कतारमध्ये 18 डिसेंबर 2022 रोजी अर्जेंटिनाने फिफा विश्वचषक जिंकला, तेव्हा जगातील सर्वकालीन महान फुटबॉलपटूंपैकी एक मानले जाणारे ब्राझीलचे एडसन अरांतेस दो नासिमेंतो उर्फ पेले व्हेंटिलेटरवर होते, तेव्हा
अर्जेंटिनाचे अभिनंदन करताना त्यांनी आपला मित्र मॅराडोना स्वर्गातून स्मितहास्य करत असेल, असे म्हटले होते. त्यांनी अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीचेही अभिनंदन केले होते. यानंतर 29 डिसेंबर 2022 रोजी 82 व्या वर्षी पेले यांनी जगाचा निरोप घेतला. मॅराडोनांसारखी शैली असलेल्या मेस्सीने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली आहे. तो यापुढे आपल्या देशाकडून खेळणार नाही. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांनी संयुक्तपणे भरवलेली फिफा विश्वचषक 2026 स्पर्धा 39 वर्षीय मेस्सीची शेवटची ठरली. अर्जेंटिनाने अंतिम फेरीत प्रवेश केला, तेव्हा कर्णधार म्हणून मेस्सी सलग दुसर्यांदा विश्वचषक उंचावेल असे वाटत होते, पण नशिबात तसे नव्हते. स्पेनने अतिरिक्त वेळेत अंतिम फेरीत अर्जेंटिनाचा 1-0 असा पराभव करून मेस्सीचे स्वप्न भंग केले. त्याची विश्वचषक कारकीर्द तिथेच संपुष्टात आली. मेस्सीने राष्ट्रीय संघातून निवृत्ती जाहीर केली, तरी तो त्याच्या इंटर मियामी सीएफ क्लबकडून खेळत राहणार आहे. अमेरिकेच्या मेजर लीग सॉकरमधील इंटर मियामी क्लबशी त्याचा करार 2028 च्या हंगामाच्या अखेरपर्यंत आहे, या क्लबचा तो कर्णधारही आहे. देशासाठीचा त्याचा 21 वर्षांचा आंतरराष्ट्रीय प्रवास संपला आहे. क्लबकडून खेळणे म्हणजे व्यावसायिक
फुटबॉल. व्यावसायिक फुटबॉलपेक्षा देशासाठी खेळणे प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे असते, कारण फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. अर्जेंटिनासारख्या छोट्या देशाचा या खेळात मोठा नावलौकिक आहे. त्यामुळे मेस्सीच्या निवृत्तीच्या घोषणेने केवळ त्याच्या देशवासीयांनाच नव्हे, तर जगभरातील त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना मोठा धक्का बसला. भारतातही त्याचे लाखो चाहते आहेत. मेस्सी भारतात दोनदा येऊन गेला. पहिल्यांदा सप्टेंबर 2011 मध्ये आणि दुसर्यांदा डिसेंबर 2025 मध्ये. पहिल्या भारत दौर्यात तो केवळ कोलकाता शहरात आला होता. दि. 2 सप्टेंबर 2011 रोजी
अर्जेंटिना आणि व्हेनेझुएला यांच्यात एक आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना कोलकाता येथील ऐतिहासिक सॉल्ट लेक स्टेडियमवर खेळला गेला होता. या सामन्यात मेस्सी अर्जेंटिना संघाचा कर्णधार होता आणि त्याच्या पासिंगमुळे अर्जेंटिनाने हा सामना 1-0 ने जिंकला होता. यानंतर तब्बल 14 वर्षांनी मेस्सी त्याच्या विशेष गोट इंडिया टूरसाठी भारतात आला. तीन दिवसांच्या या दौर्यात त्याने भारतातील चार प्रमुख शहरांना भेट दिली. 13 डिसेंबर 2025 रोजी दौर्याची सुरुवात कोलकाता येथून झाली. येथे त्याने सॉल्ट लेक स्टेडियमला भेट दिली. चाहत्यांशी संवाद साधला, आपल्या 70 फूट उंच पुतळ्याचे आभासी अनावरण केले आणि अभिनेता शाहरुख खानचीही भेट घेतली. कोलकाता येथील कार्यक्रम संपवून तो त्याच दिवशी संध्याकाळी हैदराबादला पोहोचला. तेथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर त्याने एका छोट्या प्रदर्शनीय सामन्यात भाग घेतला आणि चाहत्यांना संबोधित केले. यानंतर 14 डिसेंबर रोजी मेस्सी मुंबईत आला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर पॅडेल गोट कपचे आयोजन करण्यात आले होते, तर वानखेडे स्टेडियमवर सेलिब्रिटी फुटबॉल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत त्याने क्रिकेटचा देव मानल्या जाणार्या सचिन तेंडुलकरचीही भेट घेतली. दौर्याच्या शेवटच्या दिवशी, म्हणजे 15 डिसेंबर रोजी तो देशाची राजधानी नवी दिल्लीत पोहोचला. तेथील अरुण जेटली स्टेडियमवर हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत त्याचा भव्य सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वकाही साध्य केल्यानंतर 31 ऑगस्ट 2026 रोजी मेस्सीने सोशल मीडिया पोस्टद्वारे निवृत्तीच्या या कठीण निर्णयाची घोषणा केली. देश आणि राष्ट्रीय संघासाठी आपले सर्वस्व दिले असून, आता आंतरराष्ट्रीय
फुटबॉलला देण्यासारखे काहीही उरलेले नाही आणि आपण मानसिक व शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे समाधानी आहोत, असे त्याने या घोषणेत म्हटले. 8 ऑगस्ट 2026 रोजी मेस्सीचे वडील व एजंट जॉर्ज मेस्सी यांचे निधन झाले होते. मेस्सीने स्पष्ट केले की, त्याने निवृत्तीचे पत्र 21 जुलै रोजीच म्हणजे विश्वचषक अंतिम सामना संपल्यानंतर दोन दिवसांनी लिहून ठेवले होते. वडिलांच्या निधनानंतर बसलेल्या कौटुंबिक धक्क्यामुळे त्याचा निर्णय अधिक पक्का झाला. आता
अर्जेंटिना संघात अनेक उत्कृष्ट आणि प्रतिभावान तरुण खेळाडू येत असून, त्यांना संघात संधी मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी बाजूला होण्याची हीच योग्य वेळ आहे, असेही त्याने नमूद केले. सन 2026 च्या फिफा विश्वचषकात अर्जेंटिनाचे नेतृत्व करून संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवल्यानंतर, आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याची हीच सर्वोत्तम वेळ असल्याचे त्याने म्हटले. वय, वडिलांचे जाणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेले ऐतिहासिक यश, 2022 चा विश्वचषक आणि दोन कोपा अमेरिका चषक यांमुळे मेस्सीने अत्यंत सन्मानाने आंतरराष्ट्रीय फुटबॉलला निरोप दिला. ब्राझीलच्या पेलेंप्रमाणेच अर्जेंटिनाचा दिएगो मॅराडोना हे फुटबॉल विश्वातील एक महान खेळाडू. त्यांचा वारसदार म्हणून मेस्सीकडे पाहिले जात होते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मॅराडोना यांना 2017 मध्ये कोलकात्यात एका प्रदर्शनीय सामन्यासाठी आमंत्रित केले होते, त्यावेळी गांगुली मॅराडोनाविरुद्ध
फुटबॉल खेळले होते. या सामन्यात वयाच्या 57 व्या वर्षी पायाला जखम झाली आणि थकवाही जाणवल्याने मॅराडोना यांनी सामना अर्धवट सोडला आणि त्यानंतर मुलांसमवेत गप्पागोष्टी करत त्यांना
फुटबॉलचे धडेही दिले. मॅराडोना आणि मेस्सी यांच्यात बरेच साम्य आढळते. मेस्सीची वरिष्ठ आंतरराष्ट्रीय कारकीर्द 17 ऑगस्ट 2005 रोजी सुरू झाली. त्याने हंगेरीविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात अर्जेंटिना संघासाठी पदार्पण केले होते. मेस्सीला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच दिएगो मॅराडोनांचा खरा वारसदार म्हटले जात होते आणि स्वतः मॅराडोना यांनीही त्याला आपला वारसदार म्हणून घोषित केले होते. सन 2006 मध्ये दिएगो मॅराडोना यांनी स्वतः म्हटले होते की, मी अशा खेळाडूला पाहिले आहे, जो अर्जेंटिनाच्या फुटबॉलमध्ये माझी जागा घेईल आणि त्याचे नाव लिओनेल मेस्सी आहे. मेस्सीची खेळण्याची शैली हुबेहूब मॅराडोना यांच्यासारखीच. दोघेही उजव्या पायाऐवजी डाव्या पायाने खेळणारे, कमी उंचीचे, कमालीचा वेग असलेले आणि चेंडूवर अफलातून नियंत्रण ठेवून बचावपटूंना चकवणारे खेळाडू होते. विशेष म्हणजे, मॅराडोना आणि मेस्सी या दोघांनीही
अर्जेंटिनासाठी आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण हंगेरीविरुद्धच केले होते आणि दोघांनीही कारकिर्दीच्या सुरुवातीला फिफा युवा विश्वचषक जिंकला होता. दोघांनीही आपापल्या कालखंडात अर्जेंटिनाला
फुटबॉल जगताच्या शिखरावर पोहोचवले. दक्षिण आफ्रिकेतील 2010 चा फिफा विश्वचषक फुटबॉल इतिहासातील एक भावनिक आणि ऐतिहासिक क्षण मानला जातो. या स्पर्धेत अर्जेंटिनाचे मुख्य प्रशिक्षक दिएगो मॅराडोना होते आणि मैदानावरील मुख्य खेळाडू लिओनेल मेस्सी होता. याच विश्वचषकात ग्रीसविरुद्धच्या सामन्यात मॅराडोना यांनी नियमित कर्णधार हाविएर मास्केरानोला विश्रांती देत 22 वर्षीय मेस्सीकडे अर्जेंटिनाचे कर्णधारपद सोपवले आणि मेस्सी अर्जेंटिनाचा विश्वचषकातील सर्वांत तरुण कर्णधार बनला. या स्पर्धेत पाच सामन्यांत काही गोलसाठी सहाय्यक भूमिका बजावूनही मेस्सीला एकही वैयक्तिक गोल करता आला नाही; तरीही मॅराडोना यांनी त्याची पाठराखण करत, मी लेओसाठी माझा जीवही देऊ शकतो, असे जाहीर केले होते.
The Great Hero
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…