संपादकीय

माझे बाबा पुरुषोत्तम नाईक

– प्रभंजन नाईक

ज्येष्ठ पत्रकार, माझे तीर्थरूप पुरुषोत्तम नाईक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा…
बाबांना जाऊन आज अकरा दिवस झाले. 10 सप्टेंबरला आपल्याला सोडून गेले हे स्वीकारणे आणि ते आपल्याला आता दिसणार नाहीत, ही समजूत मनाला घालणे अशक्य आहे. स्पष्टवक्तेपणा, शुद्ध आणि कणखर भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सरळमार्गी आणि निःस्पृह वृत्तीमुळे त्यांनी अनेक लोकांना आयुष्याच्या वेगवेगळ्या पडावावर मदत केली. काहींनी त्याची जाणीव ठेवली, तर काहींनी स्वार्थीपणा दाखवत पाठ फिरवली. पण त्यांचे मदत करण्याचे काम आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू होते.
ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास असलेल्या माझ्या बाबांनी कधीही व्यवसाय म्हणून ज्योतिषशास्त्र अथवा फलज्योतिषाचा वापर केला नाही. निःस्पृह वृत्तीने शेकडो लोकांना मदत केली. ही मदत करताना त्यांनी गोपनीयता ठेवली होती. कधीही कुठल्या व्यक्तीची अत्यंत महत्त्वाची आणि खासगी माहिती आम्हाला सांगितली नाही. वैयक्तिक आणि कार्यालयीन आयुष्य त्यांनी कायम वेगळे ठेवले. कोणाचे रहस्य मनात ठेवणे आणि त्या रहस्यांचा भार वाहणे हे प्रचंड मानसिक ताकदीचे प्रतीक आहे, असे मला नेहमीच वाटायचे. त्यांनी कधीही कोणाच्या रहस्यांचा वापर एखाद्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी केला नाही. त्यामुळे हजारो लोकांनी त्यांच्याजवळ मन मोकळे केले होते. त्यांच्या निर्व्यसनी आणि प्रामाणिकपणाच्या गोष्टी त्यांचे अनेक जुने मित्र कायम सांगत असत. एखादा माणूस एवढा सरळमार्गी कसा असू शकतो, असा प्रश्न मुलगा म्हणून मला कायम पडायचा. पण ज्या पद्धतीने कोणालाही त्रास न देता आमच्यातून अगदी सहजतेने ते मृत्युलोकात निघून गेले, तेव्हा त्यांच्या जीवनाचे सार्थकत्व मला उमगू लागले.
बाबा, माझ्या आयुष्यातील पहिले गुरू, ज्यांनी त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत मला काहीतरी कायम शिकविले. कधीकधी ते काय सांगायचे ते समजत नव्हते. बर्‍याच गोष्टींचा अर्थ आता ते गेल्यावर समजायला लागला. जीवनाच्या अनिश्चिततेची जाणीव त्यांना कायम होती. ते आम्हाला म्हणायचे आज आहे तोवर बोलून घेऊ. नंतर श्रीरामरायाच्या कृपेने जे व्हायचे ते होणारच आहे. आपण कितीही ठरवले तर अमर होऊ शकत नाही आणि काहीही केले तर जन्म-मृत्यूची वेळ ठरवू शकत नाही. माझे बाबा हे अत्यंत वेगवान वाचक आणि कुशाग्र बुद्धीचे चिंतक होते. त्यांच्या वाचनाच्या व्यासंगामुळे ते अनेक विषयांवर अगदी सहज बोलायचे. ते हाडाचे पत्रकार होते. त्यामुळेे घरातल्या आणि बाहेरच्या प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवण्याची त्यांची आवड होती.
राजकारण व इतिहास हे त्यांचे अत्यंत आवडीचे विषय होते. त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत विविध राजकीय घडामोडींची माहिती ठेवली. निवडणुका आल्या की तासन् तास ते बातम्या पाहत आणि कोण जिंकू शकते आणि हरू शकते यावर भाकीत करायचे. त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळे त्यांची बहुतेक भाकिते खरेच ठरत. इतिहासाच्या आणि धर्माच्या अनेक गोष्टींची चर्चा करत आणि माहिती ते आम्हाला देत असत.
त्यांच्यामुळे आम्हाला अगदी लहानपणापासून वाचन आणि विचारांचा वारसा व आवड निर्माण झाली. ते कायम स्वत:ला विद्यार्थी संबोधत असत. त्यांच्या मते ज्ञान एवढे अथांग आहे की, ज्यामुळे पूर्ण ज्ञान एका जन्मात मिळवणे शक्य नाही. निःस्पृह वृत्तीने ते सर्व गोष्टी करत असल्याने ते बर्‍याच वेळा कोणाकडून काही अपेक्षाही ठेवत नसत. कारण त्यांना अपेक्षाभंगाचे दु:ख माहिती होते. त्यांचा कल नेहमी आत्मनिर्भर आणि स्वावलंबी असण्याकडे होता. माझ्या वडिलांच्या जाण्याने आयुष्यात एक न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.
जीवन हे अनिश्चित आहे आणि आपल्या हातात काहीच नसते, याची जाणीव मला झाली. त्यामुळे मी आपल्या सर्वांना आवर्जून सांगेन, जोपर्यंत तुमचे आई-वडील तुमच्यासोबत आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत सुखद क्षण घालवा. कारण जसे आपले कर्म असते तसेच आपले आयुष्य असते. एकदा आई-वडील गेले की, परत कोणी ती जागा भरू शकत नाही.
माझ्या प्रिय बाबांच्या आयुष्याविषयी लिहिण्यासारखे बरेच आहे. पण मला त्यांचा मुलगा होण्याचे भाग्य लाभले, ही अत्यंत मन प्रसन्न करणारी गोष्ट निश्चित आहे. त्यांच्या पवित्र अणि निष्कलंक आत्म्यास चिरशांती लाभो, हीच प्रार्थना.

My father Purushottam Naik

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मृतदेह बोलत नसतो, पण पोस्टमार्टम सत्य सांगते!

- अफजल पठाण श्वास थांबला म्हणून कहाणी संपत नाही, कधीकधी मृत्यूच्या शांत देहातूनच सत्य बोलतं...…

13 hours ago

यिन-यांग

- वासवदत्ता अग्निहोत्री पहिले बीज की त्या आधी रोप? आधी कोंबडी की आधी अंडी? हे…

14 hours ago

समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी, नवीन सौरतंत्रज्ञान

- डॉ. किशोर पवार जगातील वाढती लोकसंख्या, हवामानबदल आणि पाण्याच्या असमान उपलब्धतेमुळे गोड्या पाण्याची समस्या…

14 hours ago

डिजिटल दरोडा!

- सीमाताई मराठे ‘40 पैसे दिल्याने कोणाचा जीव जात नाही...’ निती आयोगाच्या उपाध्यक्षांच्या मुखातून बाहेर…

14 hours ago

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत नवी भरारी

आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये…

14 hours ago

युद्ध थांबल्याचं तुणतुणं

युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह…

14 hours ago