व्यावसायिकांची कोंडी; व्हीआयपींच्या स्वागताच्या मुद्यावरून नाराजीनाट्य
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या ध्वजारोहणाच्या त्र्यंबक भेटीवर बेमोसमी पावसाच्या ढगाळलेल्या आकाशाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तब्बल 2 कोटी 70 लक्ष रुपये खर्च करत उभारणी केलेल्या हेलिपॅडचा वापर पावसाळी हवामान निर्माण झाल्याने करता येणार नाही. राष्ट्रपती वाहनाने नाशिक-त्र्यंबक रस्त्याने येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दररोज अपघातात बळी घेणार्या नाशिक-त्र्यंबक रस्त्याची अवस्था राष्ट्रपती यांच्या वाहनांच्या ताफ्यासाठी योग्य आहे का? तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या रस्त्याने राष्ट्रपती येणार-जाणार असतील तर दोन दिवस हा रस्ता सर्वसामान्य नागरिकांना वाहतुकीसाठी बंद ठेवणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
त्र्यंबकनगरीला गुरुवारी सकाळपासून पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुख्य मार्गासह सर्वत्र पोलिसांचा खडा पहारा उभा केला आहे. दुपारी 3 वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्यांनी कुशावर्त तीर्थावर भेट दिली व ध्वजारोहण स्थळाच्या सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर काही प्रमाणात पोलीस बंदोबस्त शिथिल झाला. तोपर्यंत पोलीस कर्मचार्यांना कडकडीत उपास घडल्याची चर्चा होती. नागरिकांच्या रहदारीलादेखील मज्जाव करण्यात आला होता.
राष्ट्रपती आणि मान्यवर नेत्यांचा दौरा असल्याने प्रमुख मार्गावरील दुकाने दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. आठवडे बाजार भरणार नाही याची अधिसूचना निघाली आहे. तथापि हातावर पोट असलेले व रस्त्यावर किडूक मिडूक साहित्य विकणारे, भाजीविक्रेते, फूलविकेते यांना दोन दिवस सक्तीचा बंद पाळावा लागणार आहे. यातील व्यावसायिकांनी आपली कैफियत मांडताना व्हीआयपींच्या दौर्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होत असेल तर आमची बुडीत मजुरी म्हणून आम्हाला दोन दिवसांचे चार हजार रुपये देण्यात आले पाहिजे, असे म्हटले आहे.
पास देता का पास?
त्र्यंबकनगरी दिवसभर आम्हाला पास देता का पास? अशी विचारणा ध्वजारोहणाशी संबंधित असलेल्या पुारेहित संघ, नगर परिषद, तहसील कार्यालय यांच्याकडे सुरू होती. अनेकांनी एक महिन्यापासून त्यासाठी फिल्डिंग लावली होती. मात्र, ध्वजारोहणाला दीड दिवस उरला तोपर्यंत पास हाती न आल्याने त्रागा करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. तकलादू कामाचे पितळ उघडे पडायला नको म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव गर्दी नको असे दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात कुशावर्त परिसरात अपुरी जागा आणि त्यातही झालेले खोदकाम यामुळे झाकली मूठ ठेवण्यासाठी शासनाची केविलवाणी धडपड सुरू आहे.
Trimbak city takes on the appearance of a police encampment