… हे तर उशिरा सुचलेले शहाणपण

महापालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता आल्यानंतर प्रभागापासून ते शहरात विविध समस्यांचा जो बोजवारा उडालेला होता, तो मार्गी लागेल, अशी अपेक्षा नाशिककरांची होती. कारण शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्ते, पाणी, स्वच्छतेसह इतर मूलभूत सुविधांसाठी नागरिकांची तारांबळ उडते आहे. पाणीबाणी तर नाशिककरांना पूजलेलीच आहे. त्यातच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एकाचवेळी रस्ते खोदल्याने नागरिकांचे होणारे हाल पाहतच आहोत. सध्या शहरातल्या रस्त्यांची अवस्था रोज मरे त्याला कोण रडे, अशी आहे. प्रशासनाच्या अनागोंदीमुळे नागरिक वैतागले आहेत. नागरिकांचा त्रास पाहून महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे यांनी अचानक गंगापूर रोड परिसरात रस्तेकामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या संथगतीवरून बांधकाम विभागाला धारेवर धरले. कुठेही अपघात घडल्यास ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला. दरम्यान, महापौरांच्या पाहणीनंतर बांधकाम विभागाला उशिराने शहाणपण सुचले. सतरा ठेकेदारांना नोटिसा धाडल्या. मात्र, रस्तेकाम संथगतीने सुरू असतानाही बांधकाम विभागाने आधीच नोटिसा का बजावल्या नाहीत? ठेकेदार व बांधकाम विभागात काही साटेलोटे आहे का? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्ताने नाशिक महापालिका हद्दीत प्रथम 18 व नंतर नऊ रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली. महापालिकेने या कामांनी दिलेल्या कार्यारंभ आदेशानुसार एप्रिलअखेरपर्यंत 25 टक्के कामे पूर्ण होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात 15 टक्केच कामे झाली आहेत. यामुळे कामांचा अपेक्षित वेग न राखू शकलेल्या 18 कंत्राटदारांना नाशिक महापालिकेच्या बांधकाम विभागाने कामाच्या संथगतीबद्दल आणि वेळापत्रकातील टप्पे न पाळल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वी रस्त्याच्या कडेला भूमिगत बहुउपयोगी (युटिलिटी) डक्ट उभारण्यात येत असून, त्या कामांना उशीर होत असल्याने रस्तेकामांचा वेग संथ असल्याचे बोलले जात आहे. मात्र, कामांचा हा वेग असाच राहिल्यास 31 मार्च 2027 पर्यंत कामे पूर्ण होण्याबाबत साशंकता आहे. नाशिक महापालिका हद्दीत 1270 कोटींच्या निधीतून 27 रस्तेकामांना मंजुरी देण्यात आली आहे. ही कामे 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आहेत. परंतु विद्यमान स्थितीत सुरू असलेली कामे पाहता दिलेल्या मुदतीत ती पूर्ण होण्यावरून अधिकार्‍यांमध्ये काहीशी भीती आहे. या प्रकल्पांतर्गत भूमिगत युटिलिटीचे स्थलांतर, रस्ते रुंदीकरण, काँक्रीट व डांबरीकरण, मध्यभागी दुभाजक (मिडियन) आणि पदपथांची उभारणी, तसेच अंतर्गत व बाह्य रस्तेजोडणी सुधारण्याची कामे करण्यात येत आहेत. या रस्त्यांची कामे सुरू करण्यापूर्वी दीर्घकालीन नियोजनाचा भाग म्हणून महापालिका महत्त्वाच्या मार्गांवर एकात्मिक युटिलिटी डक्ट प्रणाली उभारण्यावर भर देत आहे. युटिलिटी डक्टची कामे पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वीजवाहिन्या आणि दूरसंचार यांसारख्या सर्व सेवा एकाच भूमिगत डक्टमधून नेल्या जातील. त्यामुळे भविष्यात दुरुस्ती किंवा नवीन जोडण्यांसाठी वारंवार रस्ते खोदण्याची गरज भासणार नाही. यामुळे युटिलिटी डक्टची कामेही महत्त्वाची आहेत. भूमिगत डक्टची कामे पूर्ण झाल्याशिवाय त्या भागातील रस्त्यांची कामे सुरू करता येत नाहीत. मात्र, या भूमिगत युटिलिटी डक्टच्या कामांना विलंब होत असल्याने त्याचा परिणाम रस्त्यांच्या कामांवर होत आहे. युटिलिटी डक्टचे काम 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मुदतवाढ देऊनही बहुतेक प्रकल्प अपूर्णच आहेत, आता 30 एप्रिलची अंतिम सुधारित मुदतही संपुष्टात आली आहे, तरीही ती कामे पूर्ण झालेली नाहीत. यामुळे या युटिलिटी डक्टच्या कामांना पुन्हा मुदतवाढ देण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. रस्त्यांचे सरासरी 25 टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सरासरी केवळ 15 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सर्व कंत्राटदारांना कामकाजाचा वेग वाढविण्याचे आणि वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याचे
निर्देश महापालिकेच्या बांधकाम विभागाने दिले आहेत. सध्या शहरातील प्रमुख आणि वाहतूकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहते. यांपैकी सुमारे निम्म्या रस्त्यांवर व्हाइट टॅपिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या 28 रस्त्यांच्या विकासासाठी 1,270 कोटींंचा खर्च
अपेक्षित आहे.
दरम्यान, रस्ताकामे सुरू असताना अनेक ठिकाणी पाइपलाइन फुटत असल्याने त्या परिसरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे. नागरिक यावरून नगरसेवकांनाच याचा जाब विचारत आहेत. यावरून मात्र बांधकाम व पाणीपुरवठा विभागात संघर्ष पेटला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या महासभेत महापौरांनी शहरातल्या पाणीबाणीवर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रत्यक्षात अद्याप सहाही विभागांत कुठे ना कुठे पाण्याची सम्स्या आहे. यासह ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने अपघाताची स्थिती आहे. शिवाय, सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. तीव्र ऊन असल्याने हवेत धूळ खूपच त्रासदायक ठरत आहे. कोणत्या रस्त्याने जावे हे नाशिककरांना सध्या तरी समजत नाही. कारण सर्वच मुख्य रस्ते खोदून ठेवले आहेत. बाहेरून येणार्‍या वाहनधारकांची तर काय तारांबळ होत असेल, हे सांगणेही कठीण आहे.
दरम्यान, बांधकाम विभागाने ज्या ठेकेदारांना नोटिसा धाडल्या आहेत, त्यानंतर त्यांच्या कामात सुधारणा होईल की नाही, हे येत्या काही दिवसांतच समजेल. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार नाशिकचे ब्रँडिंग करणार आहे. तत्पूर्वी, शहरात रस्ते, पाण्याचा जो बोजवारा उडालेला आहे त्याकडे लक्ष द्यावे लागेल. ज्या 29 रस्त्यांची कामे होणार आहेत तेथे जवळपास पाचशेहून अधिक झाडे तोडावी लागणार आहेत. मात्र, सध्या वृक्षतोडीचे प्रकरण हरित लवादात गेले असून, 19 जूनपर्यंत वृक्षतोडीवर स्थगिती दिली आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे पूर्ण होण्यात साशंकता व्यक्त केली जात आहे.

… This is late-come wisdom.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *