संपादकीय

पंढरीची वारी

– जगन घाणेकर
महाराष्ट्राला साधू-संतांची भूमी असे म्हटले जाते. वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे सर्वांत मोठे भूषण आहे आणि आषाढी-कार्तिकी एकादशीनिमित्त केली जाणारी पंढरपूर वारी हा राज्यातील सर्वांत मोठा महोत्सव असतो. आषाढीची वारी आज गिनीज बुकात नोंदली गेली आहे. आपली सारी व्यावहारिक कामे बाजूला सारून केवळ भगवंताच्या मुखदर्शनासाठी वारकरी पायपीट करत निघतो. या पायपिटीमध्ये तब्येतीची चिंता, खाण्यापिण्याची व्यवस्था, घरच्या पोराबाळांची काळजी सारे काही त्या पांडुरंगावर सोडून वारकरी भगवी पताका घेऊन पंढरीची वाट धरतो आणि तो भक्ताच्या भक्तीच्या भुकेला आसुसलेला पांडुरंगही आपल्या भक्ताची सर्वार्थाने काळजी वाहतो. पांडुरंगाच्या आणि भक्ताच्या अतूट नात्याच्या मिलानोत्सवाला विज्ञानाचे तराजू तोलू शकेल का? वारकरी संप्रदायाने या महाराष्ट्राला अनेक संत दिले. विठुरायाच्या भक्तीत लीन होऊन या संतांनी साक्षात विठुरायाला प्रसन्न केले. विशेष म्हणजे, जात-पात यांच्या पलीकडे भक्ती असते, याचा प्रत्यक्ष अनुभव विठुरायाने आपल्या भक्तांना दिला आहे. ज्या काळात स्पृश्य-अस्पृश्यता पाळली जात होती, गरीब-श्रीमंती भेदाभेद होता त्याही काळात विविध जातीचे विठुरायाचे भक्त संतपदी विराजमान झाले आहेत. पिढीजात श्रीमंतापासून अत्यंत गरीबही आपल्या भक्तीच्या बळावर विठूमाउलीला प्रिय ठरला आहे. भगवंताच्या दरबारात जाती-पातीला, गरीब-श्रीमंती भेदभेदाला कवडीचीही किंमत नाही हेच भगवंताने या उदाहरणांतून दाखवून दिले आहे. विठुरायाच्या भक्तीमध्ये लीन होताना आलेल्या अनुभूती आणि मिळालेले ज्ञान या संत मंडळींनी अभंग, ओवी, गवळण आणि भारूड यांच्या माध्यमातून येणार्‍या पिढीसाठी साध्या सरळ शब्दांत मांडून ठेवले. या संतांचे साहित्य वाचले की, अध्यात्म किती सोपे आहे, याची जाण होते. या समस्त ज्ञानगंगेचे सार म्हणजे भगवंताचे नामस्मरण! ज्ञानेश्वर माउली म्हणतात, ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी’. तर तुकोबाराय सांगतात, ‘नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची’.. सर्वच संतांनी नामस्मरणाची महती त्यांच्या त्यांच्या शब्दात वर्णिली आहे. भगवंताच्या प्राप्तीचा सर्वांत सुलभ मार्ग म्हणजे नामस्मरण. वारकर्‍यांना वारीमध्ये शेकडो मैलाचे अंतर चालण्याचे बळ देणारे माध्यमसुद्धा श्री विठ्ठलाचे नाम तर आहे. कलियुगातील हीच सर्वोत्तम साधना आहे. त्यामुळे संतांनी नामाचे महत्त्व जागोजागी अधोरेखित केले आहे. संत सावता माळी यांनी पंढरीला न जाताही नामाच्या बळावर श्री विठ्ठलाला प्रसन्न केले.
नामसाधना अशी साधना आहे जिला वेळेचे, स्थानाचे आणि काळाचे बंधन नाही. ‘रामसे बडा रामका नाम’ हे प्रत्यक्ष श्रीरामांनीही वानरसेनेच्या माध्यमातून सार्‍या जगाला दाखवून दिले. अर्जुनाचा अंतर्मनात श्रीकृष्णाचा जप अखंड चालू असे, त्यामुळे त्याने सोडलेला बाण लक्ष्यभेद घेई. छत्रपती शिवाजी महाराज सदैव ‘जगदंब जगदंब’ असा जप करत ज्याच्या सामर्थ्यावर त्यांना पातशाह्यांविरुद्ध लढण्यासाठी आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आध्यात्मिक बळ मिळाले. नामस्मरणाचा महिमा आता विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध झाला आहे. आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन घडवून आणणारा दुवा म्हणजे नाम. चार युगाच्या कालखंडातील सध्या कलियुग सुरू आहे. कलियुगातील सामान्य जनावरील व्याप पाहता भगवंताने साधी सोपी नामसाधना सांगितली आहे. केवळ अखंड नामाने कोणीही भगवंताची प्राप्ती करू शकतो. परंतु, कलियुगातील रज-तमाचे प्रदूषण पाहता नामजपाची अखंडता साधने तितकेही सोपे नाही. त्यासाठी नामाच्या जोडीला सत्संग, सेवा, त्याग, प्रीती (निरपेक्ष प्रेम) यांचे महत्त्व भगवंताने सांगितले आहे. यांची जोड दिली तर हळूहळू नामाचा संस्कार अंतर्मनावर होऊ लागतो. नामाची अखंडता साधल्यावर चराचरात भगवंताचा वास असल्याची अनुभूती येते, मग भगवंताला भेटण्यासाठी कुठे अन्यत्र जाण्याची आवश्यकताच भासत नाही. भारताच्या सांस्कृतिक इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यामध्ये भगवंत स्वतः भक्ताकडे आला आहे, भगवंताने भक्ताची सेवा केल्याचीही कित्येक उदाहरणे आहेत. दरवर्षी राज्यातील अनेक ठिकाणी मंदिरांतून, मोठमोठ्या मैदानातून विविध महाराज आणि कीर्तनकार यांची कीर्तने, हरिनाम सप्ताह चालतात. या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी असते.
कीर्तन जरी भागवतावर अथवा रामायणावर असले तरी या सर्वांचे सार ‘नाम’ हेच असते. या कीर्तनांत लोक माना डोलावताना, लीन होताना दिसतात, मात्र यांपैकी किती जण कीर्तनाचे सार म्हणजेच ‘नाम’ घेण्याचा प्रत्यक्षात प्रयत्न करतात. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. श्रवणभक्तीला अध्यात्मात अल्प महत्त्व आहे, तर प्रत्यक्ष कृतीला अधिक महत्त्व आहे. कीर्तनात येऊन ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा’ म्हणत माना डोलवल्या आणि हरीचे नाम घेण्याचा प्रयत्नच केला नाही, तर देव कसा आपल्याला जवळ करेल? त्यामुळे कीर्तन, प्रवचन हे केवळ ज्ञानार्जनाचे माध्यम नसून, कृतीला प्रवृत्त करण्याचे साधन आहे. घरी चित्रपट आणि सासू-सुनांचे कार्यक्रम पाहत बसण्यापेक्षा कीर्तन, प्रवचनांना जाणे नक्कीच श्रेष्ठ आहे; मात्र अध्यात्मात पुढे जायचे असेल, त्यातील आनंद मिळवायचा असेल, तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही.

The Pilgrimage to Pandharpur

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago