आस्वाद

युद्धबंदीच्या दिशेने

इस्रायल, अमेरिका यांनी इराणवर केलेल्या हल्ल्यांना इराणने चांगलेच प्रत्युत्तर दिले. त्यानंतर अखेर अनेक विधाने केल्यानंतर अमेरिकेने इराणबरोबरच्या युद्धाची दोन आठवड्यांची युद्धबंदी जाहीर केली आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर या युद्धाचे मोठे परिणाम झाले. कोणत्याही विचारांशिवाय सुरु केलेले हे युद्ध अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चांगलेच अंगाशी आल्याचे दिसून आले आहे. त्यातही अमेरिका आणि त्यांच्या बगलबच्च्यांची सध्या जगभरात जाहीर छीथू होत आहे. ट्रम्प यांना इराणने दिलेला हा मोठा दणका समजला जातो. हे युद्ध लवकरात लवकर संपो आणि जगात पुन्हा शांतता नांदो, अशी इच्छा असलेल्या अनेकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

या युद्धाच्या बातम्यांच्या निमित्ताने प्रगल्भ आणि उथळ माध्यमांचीही चांगलीच पोलखोल झाली आहे. ही पोलखोल इतकी आहे की, देशातील वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीमध्ये कमालीची घसरण झाल्याचा अहवाल आला आहे. आपण लोकांना कोणत्याही पातळीवर मूर्ख बनवू शकतो हा आत्मविश्वास तोडण्यासाठी जरी या प्रकरणाचा वापर झाला, तरी शांततामय जगण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल असेल, असे समजायला हरकत नाही.
इराणकडे अण्वस्त्रसज्जता आहे, अशी आरोळी उठवत प्रत्यक्षात जगाच्या तेलाच्या बाजारावर आपला कब्जा असावा, या धोरणाने ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू केले. अमेरिकेची सैन्यसज्जता पाहाता हे युद्ध आपण चारएक दिवसांत संपवू, असे ट्रम्प यांना वाटत होते. इराणच्या राष्ट्राध्यक्षांना लक्ष्य केल्यामुळे इराणमध्ये मोठा गहजब होईल, असे त्यांना वाटले होते. इराणच्या जनतेने आणि सरकारांनी अत्यंत संयम दाखवत राष्ट्राध्यक्षांच्या मृत्यूनंतरही आपली एकजूट कायम ठेवली. एका वेगळ्याच युद्धनीतीचा अवलंब करत त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला नाकीनऊ आणले. एक निरर्थक सुरू केलेले युद्ध आता दोन आठवड्यांसाठी टळले असले तरी अमेरिका पुन्हा ते सुरू करेल, याची शक्यता फार कमी आहे. वास्तविक पाहता अमेरिकेने हे युद्ध सुरू केले असे म्हटले जात होते. मात्र, प्रत्यक्षात हे युद्ध ट्रम्प यांनी सुरू केले आणि अमेरिकन सैनिकही फार मन लावून लढले नाहीत. खुद्द ट्रम्प यांना त्यांच्याच देशातून प्रचंड विरोध झाला. लाखो लोक अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये रस्त्यांवर उतरले. आमची मुले कारण नसताना युद्धाच्या खाईत का लोटत आहात, असा प्रश्न त्यांनी ट्रम्प यांच्यासमोर उभा केला. अमेरिकेतील लोकशाही समर्थ आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष हा काही सर्वोच्च अधिकारी होऊ शकत नाही. त्यांना जनतेच्या मनाचा विचार करावाच लागतो. आले बाबाजीच्या मना तिथे कोणाचे चालेना असे काही तिथे नसते. ते प्रचंड विज्ञानवादी लोक आहेत. सतत कार्यरत राहणारे आणि निर्मितीच्या क्षेत्रावर आस्था असलेले लोक आहेत. आपल्या स्वाभिमानाचे रक्षण करताना जगात आपले राज्य असावे, अशी एक सुप्त इच्छाही अमेरिकेची असते. त्याच इच्छेच्या जोरावर ट्रम्प निवडून आले. त्यानंतर त्यांचे आणि इतरांची नावे एपिस्टन फाइलमध्ये आली. जगभरातल्या ट्रम्प यांच्या बगलबच्च्यांना हा मोठा फटका होता. त्यापासून जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी ट्र्म्प यांनी हे युद्ध सुरू केले, असा आरोपही लोकांनी केला. एपिस्टन फाइलमध्ये अडकलेल्या बगलबच्च्यांनी अमेरिकेला आणि इस्रायलला आपला पाठिंबा दिला. आपण इराणवर कब्जा करू किंवा गेला बाजार एपिस्टन फाइलची चर्चा तरी थांबवू, असा त्याचा होरा होता. तो बर्‍याच अंशी यशस्वी झाला. युद्धामुळे जगात टंचाईची स्थिती निर्माण झाली. सामान्य लोकांचे लक्ष हे दैनंदिन जीवन सुरळीत चालावे याकडे असते. त्यामुळे जग, आर्थिक प्रश्न, इंधनाची टंचाई अशा विषयांमध्ये गेले. त्या सार्‍या गदारोळात एपिस्टन फाईलमध्ये नावे आलेले बाजूला झाले आणि तेच महिलांच्या सबलीकरणावर निवडणुकीत भाषणे ठोकायला मोकळे झाले.
इराणने या युद्धात नव्या कल्पना राबवल्या. त्यांनी थेट अमेरिकेवर हल्ला करण्याऐवजी आखाती देशांत असलेल्या अमेरिकेच्या विकासकामांवर हल्ले केले. अमेरिकेचा या युद्धात अधिकाधिक खर्च व्हावा आणि इराणचे कमीत कमी नुकसान व्हावे यासाठी अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांना विमानांच्या प्रतिकृतीवर हल्ले करण्यास भाग पाडले. अमेरिकेने इराणमध्ये शाळेवर हल्ला करून लहान मुलांना ठार केले. त्याउलट इराणने आम्हाला अमेरिकेच्या मुलांची काळजी आहे, असे चित्र उभे केले. बदल्याचे राजकारण न करता आत्मसंरक्षण हेच आपले या युद्धाचे धोरण आहे, हे स्पष्ट केले. अमेरिकेच्या क्षेपणास्त्राने भारतीय समुद्राच्या जवळ इराणची एक युद्धनौका बुडवली. ती वास्तविक भारतात संयुक्त युद्ध अभ्यासासाठी आली होती. त्याकडे दुर्लक्ष करून भारतीय जनतेच्या मदतीसाठी होर्मुझमधून भारतात गॅसची जहाजे येऊ दिली. राज्यकर्त्यांना बाजूला सारून थेट त्या त्या देशातील जनतेचा पाठिंबा मिळविण्याची इराणची खेळी अमेरिकेच्या अंगाशी आली. त्या-त्या देशातील राज्यकर्ते म्हणजे ते देश नव्हेत. ते त्या देशातील शंभर टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असे चित्र इराणने जगभरात उभे केले. इराणच्या भूभागावर जेव्हा हल्ले केले जात होते त्यावेळी इराणने या राज्यकर्त्यांच्या प्रतिष्ठेवरच हल्ले केले. या युद्धामुळे जगात अमेरिका आणि त्यांच्या बगलबच्च्यांची प्रतिष्ठा धुळीला मिळाली. एपिस्टन फाइलसारख्या घृणास्पद प्रकारात अडकलेली ही माणसे जगाचे आणि त्यांच्या त्यांच्या देशाचे काहीही भले करणार नाहीत, असे चित्र उभे करण्यात इराण यशस्वी झाला. हे युद्ध जमिनीवर, हवेत आणि त्याचप्रमाणे समाजमाध्यमांवरही लढले गेले. या सर्व पातळ्यांवर ट्रम्प यांना इराणने जेरीस आणले. याउलट रशिया, चीन आणि जपानसह इतर देशांची प्रतिष्ठा वाढली. इंग्लंडसह अनेक देशांनी घेतलेली सामोपचाराची भूमिका पाहून जगात ट्र्म्प आणि त्यांचे बगलबच्चे एकटे पडले. चेष्टेेचा विषय झाले. इराणने त्यांच्याच देशात घुसून त्यांची प्रतिष्ठा संपवली. हे युद्ध जगासाठी नवे होते. त्यातही उत्तर कोरियाच्या प्रमुखांनी आपल्या बाजूने धमकी देऊन जगात आपली दहशत वाढवून घेतली. त्यांनी हे रशियाच्या सांगण्यावरून केले का, याचा शोध आता जगभरातली विश्लेषक घेत आहेत. चीनने अलिप्ततावाद स्वीकारला. चीनला जगात आपला व्यापार वाढवायचा आहे. त्यामुळे एकाची बाजू घेऊन दुसर्‍याशी शत्रुत्व त्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या देशाच्या हिताचा विचार करून भूमिका स्पष्ट केली.
जगाला सध्या युद्ध परवडणारे नाही. नव्या तंत्रज्ञाने जग आता एकमेकांच्या इतके जवळ आले आहे की, आता आपल्याला एकमेकांचा सन्मान करूनच जीवन व्यतीत करावे लागणार आहे. एकमेकांवरचे अवलंबित्वही आता वाढले आहे. अमेरिका आपल्या आर्थिक शक्तीच्या जोरावर जगावर राज्य करण्याची स्वप्ने पाहत असेल तर त्याला प्रत्युत्तर मिळेल हे इराणने दाखवून दिले होते. बांगलादेशच्या निर्मितीच्या वेळी आपल्या त्या वेळेसच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही अमेरिकेचा दबाव झुगारून दिला होता. अमेरिका भले मोठी असेल. मात्र, याचा अर्थ इतर आपला स्वाभिमान गहाण टाकायला बसले आहेत, असा समज त्यांनी करून घेऊ नये, हे या युद्धाच्या माध्यमातून जगाने जवळून पाहिले आहे. अमेरिका कदाचित दोन आठवड्यांनंतर युद्ध सुरु करेल अशी स्थिती सध्या नाही. इराणचा संपूर्ण पराभव आणि शरणागती गृहीत धरता येणार नाही. इस्रायलने आपली युद्धखोर प्रवृत्ती अशीच कायम ठेवली तर त्यांनाही देशांतर्गत विरोध होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. या जगात कोणाची मनमानी चालणार नाही आणि सर्वसामान्य जनतेपेक्षा कोणीही स्वतःला मोठे समजू नये, हा संदेश या युद्धाचे फलित आहे, असे म्हणावे लागेल.

 

Towards a cease-fire

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

बोल्डनेस आणि ’ती’

इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्‍या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…

17 hours ago

एकच धर्म-निसर्ग धर्म

सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…

17 hours ago

स्वतःसाठी थोडं जगा..!

स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…

17 hours ago

गुन्हेगारीकडे नेणारे यशाचे शॉर्टकट्स

यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…

17 hours ago

परिवर्तनाकडे नेणारी कलाकृती- निळी सावळी नव्हाळी

आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना…

17 hours ago

मनाचा निचरा आणि विचारांची शुद्धता

या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…

17 hours ago