विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार आठ हजार
नाशिक : प्रतिनिधी
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेणे सुलभ व्हावे, यासाठी राबविण्यात येणार्या पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतील भोजन, निवास व निर्वाह भत्त्यांच्या रकमेत वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी (दि. 6) मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सुधारित दरांनुसार विद्यार्थ्यांना ठिकाणानुसार दरवर्षी 50 हजार ते 80 हजार रुपयांपर्यंत भत्ता मिळणार असून, वैद्यकीय व अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी दरवर्षी आठ हजार, तर अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना चार हजार रुपये अतिरिक्त मिळणार आहेत.
अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना त्यांच्या गावाबाहेर राहून उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत विभागीयस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर आणि ग्रामीण स्तरावर शासकीय वसतिगृहे कार्यान्वित आहेत. विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याने शासकीय वसतिगृहांमधील उपलब्ध प्रवेश क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेणार्या, मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत इयत्ता बारावीनंतरचे उच्च शिक्षण किंवा इयत्ता दहावीनंतरचे दोन वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक कालावधीचे व्यावसायिक किंवा तांत्रिक शिक्षण घेणार्या, परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह भत्त्यासाठी निश्चित दरानुसार दरवर्षी एकत्रित रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेतील भत्त्यांचे दर सन 2018 मध्ये निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर त्यात वाढ करण्यात आलेली नव्हती. आदिवासी विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती तसेच महागाई निर्देशांक विचारात घेऊन भत्त्यांच्या रकमेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 42 हजार रुपये (जुना दर 32 हजार), निवास भत्ता 28 हजार रुपये (20 हजार) आणि निर्वाह भत्ता 10 हजार रुपये (8 हजार) करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण वार्षिक भत्ता 80 हजार रुपये (60 हजार) होणार आहे. इतर महसुली विभागीय मुख्यालय तसेच क वर्ग महानगरपालिका क्षेत्रात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 37 हजार रुपये (28 हजार), निवास भत्ता 21 हजार रुपये (15 हजार) आणि निर्वाह भत्ता 10 हजार रुपये (8 हजार) करण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांना एकूण 68 हजार रुपये (51 हजार) वार्षिक भत्ता मिळणार आहे. इतर जिल्हा ठिकाणी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 32 हजार रुपये (25 हजार), निवास भत्ता 17 हजार रुपये (12 हजार) आणि निर्वाह भत्ता आठ हजार रुपये (सहा हजार) करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना एकूण 57 हजार रुपये वार्षिक भत्ता मिळणार आहे.
अन्य ठिकाणी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 30 हजार रुपये (23 हजार), निवास भत्ता 13 हजार रुपये (10 हजार) आणि निर्वाह भत्ता सात हजार रुपये (पाच हजार) करण्यात आला आहे. एकूण वार्षिक भत्ता 50 हजार रुपये होणार आहे. याशिवाय, वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यासाठी दरवर्षी आठ हजार रुपये, तर अन्य शाखांतील विद्यार्थ्यांना चार हजार रुपये एकरकमी देण्यात येणार आहेत.
Up to 33% hike in Swayam scheme allowances