इस्रोने टिपले रौद्ररूप, आंध्र किनारपट्टीकडे झेप
नवी दिल्ली : प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात घोंघावणार्या चक्रीवादळ ’अर्नाब’ ने आता रौद्ररूप धारण केले आहे. इस्रोच्या उपग्रह निरीक्षणात हे वादळ अधिक तीव्र होताना दिसत आहे. हवामान खात्याने (आयएमडी) आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
सोमवारी पहाटे 5.30 वाजता हे वादळ विशाखापट्टणमपासून सुमारे 650 किमी पूर्व-दक्षिण पूर्वेला मध्य बंगालच्या उपसागरात केंद्रित होते. आयएमडीच्या माहितीनुसार, हे वादळ मध्यरात्रीपर्यंत ’तीव्र चक्रीवादळ’ आणि 27 ऑक्टोबरपर्यंत ’अतितीव्र चक्रीवादळ’ मध्ये रूपांतरित होईल.
हे वादळ 28 ऑक्टोबर रोजी सकाळी बापटला आणि विशाखापट्टणमदरम्यान आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी वार्याचा वेग ताशी 115 ते 125 किमी असेल आणि झंझावात 140 किमी प्रति तासापर्यंत पोहोचेल. किनारपट्टीवर 1.5 मीटर उंचीच्या लाटा आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत सध्या पावसाची शक्यता कमी मात्र 29 ऑक्टोबरपासून आर्द्रता
वाढेल.
विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. थोडक्यात, महाराष्ट्रात या चक्रीवादळाचा थेट तडाखा बसणार नाही, पण त्याच्या शेपटामुळे काही भागात अंशतः परिणाम जाणवेल. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शेतकर्यांनी काढणीला आलेल्या पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
महाराष्ट्रात काय परिणाम होणार?
आंध्र प्रदेशवर थेट धडक होत असली, तरी या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता आहे. थेट वादळाचा धोका नसला तरी अरबी समुद्रातून येणार्या बाष्पयुक्त वार्यांमुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. 27 ते 30 ऑक्टोबरदरम्यान तुरळक ते विखुरलेल्या ठिकाणी पाऊस. बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण.28-29 ऑक्टोबर आणि पुन्हा 31 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता. पुणे, सातारा, सांगली, नाशिक, अहिल्यानगरमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस. 28 ते 31 ऑक्टोबरदरम्यान तुरळक ते मध्यम पाऊस. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा राहील.
The threat from Cyclone ‘Arnab’ has increased.