्णय आपला असतो. म्हणूनच एकाच परिस्थितीत असलेल्या दोन व्यक्तींचे परिणाम वेगळे असू शकतात. परिस्थिती एक असते; प्रतिसाद वेगळे असतात. माझ्यासोबत हे का घडलं?पेक्षा आता मी काय करणार? आपण अनेकदा भूतकाळाकडे पाहून विचारतो- माझ्यासोबत हे का घडलं? या प्रश्नाचं उत्तर कदाचित लगेच मिळणार नाही. पण दुसरा प्रश्न आपल्या हातात आहे- आता मी काय करणार? आपला भूतकाळ बदलता येत नाही. घडलेल्या घटना पुसता येत नाहीत. काही चुकाही मागे नेता येत नाहीत. पण त्या सगळ्यानंतरची पुढची चाल आपल्या हातात असते. म्हणून एखाद्या कठीण प्रसंगाने आपली संपूर्ण ओळख ठरवू देऊ नका.
एक अपयश म्हणजे आपण अपयशी नाही. एक चूक म्हणजे आपली संपूर्ण ओळख नाही. एक नकार म्हणजे आपल्या क्षमतेचा अंतिम निकाल नाही. पुढची चाल तुमची आहे पुढच्या वेळी आयुष्य तुमच्यासमोर एखादी कठीण परिस्थिती घेऊन येईल, तेव्हा लगेच प्रतिक्रिया देण्याआधी एक क्षण थांबा. परिस्थिती समजा. स्वतःला विचारा- माझी योग्य पुढची चाल कोणती? कदाचित तुमची गोष्ट बदलणार नाही. कदाचित काल काय झालं, हेही बदलणार नाही. पण आज तुम्ही काय करता, ते तुमच्या उद्याची दिशा बदलू शकतं. तुमची गोष्ट तुम्ही कुठून आलात, हे सांगते. पण तुम्ही कुठे जाणार आहात, हे तुमच्या पुढच्या निवडी ठरवतात. म्हणून आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न कदाचित हा नसावा- माझ्यासोबत काय घडलं? तर तो असावा- आता मी काय निवडणार? तुमची गोष्ट तुमचा भूतकाळ सांगते. तुमचा निर्णय तुमचं भविष्य घडवतो. तुमचा प्रतिसाद निवडा. तुमची कृती ठरवा. तुमचा परिणाम घडवा. तुमची गोष्ट. तुमचा निर्णय.

Your story, your decision.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

5 hours ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

5 hours ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

6 hours ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

6 hours ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

6 hours ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

6 hours ago