अल्पवयीन ताब्यात
सिडको : प्रतिनिधी
शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने कारवाई करून दुचाकी आणि मोबाइल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. या प्रकरणात विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून 55 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी आणि वाल्मीक चव्हाण यांना राजरत्न नगर, सिडको परिसरात एका व्यक्तीकडे चोरीची दुचाकी असल्याची माहिती मिळाली. ही माहिती युनिट दोनचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना देण्यात आली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पथकाने राजरत्ननगर परिसरात सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले.चौकशीत संबंधित हा विधिसंघर्षित बालक असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या पालकांना घटनास्थळी बोलावून त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने पवननगर स्टेडियमजवळून दुचाकी आणि मोबाइल चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 40 हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल आणि 15 हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाइल असा एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 2चे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार तसेच नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, प्रविण वानखेडे, मनोज शिंदे, तेजस मते आणि जितेंद्र वजीरे यांच्या पथकाने केली.
Two-wheeler and mobile phone theft case solved.