त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर मंदिर वास्तूला झळाळी देण्याचे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने सुरू केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील भारतीय पुरातत्त्व विभागाचे रसायन शाखेच्या माध्यमातून मागच्या काही महिन्यांपासून काम हाती घेण्यात आले आहे.
ऊन, वारा, पाऊस यामुळे दगडावर साचलेला थर काढण्यात येत आहे. त्यानंतर विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करण्यात येणार आहे. मंदिराच्या प्रांगणाच्या भिंतीवर वातावरणाने निर्माण झालेला थर काढल्यानंतर भिंतीचा दगड उजळून निघाला आहे. अशाच प्रकारे मंदिराचे कळसाच्या शिखरावर असलेला थर काढल्याने तेथील कोरीव नक्षीकाम ठळक झाले आहे. देशविदेशातून येथे भाविक दर्शनासाठी येतात. त्याच सोबत इसवीसन 1755 मधील प्राचीन शिल्प वास्तुकलेचा उत्कृष्ट नुमना म्हणून अभ्यासक येत असतात. त्यांच्यासाठी उजळलेली वास्तू पर्वणी ठरणार आहे. पावसाळ्यात मंदिराला गळती लागते तसेच वनस्पतींची वाढ झाल्याने मंदिराच्या दगडांचे क्षरण होत आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संवर्धनाचे काम सुरू केले आहे. छत्रपती सभाजीनगर विभागाचे उपअधीक्षक समीर सीपी यांच्या मार्गदर्शनाने संरक्षण व संवर्धनाचे काम वेगाने सुरू आहे. पुढील काही महिन्यांत काम पूर्ण होणार असून, आगामी सिंहस्थ पर्वकाल साधण्यासाठी येणार्या कोट्यवधी भाविकांना मंदिराचे नयनरम्य दर्शन घडेल, असे दिसते.
Trimbakkaraja Temple lighting work in progress