नाशिक : प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी नाशिक जिल्हा दौर्यादरम्यान रात्री उशिरा नाशिक संदर्भ सेवा रुग्णालयास भेट देऊन रुग्णसेवेचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णालयातील विविध विभागांची प्रत्यक्ष पाहणी करत उपलब्ध आरोग्य सुविधा, मनुष्यबळ, वैद्यकीय यंत्रसामग्री, औषधसाठा आणि उपचार व्यवस्थेची माहिती त्यांनी घेतली. रुग्णांना वेळेत, दर्जेदार आणि संवेदनशील आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी अधिकार्यांना दिल्या.
आबिटकर यांनी बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन सेवा, प्रयोगशाळा, प्रसूती सेवा, अतिदक्षता विभाग तसेच अन्य महत्त्वाच्या विभागांना भेट दिली. यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधून उपचारांबाबत माहिती घेतली. उपलब्ध वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तांत्रिक कर्मचारी आणि अन्य मनुष्यबळाचा योग्य वापर करून रुग्णसेवा अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
रुग्णालयातील कॅथलॅबचा अधिकाधिक रुग्णांना लाभ मिळावा, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीसारख्या हृदयविकारावरील उपचारांचा रुग्णांना वेळेत लाभ मिळण्यासाठी कॅथलॅबची कार्यक्षमता वाढविण्यावर भर देण्यास सांगितले. तसेच किडनी ट्रान्सप्लांट युनिट तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, वैद्यकीय तज्ज्ञ, यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे
निर्देश त्यांनी दिले.
कर्करोगग्रस्त रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचार मिळावेत, यासाठी रेडिओथेरपी युनिट लवकर कार्यान्वित करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. स्वच्छता, औषधांची उपलब्धता, यंत्रसामग्रीची कार्यक्षमता आणि आपत्कालीन सेवांचाही आढावा घेत त्यांनी बंद अथवा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपकरणांबाबत तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. उपलब्ध संसाधनांचा जास्तीत जास्त उपयोग रुग्णसेवेसाठी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कपिल आहेर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण पवार, संबंधित विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Visit to the referral hospital; focus on strengthening treatment facilities, including the cath lab.
- अनिल उदावंंत जीवनात काहीही आणि कितीही प्रतिकूल घडलं, तरी काही अपवाद वगळता कुणाही जीवाचं…
- योगिनी पैठणकर श्रावणी शुक्रवार हा हिंदू पंचांगातील पवित्र सण आहे. मंगळागौर, श्रावणी शुक्रवार, कहाण्या,…
महाविद्यालयीन जीवन हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. शालेय शिक्षणात अभ्यासक्रम, परीक्षा आणि…
बदलत्या काळाची नवी विचारसरणी आजच्या वेगाने बदलणार्या जगात प्रत्येक पिढीची विचार करण्याची, निर्णय घेण्याची आणि…
वावीतील ‘यूनिलेफ किड्स अकॅडमी’वर शिक्षण विभागाची कारवाई सिन्नर : प्रतिनिधी शाळेला मान्यता नाही, यू-डायस क्रमांक…