फुटपाथची कोंडी करणारे रडारवर

आजपासून मोहीम, सहाही विभागांत कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील रस्त्यांंवर अनधिकृतपणे टपर्‍या, गाडे टाकून रस्त्यांसह फुटपाथ अडवणार्‍यांवर (ब्लॉक) महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फुटपाथ फर्स्ट मोहीम हाती घेतली जाणार आहे. आजपासून (दि. 1 ऑक्टोबर) सहाही विभागांत कारवाईला सुरवात करून 31 ऑक्टोबरपर्यंत शहरातील सर्व फुटपाथ अतिक्रमणमुक्त केले जाणार आहेत.
नाशिक महापालिका हद्दीतील प्रमुख रस्ते, चौक, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या फुटपाथवर विविध प्रकारचे अतिक्रमण झाले आहे. यामुळे पादचार्‍यांना फुटपाथचा वापर करणे शक्य होत नाही. परिणामी पादचार्‍यांना रस्त्यावरून चालावे लागते. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही बाब गंभीर ठरत आहे. अनेकदा अपघाताच्या घटना होऊन वाहतूक कोंडीची समस्या उदभवते. पादचार्‍यांना सुरक्षित, सलग व अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देणे, शहरातील
फुटपाथचा मूळ सार्वजनिक वापर सुनिश्चित करणे आणि फुटपाथवरील अतिक्रमणास प्रतिबंध करणे, या उद्देशाने महापालिका आजपासून फुटपाथमुक्त अभियान राबवत आहे. दरम्यान, प्रमुख रस्ते व मुख्य मिरवणूक मार्ग, प्रमुख चौक, बाजारपेठा व व्यापारी क्षेत्र, बसस्थानक परिसर, शाळा व महाविद्यालय परिसर, रुग्णालय परिसर, शासकीय कार्यालय परिसर, रेल्वे स्टेशन परिसर, धार्मिक स्थळांच्या परिसरातील प्रमुख मार्ग, वाहतूक कोंडीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. कारवाई केल्यावर पुन्हा तेथे अतिक्रमण होऊ नये यासाठी संबंधित विभागीय कार्यालयावर त्याबाबत जबाबदारी देण्यात येणार आहे.

मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे
♦ फुटपाथ पादचार्‍यांसाठी पूर्णपणे मोकळे करणे.
♦ फुटपाथवरील अनधिकृत अतिक्रमणे, हातगाड्या, स्टॉल, फलक, साहित्य व इतर अडथळे नियमानुसार हटविणे.
♦ पादचार्‍यांसाठी सुरक्षित व सलग पादचारी मार्ग उपलब्ध करून देणे.
♦ प्रमुख चौक व गर्दीच्या ठिकाणी फुटपाथचा वापर सुनिश्चित करणे.
♦ फेरीवाला क्षेत्र व ना फेरीवाला क्षेत्र यांचे नियमानुसार पालन सुनिश्चित करणे.
♦ वारंवार अतिक्रमण होणार्‍या ठिकाणांची स्वतंत्र यादी तयार करून नियमित देखरेख ठेवणे
♦ वारंवार अतिक्रमण करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे.

Those obstructing footpaths are on the radar.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *