नाशिक

कोट्यवधींच्या आमिषालाही नकार; राजाभाऊ वाजेंची निष्ठा, लोकशाहीचा गौरव

सिन्नरमध्ये नागरी सत्कार सोहळा; बाळासाहेब थोरात यांचे सत्ताधार्‍यांवर टीकास्त्र

सिन्नर : प्रतिनिधी
शिवसेनेतील ऐतिहासिक फुटीनंतर राज्यातील अनेक खासदार आणि आमदारांनी वेगवेगळे राजकीय निर्णय घेतले. मात्र, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरील निष्ठा कायम ठेवत पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या भूमिकेचा गौरव करण्यासाठी सिन्नर येथे आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राजाभाऊ वाजे यांच्या निर्णयाचे कौतुक करत त्याला लोकशाही आणि राज्यघटनेवरील विश्वासाचे प्रतीक असल्याचे म्हटले. नागरी सत्कार समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते खासदार राजाभाऊ वाजे तसेच त्यांचे वडील आणि ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विलास लोणारी होते. मोठ्या संख्येने शिवसैनिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, शिवसेनेतील फुटीनंतर सहा खासदारांनी वेगळी भूमिका घेतली. अनेकांवर राजकीय दबाव आणि प्रलोभनांचा प्रभाव पडला. मात्र, राजाभाऊ वाजे यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली भूमिका बदलली नाही. पक्ष सोडण्यासाठी त्यांना कोट्यवधी रुपयांची आमिषे दाखवण्यात आल्याची चर्चा होती. मात्र, त्यांनी त्या आमिषांना ठामपणे नकार दिला. त्यामुळे त्यांचा आज होत असलेला सन्मान हा केवळ एका खासदाराचा गौरव नसून, लोकशाही, निष्ठा आणि राज्यघटनात्मक मूल्यांचा सन्मान आहे. थोरात यांनी यावेळी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत सत्ताधार्‍यांवर जोरदार टीका केली. “लोकशाही संस्थांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना नेमकी कोणाची, हा प्रश्न अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे,” असे ते म्हणाले. लोकशाही मजबूत करण्यासाठी राजाभाऊ वाजे यांच्यासारख्या नेत्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात कवी व व्याख्याते नितीन चंदनशिवे यांनी आपल्या भाषणातून राजकीय निष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांचे महत्त्व अधोरेखित केले. माजी आमदार विलास लोणारी यांनी राजाभाऊ वाजे यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. ज्येष्ठ नेते प्रकाश वाजे यांनी कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच राजाभाऊ वाजे यांना हे यश मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके यांनी केले.

मी पक्षाशी प्रामाणिक राहिलो : राजाभाऊ वाजे

सत्काराला उत्तर देताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी अत्यंत संयत शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो, त्यात काही विशेष केले असे मला वाटत नाही. शिवसेना पक्षाने सिन्नर तालुक्याला आणि मला अनेक संधी दिल्या. तालुक्याला राज्यमंत्रिपद, आमदारकी, जिल्हा परिषद अध्यक्षपद आणि आता खासदारकी मिळाली. त्यामुळे पक्षाशी निष्ठा राखणे हे माझे कर्तव्य होते. ते पुढे म्हणाले, माझा सत्कार करण्याची गरज नव्हती. मी फक्त माझी जबाबदारी पार पाडली. अनेक वर्षे प्रसिद्धीपासून दूर राहिलो; मात्र गेल्या चार दिवसांत प्रसिद्धीचा संपूर्ण बॅकलॉग भरून निघाला आहे. आता माझ्याकडे बोलण्यासारखे फारसे काही उरलेले नाही. उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा पुन्हा अधोरेखित करत वाजे म्हणाले, मी उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासोबत होतो, आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे. ही भूमिका कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही.

Turning down the lure of crores; Rajabhau Waje’s loyalty—a triumph for democracy.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

13 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago