अग्रलेख

उद्याचा काळ कठीण

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर 28 फेब्रुवारीपासून सुरू केलेले हल्ले अद्याप थांबलेले नाहीत किंवा पश्चिम आशियात युद्ध सुरूच आहे. युद्धाविषयी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत बरीच उलटसुलट विधाने केली आहेत. सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी युद्धात मरण पावल्यानंतरही इराणने तसूभरही माघार घेतलेली नाही. दुसरीकडे, इराणने हॉर्मझ सामुद्रधुनी बंद केल्याने जगभर होणार्‍या इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. युद्धाचे चटके सर्वच देशांना बसत असून, त्यात भारत आहेच. भारतावर विशेषतः भारतीयांवर झालेले परिणाम सर्वत्र दिसत आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर भारताची भूमिका स्पष्ट झाली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेतून तोडगा काढून युद्ध थांबविण्याचे नेहमीप्रमाणे आवाहन केले. मात्र, त्यांनी जाहीररीत्या कोणतेही भाष्य केले नाही की, मत मांडले नाही. पंतप्रधान गप्प का बसले आहेत? असा सवाल विरोधी पक्षांकडून केला जात होता. युद्ध सुरू होऊन तीन आठवडे उलटल्यानंतर पंतप्रधानांनी संसदेत भाषण केले. त्यांच्या भाषणात सावधपणा होता आणि युद्धाच्या परिणामांची चिंता होती. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने सज्ज राहण्याचे आवाहन त्यांनी केले. या युद्धाने भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने उभी केली आहेत. ही आव्हाने आर्थिक, राष्ट्रीय सुरक्षेशी निगडित आणि मानवतावादी अशा तिन्ही पातळ्यांवर आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. युद्धग्रस्त देशांशी भारताचे मोठे व्यापारी संबंध आहेत. हा प्रदेश इतर देशांशी व्यापारासाठी विशेषतः कच्चे तेल आणि वायूच्या गरजेसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. शिवाय सुमारे एक कोटीहून अधिक भारतीय या प्रदेशात राहतात व काम करतात. त्यामुळे भारताची चिंता स्वाभाविकपणे अधिक आहे. हॉर्मझ सामुद्रधुनीसारख्या जलमार्गांमध्ये अडथळा आल्याने भारतीय जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सतत प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘अशा संकटाच्या काळात काही घटक परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात,’ असा इशारा पंतप्रधानांनी दिला. किनारपट्टी सुरक्षा, सीमा सुरक्षा आणि सायबर सुरक्षा यांसह कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या सर्व यंत्रणांना सतर्क केले असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना महामारीच्या काळाप्रमाणेच एकजुटीने या आव्हानाला सामोरे जाण्याचे आवाहनही त्यांनी केले. ‘कठीण जागतिक परिस्थिती दीर्घकाळ राहू शकते. त्यामुळे आपण सज्ज आणि एकजूट राहिले पाहिजे,’ असे विधान करून त्यांनी एकप्रकारे चिंता व्यक्त केली. युद्धामुळे चिंता व्यक्त करण्यासारखी परिस्थिती आहेच. गॅससारख्या इंधनावर अवलंबून असलेल्यांना युद्ध सुरू झाल्यापासून चिंता लागली आहे. आजच्या परिस्थितीत सरकार काय करत आहे, याविषयी भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. उलट आगामी काळ भारतासाठी चिंताजनक असल्याचे सूचित करताना सावध राहण्याचा सल्ला दिला. कोरोना काळात ज्या संकटांचा सामना केला तशाच संकटांसाठी आपल्याला आता तयार राहावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. युद्धामुळे संपूर्ण जगातच मोठी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे त्याचे परिणाम भारतावरही होणार आहेत. या परिणामाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला आता एकजुटीने तयारी केली पाहिजे, असे ते म्हणाले. पण या संकटाचा सामना करण्यासाठी सरकार काय करीत आहे, यावर त्यांनी फार भाष्य केले नाही. युद्धाविषयी पंतप्रधान अजिबात बोलत नव्हते. ते जे बोलले, त्यातून लोकांना मनापासून दिलासा मिळाला नाही. देशात स्वयंपाकाच्या गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. सिलिंडरचा काळाबाजार होत आहे. लोक हवालदिल झाले आहेत. इंधनाचा तुटवडा निर्माण झालेला नाही, असे सरकारकडून मोघमपणे सांगितले जात असले, तरी इंधनाच्या किमती प्रत्यक्षात भडकल्या आहेत. लोकांना कोणताही दिलासा सरकारकडून मिळत नाही. मोदींच्या भाषणात दिलासादायक काही नव्हते, तर उद्याची चिंता होती. येणारा काळ अडचणीचाच असेल आणि युद्धाचे दूरगामी परिणाम देशाला बराच काळ भोगावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केल्याने लोकांना दिलासा मिळूच शकला नाही. कोरोना काळात आपण कसा एकजुटीने मुकाबला केला याचीही आठवण त्यांनी सांगितली. पण कोरोना काळात सरकारचे प्रचंड अपयशच लोकांना पाहायला मिळाले होते. कोणत्याही नियोजनाशिवाय पुकारण्यात आलेला लॉकडाउन, ऑक्सिजन पुरवठ्यासह वैद्यकीय मदत सामग्रीच्या पुरवठ्यात देशभर निर्माण झालेले अडथळे, लशीच्या वाटपाचे फसलेले नियोजन, लॉकडाउनमुळे स्थलांतरित मजुरांचे झालेले हाल, अशा बर्‍याच गोष्टी विसरल्या गेलेल्या नाहीत. युद्ध किती काळ चालणार, याविषयी काही सांगता येत नाही. युद्ध लांबले किंवा दीर्घकाळ चालले, तर कोणती संकटे उभी राहतील, याचा काही अंदाज लागत नाही. संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी सरकारने काय आणि कोणते नियोजन केले आहे, हे पंतप्रधानांनी सांगायला पाहिजे होते. युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करायला पाकिस्तान पुढे येत आहे किंवा तशी तयारी दाखवत असताना भारताची भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित करायला पाहिजे होती. युद्ध सुरू होण्याच्या दोन दिवस आधी पंतप्रधान इस्रायलच्या दौर्‍यावर होते. युद्ध सुरू झाल्यानंतर पंतप्रधानांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना फोन केला. इराणवरील हल्ल्यांचा भारताने निषेध केला नाही. अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल भारताने फार उशिरा दु:ख व्यक्त केले इत्यादी घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही सांगितले नाही. पुढचा काळ कठीण असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. या युद्धाचे परिणाम केवळ आपल्या देशालाच नाही, तर जगाला भोगावे लागत आहेत. पुढेही भोगावे लागतील, याची जाणीव त्यांनी करवून दिली. हाच त्यांच्या भाषणाचा मथितार्थ.

Tomorrow is a difficult time

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago