वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीची देशभर चर्चा होत असतानाच, महाराष्ट्रात टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट म्हणजे ‘टेट’चा पेपर फुटल्याच्या कथित संशयावरून परीक्षा रद्द करावी लागली. सरकार केंद्रातील असो वा राज्यातील, महत्त्वाच्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर परीक्षा यंत्रणेलाच कीड लागल्याचे अधोरेखित झाले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे भरती मंडळ, सीबीएसई इत्यादी परीक्षांमध्ये अनियमितता असल्याचे आढळून आले आहे. परीक्षा देणारे विद्यार्थी नव्या पिढीतील म्हणजे जेन झेड आहेत. पेपरफुटीमुळे त्यांचा व त्यांच्या पालकांचा संताप होणे स्वाभाविक आहे. नीटच्या पेपरफुटीची चर्चा होत असताना सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका प्रकरणात बेरोजगार तरुणांचा उल्लेख ‘झुरळ’ असा केल्याने अमेरिकेतील भारतीय तरुण अभिजित दीपके याने डिजिटल ‘झुरळ जनता पार्टी’ स्थापन केली. त्याने थेट तरुणांच्या भावनांना हात घातल्याने त्याला सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि तो विद्यार्थी नेता बनला. तो भारतात 6 जून 2026 रोजी आला आणि याच दिवशी त्याच्या नेतृत्वाखाली दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेत निषेध आंदोलन झाले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्याने लावून धरली. पुणे, चंदिगड, अमृतसर, हैदराबाद, जयपूर इत्यादी ठिकाणी दीपके याने शांततेत आंदोलन केले. दीपके हा केवळ एक युवक न राहता नेता झाला असून, माध्यमांतही त्याच्याप्रति आदराची भाषा वापरली जात आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असलेल्या दीपके यांनी 20 जूनपासून जंतर-मंतर येथे शांतता आंदोलन सुरू केले. समर्थकांसह त्यांचा ठिय्या सुरू असतानाच महाराष्ट्रात ‘टेट’चा पेपर फुटल्याच्या संशयावरून 28 जून 2026 रोजी होणारी परीक्षा रद्द करण्याची नामुष्की महाराष्ट्र सरकारवर आली. सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांसाठी ‘टेट’ उत्तीर्ण होणे सर्वोच्च न्यायालयाने बंधनकारक केले आहे. याशिवाय, लाखो विद्यार्थी परीक्षेची तयारी करून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहतात. पेपर फुटल्याने कार्यरत शिक्षक आणि भावी शिक्षकांच्या तयारीवर पाणी फेरले गेले आहे. ‘नीट’चा अनुभव लक्षात घेता राज्य सरकारने विशेष खबरदारी घ्यायला हवी होती. परीक्षा कोणतीही असो, यंत्रणेलाच कीड लागली असेल तर विद्यार्थी आणि त्यांचे पालक करणार तरी काय? टेट 2026 च्या कथित पेपरफुटीमुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणात भिवंडी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतर परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी पहाटे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला. कारवाईदरम्यान काही व्यक्तींंकडे ‘टेट 2026’च्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित साहित्य आढळले. राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकार्यांनी पडताळणी केल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या प्रश्नांपैकी अनेक प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात राजीव शाह आणि आकाश कुमार (दोघेही बिहारचे), तसेच धीरज कुमार (हरियाणा) यांना अटक करण्यात आली असून, या कथित पेपरफुटी रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. महाराष्ट्रातील या परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात तीन परप्रांतीय संशयितांना अटक करण्यात आली, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यात उत्तर भारतातील बिहारचे दोघे असल्याने मराठीजनांचा संताप व्यक्त होणे स्वाभाविक आहे. अभिजित दीपके हे मराठी आहेत ही बाबही लक्षात घेण्याजोगी आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे चार लाख अठ्ठावीस हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे या लाखो उमेदवारांना आता नव्या तारखेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. स्पर्धा आणि भरती परीक्षांमधील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर या टेट पेपरफुटीने परीक्षा व्यवस्थेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महाराष्ट्रात टेट परीक्षेतील हा पहिलाच गैरप्रकार नाही. यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये पुणे सायबर पोलिसांच्या तपासात सर्वांत मोठा गैरप्रकार उघडकीस आला होता. त्या घोटाळ्यात परीक्षेचा पेपर फुटला नव्हता, तर निकाल आणि गुणांमध्ये फेरफार करण्यात आले होते. अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून पस्तीस हजार रुपयांपासून ते काही लाख रुपये घेऊन ओएमआर शीट आणि संगणकीय प्रणालीमध्ये फेरफार करून त्यांना पात्र दाखवले गेले होते तसेच अनेकांना बनावट प्रमाणपत्रेही वाटण्यात आली होती. या प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर, आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर आणि परीक्षा घेणार्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रीतेश देशमुख यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. सुपे यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात कोट्यवधी रुपयांची रोकड आणि सोने जप्त करण्यात आले होते. पोलिसांच्या तपासानंतर सात हजार आठशे ऐंशी संशयास्पद उमेदवारांची यादी समोर आली होती. पडताळणीनंतर परीक्षा परिषदेने यातील सुमारे साडेसात हजार बोगस उमेदवारांना बडतर्फ केले होते. यामध्ये 2018 आणि 2020 च्या टेट परीक्षांमधील गैरप्रकारांचाही समावेश होता. आता 2026 च्या टेट परीक्षेचा पेपर फुटला आहे. विद्यापीठांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम, माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळांचे अभ्यासक्रम, नोकरभरतीच्या स्पर्धा परीक्षा घेताना अत्यंत गोपनीयता पाळावी लागते. परीक्षा झाल्यानंतरही पेपर काटेकोरपणे तपासावे लागतात. ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही परीक्षा पद्धतींत कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही आणि कोणत्याही उमेदवाराला गैरमार्गाने लाभ होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी लागते, तरच परीक्षेला अर्थ असतो. देशाच्या विविध भागांत परीक्षांमध्ये गोंधळ झाल्याची अनेक उदाहरणे आहेत आणि महाराष्ट्र त्यात मागे नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, निवड मंडळ, विद्यापीठ आणि मंडळांच्या परीक्षांमध्ये गोंधळ झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. याला परीक्षा यंत्रणेतील काही लोक जबाबदार असल्याचे तपासातून दिसून येते. आपल्याकडे ‘मॅनेज’ संस्कृती बळावली असल्याने परीक्षा यंत्रणेतील एखादी कमकुवत साखळी हाती लागते. गुण वाढविणे, नापासाला पास करणे, पेपर फोडणे असे प्रकार घडत असल्याने परीक्षांवरील विश्वास उडत चालला आहे. याची जबाबदारी सरकारची आहेच, शिवाय परीक्षा घेण्याची यंत्रणा राबविणार्या संस्था किंवा एजन्सींची जबाबदारी अधिक आहे. यंत्रणेवर नियंत्रणच नसल्यास परीक्षांमध्ये घोटाळे होणारच. सर्व यंत्रणांमधील पारदर्शिता आणि प्रामाणिकपणावरच संशय घेतला जात आहे. परीक्षांच्या माध्यमातून झालेले शैक्षणिक प्रवेश किंवा काही नियुक्त्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असेल तर नवल नाही. सन 2021 मध्ये परीक्षांमध्ये गोंधळ झाले होते, आरोग्य विभागाची परीक्षा अनेकवेळा रद्द करावी लागल्याची चौकशी सुरू होती, त्याचवेळी म्हाडाच्या परीक्षेतील घोटाळा समोर आला आणि त्याची चौकशी सुरू असताना टेट परीक्षेतील गोंधळ उघड झाला होता. या सर्व घटनांशी संबंधित लोकांवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून पैसे व मालमत्ता ताब्यात घेण्यात आली. यावरून घोटाळ्यांचे स्वरूप अत्यंत व्यापक असल्याचे दिसून आले. राज्याच्या शैक्षणिक विभागातील परीक्षेशी संबंधित काम करणारे काही अधिकारी आणि कर्मचारी या घोटाळ्यांमध्ये सहभागी असल्याचे उघड झाल्याने संपूर्ण परीक्षा यंत्रणा खोलवर पोखरली गेली असल्याचा निष्कर्ष निघत आहे. त्यामुळे परीक्षा यंत्रणेवरील विश्वास उडत चालला असून, गुणवत्तेला महत्त्व राहिले नसल्याची भावनाही बळावत चालली आहे, असे आम्ही याच सदरात 22 डिसेंबर 2021 रोजी ‘परीक्षा यंत्रणेला कीड’ या मथळ्याखाली भाष्य केले होते. त्याच अनुषंगाने आज तोच मथळा दिला आहे.
Pests in the examination system
Mangesh Shirole, the spirited Deputy Mayor striving for the development of Igatpuri.
- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…
Simhastha: Not merely a celebration of faith, but a blueprint for Nashik's future.
The Sacred Vessel of Spirituality: The Holy Site of Nashik