ऑइल रिफायनरीचे मोठे नुकसान
मॉस्को :
गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. दोन्ही देश एकमेकांच्या शहरांवर हल्ले करत आहेत. या दोन्ही देशातील संघर्ष अद्याप संपलेला नाही. अशात आता पुन्हा युक्रेनने रशियावर 1000 हून अधिक ड्रोनने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. अधिकार्यांनी रविवारी (20 सप्टेंबर) दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या सैन्याने रात्रीच्या वेळी रशियावर 1000 हून अधिक ड्रोन डागले. यामध्ये रशियाची राजधानी मॉस्कोवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात रशियाच्या ऑइल रिफायनरीचे मोठे नुकसान झाले आहे.
युक्रेनच्या सैन्याने देशभरात तसंच रशियाने आपल्यात विलीन करून घेतलेल्या युक्रेनच्या क्रिमिया द्वीपकल्पावर आणि काळ्या समुद्राच्या (ब्लॅक सी) क्षेत्रावर युक्रेननं 1,100 ड्रोन्स डागले आहेत, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.
दुसरीकडे मॉस्कोचे महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी सांगितलं की, रशियन राजधानीच्या दिशेने येणारे 450 ड्रोन्स नष्ट करण्यात आले. तर काही ड्रोन्सचा मारा मॉस्को ऑईल रिफायनरी आणि एका निवासी इमारतीवर करण्यात आल्याचंही महापौर सेर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले. रशियातील युद्धकाळातील पहिल्या संसदीय निवडणुकीच्या मतदानाच्या तिसर्या आणि अंतिम दिवशी हा मोठा हल्ला झाला. दरम्यान, या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या धोरणांना कोणताही विरोध झाला नाही आणि यामुळे क्रेमलिनचे वर्चस्व अधिक दृढ होणे जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र, या निवडणुकीच्या काळातच युक्रेनच्या सैन्यानं हा हल्ला केल्यामुळं महापौर यांनी युक्रेनवर मतदानात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
Ukraine attacks Russia with over a thousand drones.