नाशिक

गोठ्यात बैल घटले; पोळ्याच्या बाजारात भाव मात्र भडकले!

यांत्रिकीकरणाचा परिणाम; डांगी जोडी 70-80 हजारांवर, शर्यतीच्या बैलांना लाखोंचा भाव

सिन्नर : प्रतिनिधी
कधीकाळी शेतकर्‍याच्या गोठ्याची शान असलेली बैलजोडी आता हळूहळू इतिहासजमा होत आहे. ट्रॅक्टरने बैलांची जागा घेतली, तर दुग्ध व्यवसायात जर्सी गायींनी गावठी गायींना मागे टाकले. परिणामी, बैलांची संख्या घटली असली तरी बैलपोळ्याच्या तोंडावर मात्र बाजारात या बैलांना अचानक ‘डिमांड’ वाढली आहे. पोळ्याच्या आदल्या बाजारात मागणी वाढल्याने बैलजोडीच्या किमतीत तब्बल 10 ते 20 हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गोठ्यात दुर्मीळ झालेला बैल पोळ्याच्या काळात मात्र चांगलाच ‘भाव खाऊ’ लागला आहे.
बैलपोळ्याच्या आदल्या बाजारात काही शेतकरी केवळ पूजा आणि पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी बैलजोडी खरेदी करतात. त्यामुळे या काळात अचानक मागणी वाढून बाजारभावही चढतो. विशेष म्हणजे, पोळा संपल्यानंतर यातील काही बैल पुन्हा विक्रीसाठी बाजारात आणले जातात. त्यामुळे पोळ्याच्या काळातील बैलांची मागणी ही मोठ्या प्रमाणावर सणकेंद्री असल्याचे चित्र आहे. सिन्नर, नाशिक, घोटी, लासलगाव, नामपूर, नांदगाव आणि खेडगाव परिसरातील बाजारपेठांमध्ये सध्या डांगी जनावरांचे प्रमाण अधिक आहे. शेतीकामासाठी उपयुक्त आणि मजबूत डांगी बैलजोडीला साधारण 70 ते 80 हजार रुपये मोजावे लागत आहेत. खिलार व गावठी बैलजोडीचा भाव 50 हजारांपासून एक लाख रुपयांपेक्षा पुढे जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी डांगी बैलांना शेतीकामासाठी विशेष पसंती देतात. तर
ऊसतोडीसाठी खिलार आणि गावठी बैलजोडीला मागणी असल्याचे
चित्र आहे.

बैलपोळ्यामुळे परंपरेला उजाळा
गोठ्यात बैलांची संख्या कमी झाली असली तरी शेतकर्‍यांच्या मनातील बैलाचे स्थान अद्याप कायम आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते, गोड नैवेद्य दाखविला जातो आणि गावातून मिरवणूक काढली जाते. यंत्रांच्या युगात शेतीतून बैलांची भूमिका कमी झाली असली, तरी बैलपोळा मात्र या पारंपरिक पशुधनाला दरवर्षी पुन्हा मानाचे स्थान देतो.

शर्यतीच्या बैलांना लाखमोलाचा भाव
भरदार शरीरयष्टी, वेग आणि चपळाई, वंश यावर शर्यतीच्या बैलांची किंमत ठरते. त्यामुळे अशा बैलांना 50 हजारांपासून लाखो रुपयांपर्यंत भाव मिळतो. विशेषतः टांगा शर्यतीतील बैलांचे व्यवहार बाजारपेठेपेक्षा थेट शेतकर्‍यांच्या खुंट्यावर किंवा शर्यतीच्या ठिकाणीच होतात. त्यामुळे बाजारात टांगा शर्यतीचे बैल विक्रीसाठी अत्यल्प प्रमाणात येतात.
गोठ्यात बैलाऐवजी दारासमोर ट्रॅक्टर!
बैलांची संख्या घटण्यामागे शेतीचे वाढते यांत्रिकीकरण हे प्रमुख कारण ठरत आहे. बैलांसाठी लागणारा चारा, देखभाल आणि मनुष्यबळाचा खर्च पाहता अनेक शेतकरी बैलजोडी ठेवण्यास तयार नाहीत. नांगरणी, पेरणी, मळणीसह शेतीची अनेक कामे ट्रॅक्टर व यंत्रांद्वारे होत असल्याने बैलांची शेतीतील गरजच कमी झाली आहे. परिणामी, अनेक गावांमध्ये पोळ्याच्या दिवशी बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरची मिरवणूक काढत असल्याचे चित्र आहे.
जर्सीच्या नादात गावठी पैदास घटली
पूर्वी गावठी गायी शेतकर्‍यांच्या गोठ्याचा अविभाज्य भाग होत्या. त्यातून गावठी आणि खिलार बैलांची पैदास होत असे. मात्र, भरमसाठ दूध उत्पादनासाठी जर्सी गायींना वाढती पसंती मिळाल्याने गावठी गायींचे संगोपन कमी झाले आहे. जर्सी गायींच्या पैदाशीतून जन्मलेल्या गोर्‍ह्यांचे संगोपन करण्यासही अनेक शेतकरी फारसे इच्छुक नसल्याने बैलांची उपलब्धता आणखी घटली आहे.
बाजारातील आवकही निम्म्यावर
पोळ्याच्या आधी बैलजोडीला मोठी मागणी असते. विशेषतः पूजेसाठी बैल खरेदी करणारे ग्राहक वाढतात. त्यामुळे चांगल्या बैलांच्या किमतीत 10 ते 20 हजार रुपयांपर्यंत वाढ होते. डांगी, खिलार आणि गावठी बैलांना मागणी आहे. मात्र, पूर्वीच्या तुलनेत आता किरकोळ स्वरूपातच बैल बाजार भरतात. बाजारात बैलांची आवकही निम्म्याने घटली आहे. पोळ्यानंतर मागणी पुन्हा कमी होते, अशी माहिती एका बैल व्यापार्‍यांनी दिली.

The number of bullocks in the cattle sheds has dwindled, yet prices at the Pola market have skyrocketed!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

दुष्काळप्रश्नी हवी जलद कार्यवाही

- आनंदा जाधव शासनाने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर दुसर्‍या यादीत राहिलेले तालुके समाविष्ट…

2 days ago

मीच जर नसेल तर?

- प्रशांत पोतदार क्षणभर कल्पना करून बघा बरं. मीच जर माझ्या कुटुंबात नसेल तर? असा…

2 days ago

सिंहस्थाचा श्रीगणेशा; विघ्नांचा मात्र ससेमिरा!

- अश्विनी पांडे सिंहस्थाच्या कामांना सुरुवात होण्यास झालेला विलंब, निविदाप्रक्रिया आणि निधी मंजुरीसाठी लागलेला वेळ,…

2 days ago

पक्षांतर्गत शह-काटशह

- गोरख काळे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाची प्रक्रिया सुरू झाली असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महासभा होऊन…

2 days ago

हृदगत गुरू : बाळासाहेब वाघ

तव प्रतिभेचे रंग किती तू मज दाखवले साक्षात्कार, विभावन, अनुभूती, दृष्टान्त असे सगळे एकाच जन्मी…

2 days ago

मी करीन ती पूर्व!

रशियाकडून तेल घेऊ नका, अशी दवंडी पिटणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर…

2 days ago