नाशिक

सुरत-चेन्नई महामार्गासाठी बाधित शेतकर्‍यांना योग्य मोबदला द्या

न्याय न मिळाल्यास रस्त्याचे काम करू देणार नाही : आमदार कोकाटे

सिन्नर : प्रतिनिधी
सुरत-चेन्नई महामार्गामुळे बाधित होणार्‍या शेवटच्या शेतकर्‍यालाही योग्य मोबदला मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. शासनाने शेतकर्‍यांना न्याय दिला नाही तर महामार्गाचे काम होऊ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री तथा आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिला.
सिन्नर नगरपालिकेच्या सभागृहात सुरत-चेन्नई महामार्गासाठी जमिनी संपादन होणार्‍या शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.
यावेळी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, नगरसेवक पंकज जाधव, बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण घुमरे आदी उपस्थित होते.
ज्या शेतकर्‍यांच्या जमिनीवरील फळझाडे, विहिरी, बोअरवेल, बांधकामे व इतर मालमत्तेचे योग्य मूल्यांकन झालेले नाही, त्यासाठी कृषी, वन विभाग, बांधकाम, भूजल सर्वेक्षण व महसूल विभागाने संयुक्त मोजणी करून योग्य मोबदला मिळवून द्यावा, अशा सूचना आमदार कोकाटे यांनी दिल्या. तसेच शेतकर्‍यांनी क्लेम ठेवून मोबदला स्वीकारावा, म्हणजे वाढीव मोबदल्यासाठी आवश्यक असल्यास न्यायालयात दाद मागता येईल, असा सल्लाही त्यांनी दिला.
समृद्धी महामार्गावेळी सर्व्हिस रोड नसल्याने शेतकर्‍यांना शेतात जाण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. सुरत-चेन्नई महामार्गात अशी वेळ येऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व्हिस रोडची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या.
सुरत-चेन्नई महामार्गासाठी सिन्नर तालुक्यातील 16 गावांतून 31.71 किलोमीटर तर निफाड तालुक्यातील नऊ गावांतून 12.9 किलोमीटर रस्ता प्रस्तावित आहे. त्यापैकी सिन्नर तालुक्यातील देशवंडी, गुळवंच, देवपूर, खोपडी बुद्रुक, फर्दापूर, धारणगाव, भोकणी, पांगरी बुद्रुक, पांगरी खुर्द, फुलेनगर, वावी, घोटेवाडी व कहांडळवाडी या 13 गावांचे अवॉर्ड पूर्ण झाले आहेत. पाटपिंप्री, बारागाव पिंप्री व निमगाव-सिन्नर या तीन गावांचे अवॉर्ड बाकी आहेत.

चालू बाजारभावानुसार मोबदला देण्याची मागणी

महामार्गासाठी शासनाने 2021 मध्ये अधिसूचना काढली व 2023 मध्ये अवॉर्ड निश्चित करण्यात आले. मात्र, मोबदला देण्यासाठी 2026 हे वर्ष उजाडल्याने जमिनीचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे चालू बाजारभावानुसार मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली. त्यावर अधिकार्‍यांनी 2023 च्या अवॉर्ड रकमेवर शासन नऊ टक्के व्याज देणार असल्याची माहिती दिली. नियमानुसार 15 टक्के व्याज मिळावे, अशी सूचना आमदार कोकाटे यांनी केली.

शेतकर्‍यांच्या विविध मागण्या

पांगरी बुद्रुकचे शेतकरी संदीप दळवी यांनी मोबदल्याऐवजी जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावी, अशी मागणी केली. संयुक्त मोजणी व पोटहिस्सा मोजणीसाठी लागणारा खर्च शासनाने करावा, विहिरींना घसारा न धरता बाजारभावानुसार मोबदला द्यावा, फेरमूल्यांकनात बागायती दर लागू करावेत, भूसंपादनानंतर उरलेले क्षेत्र ताब्यात घेऊन मोबदला द्यावा, सुटलेल्या गटांचा भूसंपादनात समावेश करावा, तसेच मागील पाच वर्षांत वाढलेल्या झाडे व बांधकामांचा मोबदला द्यावा, अशा विविध मागण्या शेतकर्‍यांनी केल्या.

Give fair compensation to affected farmers for Surat-Chennai highway

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

18 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

18 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

18 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

18 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

18 hours ago