जगभरातील कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांची जयंती अर्थात, श्रीराम नवमी म्हणजे रामभक्तांसाठी आनंदाची पर्वणी असते. जगाच्या पाठीवर रामराज्य हे सर्वार्थाने आदर्श असण्याचे गुपित श्रीरामामध्ये असलेल्याला गुणांमध्ये आहे. उपास्य देवतेसंदर्भात उपयुक्त माहिती मिळाल्यावर त्या देवतेप्रति श्रद्धा वाढण्यास सहाय्य होते. आपलीही श्रीरामाप्रतिची श्रद्धा वाढीस लागून श्रीरामाच्या अस्तित्वाचा आपल्या सर्वांना लाभ व्हावा, ही श्रीराम प्रभूंच्या चरणी प्रार्थना!
आदर्श राजा ः
सीतामाता, श्री लक्ष्मण यांसह श्रीराम वनवासातून अयोध्येत परतल्यानंतर एका परटाने सीतामातेविषयी संशय व्यक्त केला तेव्हा श्रीरामाने प्रजेच्या मनात कोणत्याही प्रकारचा संभ्रम नको म्हणून तत्काळ सीतामातेचा त्याग केला. ज्या अर्धांगिनीने श्रीरामांना वनवासात साथ दिली तिचा एका परटाच्या संशयावरून त्याग करताना श्रीरामाने एका राजासाठी प्रजा किती महत्त्वाची असते, हे स्वतःच्या वर्तणुकीतून दाखवून दिले. श्रीरामाने राजधर्माचे पालन केले नाही, असा चुकीचा संदेश येणार्या पिढीकडे जाता कामा नये, यासाठी श्रीरामाने आपल्या सहचारिणीचाही त्याग केला. जनतेच्या पैशांतून आपल्या सात पिढ्या बसून खातील एवढी माया गोळा करणारे हल्लीचे राजकारणी कुठे आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी प्रसंगी धर्मपत्नीचाही त्याग करणारे प्रभू श्रीराम कुठे.
शत्रूवरही प्रेम करणारा ः
रावणाचा वध केल्यानंतर श्रीरामाने रावणाचा बंधू विभीषणाला त्याचे अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. तेव्हा विभीषणाने त्यास नकार दिला. ’मरणांती वैराणी’ या वचनानुसार मृत्यूनंतर वैरही संपते. त्यामुळे तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करायला तयार नसशील तर मी करतो, माझाही तो बंधूच होता, असे प्रभू श्रीरामचंद्रांनी विभीषणला निक्षून सांगितले. अखेर विभीषण श्रीरामाच्या सांगण्यावरून रावणाचा अंत्यसंस्कार करण्यास तयार झाला. रावण महादेवाचा थोर भक्त होता. भक्तीच्या बळावर त्याने प्रचंड बळ आणि सिद्धी हस्तगत केल्या होत्या, ज्याचा त्याला गर्व झाला होता. श्रीरामांनी रावणाचा वध करून केवळ त्याची भूलोकीची यात्रा संपवली नाही, तर त्याचे गर्वहरण करून त्याचा कायमचा उद्धारही केला.
आदर्श पुत्र ः
श्रीराम सर्वार्थाने आदर्श पुत्र होते. प्रभू श्रीरामाच्या राज्याभिषेकाची सिद्धता सुरू असतानाच सावत्र आई कैकयीने जेव्हा श्रीरामाच्या वनवासाच्या हट्ट धरला तेव्हा कोणतेही आढेवेढे न घेता श्रीरामाने वनवासात जाण्यास तत्परतेने होकार दिला. वल्कले परिधान केली आणि वनवासात जाण्यासाठी सिद्ध झाले. वनवासाहून आल्यानंतर श्रीरामांनी कैकयी मातेचे आशीर्वाद घेतले. कोणताही पूर्वग्रह न बाळगता ते कैकयी मातेशी पूर्वीप्रमाणे प्रेमाने वागू लागले. कुठे सत्तेच्या हव्यासापोटी आपल्या रक्ताच्या नातेवाइकांशी वैराने वागणारे हल्लीचे राज्यकर्ते आणि कुठे वडिलांनी सावत्र आईला दिलेल्या वचनाच्या पूर्ततेसाठी क्षणार्धात सार्या वैभवावर पाणी सोडणारे प्रभू श्रीराम!
आदर्श बंधू ः
आजही दोन भावांत प्रेमाचे नाते दिसले की, त्यांना आपण श्रीराम-लक्ष्मणाची जोडी म्हणून संबोधतो. यावरून श्रीराम आणि लक्ष्मण यात किती प्रेमाचे नाते होते हे लक्षात येते. वनवास श्रीरामांना देण्यात आला होता मात्र, लक्ष्मणाने सारे वैभव सोडून श्रीरामांची साथ दिली. श्रीरामांनीही संपूर्ण वनवासकाळात लक्ष्मणाची सर्वार्थाने काळजी घेतली. बंधू वनवासात गेला असताना अयोध्येचे राज्य उपभोगायची संधी मिळाल्यावरही भरताने श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून विश्वस्त म्हणून राज्याचा कार्यभार सांभाळला. यावरूनच श्रीरामांनी भरताला काय ताकदीचे बंधुप्रेम दिले होते याची कल्पना येते. ज्या काळात रावणाने बंधू विभीषणाला सापत्न वागणूक दिली. वालीने बंधू सुग्रीवावर अन्याय केला होता त्याकाळात आदर्श बंधुप्रेमाचा परिपाठ श्रीरामांनी घालून दिला. वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकाधिक वाटा मिळण्यासाठी एकमेकांचा जीव घेण्यास उठणार्या आताच्या बंधूंनी श्रीराम-लक्ष्मणाच्या नात्यातून बोध घ्यायला हवा.
संघटन कुशलता ः
रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर श्रीविष्णूचा अवतार असलेले श्रीराम रावणाला सहजपणे पराभूत करून सीतेला घेऊन येऊ शकले असते. एका हाताने शिवधनुष्य पेलणार्या श्रीरामाचे सामर्थ्य काय होते, याची कल्पना रावणालाही होती. अयोध्येहून सैन्य मागवून रावणावर चाल करूनही श्रीराम जाऊ शकले असते. मात्र, त्यांनी तसे न करता वानरसेनेला संघटित करून त्यांची मने जिंकली आणि असुरी शक्तीविरोधात लढण्यासाठी मोठी फौज सिद्ध केली. वालीचा वध करून सुग्रीवाला जवळ केले. यावरून श्रीरामांमधील संघटनकौशल्य लक्षात येते.
एकपत्नीव्रत ः
ज्या काळात राजे आणि राजपुत्र अनेक विवाह करत त्या काळातही प्रभू श्रीरामांनी एकपत्नीव्रत आचरले होते. वनवासाहून आल्यानंतर एका परटाच्या संशयावरून श्रीरामांनी सीतेचा त्याग केला. पुढे अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी पत्नीची आवश्यकता असताना प्रभू श्रीरामांनी दुसरा विवाह न करता सीतामातेची प्रतिकृती बनवून ती पत्नी म्हणून सोबत बसवली. पत्नीप्रति त्यांची निष्ठा या एका उदाहरणावरून लक्षात येते.
त्याग आणि साधेपणा ः
सावत्र माता कैकयीच्या वचनाचा आदर ठेवून त्यांनी एका क्षणात सार्या राजसुखाचा त्याग करून वल्कले परिधान केली. वनवासात काट्याकुट्यातून अनवाणी चालले. झोपडीत राहून कंदमुळे खाल्ली, जमिनीवर झोपले. जंगलातील वानरांना आणि अस्वलांना त्यांनी प्रेमाने जवळ केले. शबरीची उष्टी बोरे खाल्ली. यातून श्रीरामांतील त्यागाची आणि साधेपणाची जाणीव प्रकर्षाने होते. हल्लीचे राजकारणी निवडणुका आल्या की, छायाचित्रे काढण्यापुरते गरिबांच्या झोपड्यांत जाऊन जेवतात (हे जेवणही फाइव्हस्टार हॉटेलमधून मागवलेले असते.) कुठे अंगीभूत साधेपणा असलेले प्रभू श्रीराम आणि कुठे साधेपणाचा आव आणणारी आताची राजकीय मंडळी. पुत्रवियोग सहन न झाल्याने राजा दशरथांनी प्राणत्याग केला. हे वृत्त प्रभू रामचंद्रांना कळताच त्यांनी पितृवियोग न करता त्यांच्या पुढील गतीसाठी श्राद्धकर्म केले. यातून त्यांनी धार्मिक विधींचे महत्त्व अधोरेखित केले आहे. सीताहरण झाल्यानंतर सीतेच्या वियोगाने
दुःखी झालेल्या श्रीरामांनी झाडांना कवटाळल्याचे संदर्भ आढळतात. मात्र, भविष्याचेही ज्ञान असलेल्या श्रीरामांचा हा वियोग केवळ दाखवण्यापुरता होता. झाडांना मिठी मारून श्रीरामाने अनेक शापित जीवांना जन्म-मृत्यूच्या फेर्यातून कायमचे मुक्त केले. शबरीची भेट घेऊन आणि तिने दिलेली उष्टी बोरे खाऊन शबरीचाही उद्धार केला. अशी एक ना अनेक गुणवैशिष्ट्ये रामायणाच्या वाचनातून लक्षात येतात. यंदाच्या श्रीराम नवमीच्या पावनदिनी आपल्यातही श्रीरामांसारखे गुण यावेत यासाठी प्रभू श्रीरामांच्याच चरणी शरणागत होऊन प्रार्थना करूया!
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…