भारत हा अध्यात्मप्रधान देश आहे. भारत वर्षात अनेक धर्ममत फलतात, फुलतात. परंतु, प्रेम आणि मैत्रीयुक्त मानवता धर्म हाच सर्व धर्मांचा प्राण आहे. अखिल मानवजातीच्या विश्वकल्याणाची भावना त्यामध्ये निहित आहे. ग्रंथ, पंथ व संत यामध्ये भिन्नता असू शकते; परंतु त्यातील तथ्य व कथ्य मात्र एकच असते. आजच्या प्रगतिशील आधुनिक युगात नैतिक मूल्यांचे र्हास होत असताना, भारतीय संस्कृती व नीतिमूल्यांना प्रस्थापित कारण्यामध्ये संतांची महनीय भूमिका आहे. असे संत हे प्रभावी प्रवचनकार, कुशल समाजसुधारक व कुशल प्रशासक असतात. भक्ती, अध्यात्म व व्यवहाराचं अचूक समन्वय घडवत परमार्थाची वाट दाखवितात, ज्ञानमृताचे सिंचन करतात. अशा संतांच्या यादीत श्रमण संघांचे गोरक्षा जीवदया प्रेमी, जना जनाच्या प्रती करुणा बाळगणार्या प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल.
प. पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांचा जन्म नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत येथे दि. 1 ऑगस्ट 1943 रोजी संस्काराने समृद्ध रायसोनी कुटुंबात झाला. आईचे नाव शांताबाई तर वडिलांचे नाव भिकमचंद. जन्मनाव लीला ठेवण्यात आले. मातोश्री शांताबाई सुशील, धार्मिक, सन्यस्त वृत्तीच्या होत्या. तीव्र धार्मिक आस्था, प. पू. कानकमुनीजी म. सा. द्वारा प्रबोधन, धार्मिक ग्रंथाचे वाचन, धर्मचिंतन, भजन, गायन व प्रवचन श्रवण यामुळे दोघांमध्ये वैराग्याचा अंकुर फुलला. दि. 7 मार्च 1962 रोजी दोघांनी प. पू. कल्याणऋषीजी म.सा. यांच्या मुखारविंदाणे दीक्षा ग्रहण करून गुरुवर्या प. पू. उज्ज्वलकुवरजी म. सा. यांचे शिष्य बनले. शांताबाईंचे सुशीलकुवरजी म. सा. व कु. लीलाचे प्रीतिसुधाजी म. सा. नावाची घोषणा झाली.
संन्यास घेताच एक नवीन, तेजस्वी, त्यागपूर्ण, व्रतस्थ, अवघड आयुष्य सुरू होते. हे व्रत मनःपूर्वक, उदात्त निष्ठेने स्वीकारलेले असल्यामुळे आनंददायक, सुसह्य, शांतीची अनुभूती देणारे, क्लेशदायक नसते. अशा संतांचा सहवास, सान्निध्य, आशीर्वाद भाविकांना सकारात्मक, विश्वासदायी, फलदायी ठरते. पू. प्रीतिसुधाजींचे तेजपूर्ण व्यक्तिमत्त्व, अंतःकरणाला भेदणारे वक्तृत्व, यशस्वी कर्तृत्व असाधारण आहे. त्यांच्यात संगीत व वक्तृत्व यांचा अनोखा संगम झालेला होता. त्यांचे जीवन संयम, तप, स्वाध्याय यांची अविरत धारा होती. ज्यामुळे अनेक भाविकांना सन्मार्ग मिळाला. त्यांनी मराठी, हिंदी, गुजराती, राजस्थानी, पंजाबी, इंग्रजी भाषांवर प्रभुत्व मिळविले. भावनांची लडी, भाषेची झडी, तर्काची कडी व भजनांची गुढी यांच्या मधुर समन्वयाने हजारो प्रवचनास उपस्थित जैन-जैनेत्तर भाविकांचे प्रबोधन केले. देशभरात लोकांशी त्यांनी स्थानिक भाषेत संवाद साधला. सुमधुर आवाज, स्पष्ट उच्चार, विषयाची सुयोग्य मांडणी, यामुळे सर्व श्रोते तल्लीन होत होते. सरस्वतीची उपासक, वाणीची देवता कंठात विराजमान, मनःपूर्वक अंतःकरणपूर्वक साधना करणार्या पू. प्रीतिसुधाजी म. सा. यांना इंदूरच्या 1971 मधील चातुर्मासात आदरणीय फकीरचंदजी मेहता व हस्तीमलजी झेलावत यांनी वाणीभूषण पुरस्काराने गौरविले. त्यांचा विश्वास सृजनात्मक शक्तीमध्ये असल्यामुळे, समाजमनाची नेमकी जाण असल्यामुळे पोथ्यापुराणात अडकलेल्या मानसिकतेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. धर्माचे मूळ तत्त्व व आचरण यांना धक्का न लावता धर्माने काळानुरूप अत्यावश्यक बदल करणे अपेक्षित आहे. सध्याच्या काळात मुलींना व मुलांना नको इतके स्वातंत्र्य मिळत आहे. स्रीमुक्ती चळवळ दिशाभूल करणारी काही बाबतीत ठरत आहे. भोगवादी संस्कृतीच्या उदयामुळे नैतिक मूल्यांचा र्हास होत असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात शिस्त, अनुशासन कमी झाल्यामुळे आजच्या बर्याच समस्या निर्माण होत आहेत. त्यांनी समाजात सुसंस्कारांचे, नैतिकतेचे बीजारोपण करण्याचा प्रयत्न केला व संस्कार भारतीच्या रूपात मानवता धर्माचा वास्तविक अर्थ सर्वांना परिचित केला.
आपल्या धर्म प्रबोधनातून जीवदया व गोरक्षेचे महत्तम कार्य केले. त्यांच्या प्रेरणेने उज्ज्वल गोरक्षण संस्थेच्या नावाने भारतभरात 17 गोशाळा सुरू असून, आजतागायत व्यवस्थित कार्य करत आहेत. विनम्र, भावपूर्ण श्रद्धांजली! कोटी कोटी वंदन, नमन!
Vanibhushan, Sanskarbharati P.P. Mr. Pritisudhaji M.S.