नाशिक

584 जणांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचा कॅण्डल मार्च

मृत विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

नाशिक : प्रतिनिधी
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहे तसेच अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटनांचा मुद्दा उपस्थित करत 584 आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची स्वतंत्र व सखोल चौकशी करावी, प्रत्येक मृत्यूचे कारणनिहाय विवरण जाहीर करावे आणि मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत योग्य आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी सकल आदिवासी विद्यार्थी आंदोलन कृती समितीच्या वतीने सोमवारी (दि. 21) नाशिकमध्ये कॅण्डल मार्च काढण्यात आला. ईदगाह मैदानापासून गोल्फ क्लब मैदानमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमारपर्यंत काढलेल्या या शांततामय मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले होते. यानंतर अप्पर आयुक्त दिनकर पावरा, प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे आणि सहाय्यक प्रकल्प अधिकारी राजेंद्र महाले यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
ईदगाह मैदानापासून सुरू झालेला कॅण्डल मार्च गोल्फ क्लब मैदानमार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शालिमार येथे पोहोचला. विद्यार्थ्यांनी हातात मेणबत्त्या घेतल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांची सुरक्षितता, भवितव्य आणि न्यायाच्या मागणीचे विविध संदेश असलेले फलकही हाती घेण्यात आले होते. शांततेत काढण्यात आलेल्या या मोर्चातून मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाशी एकजूट व्यक्त करण्यात आली.
विसापूर येथील चिमुकली सृष्टी सूर्यवंशी, गडचिरोलीतील तीन विद्यार्थ्यांसह गेल्या दोन वर्षांत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या स्मृतींना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आश्रमशाळेत शिकणार्‍या आपल्या मुलाने मोठे व्हावे, कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करावे, या अपेक्षेने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवतात. मात्र, काही विद्यार्थी पुन्हा घरी परतलेच नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखाला शब्द अपुरे असल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची कारणे, संबंधित संस्थांमधील सुरक्षा व आरोग्य व्यवस्था, प्रशासनाची जबाबदारी तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांकडून कर्तव्यात कसूर झाली आहे का, याची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. प्रत्येक मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाची आर्थिक व सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने योग्य आर्थिक मदत आणि आवश्यक शासकीय सहाय्य जाहीर करावे, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदनात 584 आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याबरोबरच प्रत्येक मृत्यूचे कारणनिहाय विवरण शासनाने जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित प्रकरणांमध्ये जबाबदारी निश्चित करून दोषी आढळणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर नियमानुसार कारवाई करावी, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना शासनामार्फत योग्य आर्थिक मदत द्यावी आणि प्रत्येक मृत्यूच्या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या चौकशी व कारवाईची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच कोणती प्रकरणे प्रलंबित आहेत, संबंधित प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणती प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे आणि प्रत्येक प्रकरणाची सद्यस्थिती काय आहे, याबाबतची अधिकृत माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासकीय व अनुदानित आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमधील सुरक्षा, आरोग्य आणि मूलभूत सुविधांचे स्वतंत्र परीक्षण करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
हा कॅण्डल मार्च कोणाविरुद्ध द्वेष व्यक्त करण्यासाठी नसून मृत विद्यार्थ्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली आणि त्यांच्या आई-वडिलांच्या दुःखाशी एकजूट व्यक्त करण्यासाठी असल्याचे आयोजकांनी सांगितले. भविष्यात एकाही विद्यार्थ्याच्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये, विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे आणि त्यांच्या जीवनाच्या सुरक्षेला प्राधान्य मिळावे, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.
मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थी सहभागी झाले होते. हातातील मेणबत्त्या आणि विविध संदेशांचे फलक यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मृत विद्यार्थ्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली. शांतपणे, मात्र ठामपणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित भवितव्याचा मुद्दा या कॅण्डल मार्चमधून मांडण्यात आला.

Tribal students hold candle march to demand inquiry into 584 deaths.

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मृतदेह बोलत नसतो, पण पोस्टमार्टम सत्य सांगते!

- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…

14 hours ago

यिन-यांग

- वासवदत्ता अग्निहोत्री पहिले बीज की त्या आधी रोप? आधी कोंबडी की आधी अंडी? हे…

14 hours ago

समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी, नवीन सौरतंत्रज्ञान

- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…

14 hours ago

डिजिटल दरोडा!

- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…

14 hours ago

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत नवी भरारी

आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…

15 hours ago

युद्ध थांबल्याचं तुणतुणं

युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…

15 hours ago