अग्रलेख

बिहारमध्ये पुढे काय?

संयुक्त जनता दलाचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्यापासून बिहारमधील राजकारणावर भाजपाचा प्रभाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेच. गेल्या महिन्यात नितीश कुमार राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेला नाही. नितीश कुमार यांनी भाजपाशी विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी कोणते डील केले, हे त्यांनाच ठाऊक! नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार सक्रिय राजकारणात आले असून, त्यांनी संयुक्त जनता दल हा पक्ष वाढविण्याचा निर्धार केला आहे. नितीश कुमार यांनी नुकताच विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने बिहारच्या राजकारणातून ते बाहेर पडतील, असे बोलले जात आहे. त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला, तरी मुख्यमंत्रिपदाचा त्याग केला नाही. आणखी काही दिवस ते मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असे दिसते. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांचे पुत्र निशांत कुमार यांना निवडले जाण्याची शक्यताच अधिक आहे. विधान परिषदेचे सदस्यत्व मिळाले, तर राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश कधीही होऊ शकतो. तथापि, राजीनामा देऊनही नितीश कुमार आणखी काही दिवस मुख्यमंत्रिपदावर कायम राहणार आहेत. अशा परिस्थितीत बिहारचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणखी काही दिवसांनी मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा नितीश कुमार देऊ शकतात. मात्र, आणखी सहा महिने मुख्यमंत्रिपदावर राहू शकतात. राज्यसभेवर निवडून आल्यानंतर त्यांना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणे बंधनकारक होते. त्यामुळे त्यांनी आमदारकी सोडली असली, तरी मुख्यमंत्रिपद कधी सोडणार याबाबत अजूनही साशंकता कायम आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आपलाच मुख्यमंत्री बनविण्याचा भाजपाचा स्पष्ट इरादा आहे. नितीश कुमार यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपाला आणखी काही दिवस वाट पाहण्यास भाग पाडले आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सम्राट चौधरी यांचे नाव भाजपामध्ये सर्वांत पुढे आहे. येत्या काही दिवसांत बिहारचे राजकारण बदलणार आहे. पण काय बदल होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. भाजपा आपलाच मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत आहे; परंतु संयुक्त जनता दलाचे पुढे काय होणार? हा मोठा प्रश्न आहे. संयुक्त जनता दलाचे नेतृत्व बदलले जाण्याची शक्यता लक्षात घेऊनच निशांत कुमार यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश प्रवेश केला आहे. नव्या राजकीय सूत्रानुसार संयुक्त जनता दलात नितीश कुमार यांचे उत्तराधिकारी म्हणून निशांत कुमार यांचे नाव घेतले जात आहे. नितीश कुमार यांचे समर्थक निशांत कुमार यांच्या पाठीशी उभे राहतील, अशी अपेक्षा आहे. नितीश कुमार हे मंडलवादाच्या राजकारणातून पुढे आलेले नेते आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत लालूप्रसाद यादव, शरद यादव, जॉर्ज फर्नांडिस अशी दिग्गज मंडळी होती. बिहारमध्ये आता मंडलवादाचा प्रभाव राहिलेला नाही. संयुक्त जनता दल आणि राष्ट्रीय जनता दल या दोन पक्षांची भिस्त नेहमीच ओबीसींवर राहिलेली आहे. भाजपानेही ओबीसींमध्ये शिरकाव केला आहे. जनता दल युनायटेडच्या ओबीसी मतदारांवर मोहिनी टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. अशा परिस्थितीत नितीश कुमार यांचे पुत्र जनता दल युनियटेडला कसे पुढे नेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. त्यांना राष्ट्रीय जनता दलाचे तरुण नेते तेजस्वी यादव यांच्याशी दोन हात करावे लागलीत. याशिवाय दिवंगत रामविलास पासवान याचे पुत्र चिराग यांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीतच सामना करावा लागेल. दुसरीकडे, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचे आव्हान आहेच. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात गेले, तर बिहारमध्ये त्यांची उणीव त्यांच्या पक्षाला जाणवेल. याशिवाय निशांत कुमार यांच्या नेतृत्वाची कसोटी लागेल. नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार राजकारणात येण्यास उत्सुक नव्हते. शेवटी त्यांना राजी करण्यात आले. त्यांनी जनता दल युनायटेडचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. नितीश कुमार यांना संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य होण्याची आपली इच्छा होती, असे म्हणत त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री कोणीही झाले, तरी बिहारमध्ये दिल्लीचा हस्तक्षेप राहणार आहे. बिहारची सूत्रे दिल्ली आणि गुजरातकडे जातील, अशी उपरोधिक टिप्पणी प्रशांत किशोर यांनी केली होती. राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्ता राखली, तरी नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असे भाकीत किशोर प्रशांत यांनी केले होते. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले, पण त्यांना राजीनामा द्यावा लागणार, हे त्यांच्या विधान परिषद सदस्यत्वाच्या राजीनाम्यावरून दिसत आहे.

What’s next in Bihar?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

खिशात नाही आणा…

खिशात नसताना पैशांचा गजर कशाला, दिखाव्याच्या दुनियेत खोटा हा साज कशाला आई-वडिलांच्या कष्टांवर उभारलेला हा…

16 hours ago

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

16 hours ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

16 hours ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

16 hours ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

16 hours ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

16 hours ago