नामपूर बाजार समितीत वार्षिक सभेत आरोप-प्रत्यारोपांवरून गोंधळ
नामपूर : प्रतिनिधी
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी (दि. 27) सभापती मनीषा पगार यांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभेच्या सुरुवातीलाच सचिव संतोष गायकवाड यांनी इतिवृत्ताचे वाचन सुरू केले असता, विरोधी गटाच्या सदस्यांनी बाजार समितीतील कारभारावर आक्रमक होत गंभीर आरोप केले.
सभेदरम्यान विरोधी गटातील सदस्य विलास सावंत, सयाजी देवरे, के. पी. कापडणीस आणि गिरीश भामरे यांनी बाजार समितीतील कथित गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, चालू वर्षाचे ऑडिट न झाल्यामुळे आजची सभा बेकायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. सत्ताधारी संचालक मंडळ ठेकेदारांच्या हातातले बाहुले झाले आहे. गेल्या तीन वर्षांत नामपूर बाजार समितीत रुपयाचेही विकासकाम झालेले नाही, केवळ कागदी देखावा दाखवला जात आहे, असा आरोप विरोधकांनी केला. तसेच विकासाच्या नावावर काही लोक स्वतःचे खिसे गरम करत असून, मागील काळात सचिव सक्तीच्या रजेवर असतानाही त्यांनी पगार काढून घेतल्याचा मुद्दा उपस्थित केला. संचालक मंडळ बाजार समितीच्या विकासात पूर्णपणे अपयशी ठरले असून, त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. याशिवाय, शेतकरी प्रतिनिधी जी. के. कापडणीस, विनोद पाटील व सुभाष शिंदे यांनी बाजार समितीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, सभेला हजर प्रतिनिधींना प्रवास भत्ता देण्यात यावा, शेतकर्यांचे थकीत पैसे मिळवून द्यावे, विक्री झालेल्या मालाची हमाली व मापारी व्यापार्यांकडूनच वसूल करावी आणि बाजार समितीच्या आवारात स्वच्छता ठेवावी आदी मागण्यांचे निवेदन सादर केले. सलग तीन तास चाललेल्या या सभेत सत्ताधारी संचालक मंडळाने काही ठेकेदार मंडळींनाही बोलावल्याचे निदर्शनास आल्याने विरोधक अधिकच आक्रमक झाले. यावरून सभागृहात हमरीतुमरी व शाब्दिक चकमक उडाली. अखेर गोंधळाच्या वातावरणात ही सभा तहकूब करून नवीन सभा घेण्याची मागणी विरोधी गटातील संचालकांनी केली आहे. यामुळे आगामी काळात बाजार समितीचे राजकारण कोणत्या दिशेने जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मागील संचालक मंडळाच्या काळात बाजार समितीकडे 13 कोटी रुपयांची शिल्लक होती आणि बाजार समितीला ‘अ’ वर्गाचा दर्जा होता. आज मात्र केवळ सहा कोटी रुपये शिल्लक असून, विद्यमान संचालक मंडळ व विकासपुरुष पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही.
– भाऊसाहेब अहिरे, माजी सभापतीसभेत झालेला गोंधळ राजकीय द्वेषापोटी झाला आहे. विरोधकांचे सर्व आरोप चुकीचे व निराधार आहेत. बाजार समितीच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध करू नये.
– मनीषा पगार, सभापती
War of words between the ruling party and the opposition.
पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…
तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…
ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…
अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…
महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…
विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…