संपादकीय

‘मनसे’ नवनिर्माणाची गुढी कधी उभारणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राजकारणाची पद्धत पारंपरिक राजकारणाला छेद देणारी आहे, हे मनसेच्या स्थापनेनंतरच्या पहिल्याच सभेत स्पष्ट झाले होते. त्यांनी विकासाची ब्लू प्रिंट मांडत राजकारणाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांच्या आगळ्यावेगळ्या राजकाराणाला सुरुवातीच्या काळात भरभरून प्रतिसाद मिळाला, मात्र पक्षाची सततची बदलती भूमिका यामुळे पक्षाला पुढे ते यश टिकवता आले नाही. पक्षाला सातत्याने उतरती कळा लागली. पक्षाला आलेली मरगळ झटकून काढण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ ही संकल्पना मांडत पुन्हा मनसेचे इंजिन विकासाच्या मुद्द्याकडे वळवले आहे. मात्र, या मुद्द्यावर ‘मनसे’ नवनिर्माणाची गुढी उभारण्यात यशस्वी होणार का, हे पाहावे लागणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळ्या शैलीने प्रवेश करत आशा आणि अपेक्षांची लाट निर्माण करणार्‍या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवातीला विकासाभिमुख राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्याची घोषणा करत पक्षाने केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता विकासाची सविस्तर ब्लू प्रिंट मांडली. उमेदवारांच्या परीक्षा घेणे, शॅडो कॅबिनेटची संकल्पना पुढे आणणे असे प्रयोग करून मनसेने पारंपरिक राजकारणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. या नव्या विचारांना सुरुवातीच्या काळात मोठा प्रतिसाद मिळाला. पहिल्या विधानसभा निवडणुकीत 13 आमदार निवडून आले. विशेषतः शहरी युवकांमध्ये मनसेची पकड मजबूत झाली. मात्र, 2014 नंतर पक्षाच्या वाटचालीत आलेली घसरण लक्षणीय ठरली. निवडणुकांतील अपयश, सातत्याने बदलणारी राजकीय भूमिका आणि स्पष्ट धोरणाचा अभाव यामुळे मनसेची ओळख धूसर होत गेली. परिणामी, कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत साथ सोडली.
याच पार्श्वभूमीवर यंदाच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पुन्हा विकासाच्या मुद्द्यावर भर देत ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ या नव्या उपक्रमाची घोषणा केली. या वेबसाइटद्वारे नागरिकांना थेट सहभागाची संधी देण्यात आली आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये उपलब्ध असलेल्या या प्लॅटफॉर्मवर शेती, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, औद्योगिक विकास, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास अशा 27 महत्त्वाच्या विषयांवर नागरिक आपले विचार मांडू शकतात. या उपक्रमाची खासियत म्हणजे, नागरिकांनी पाठवलेल्या कल्पनांची तज्ज्ञांकडून छाननी करून त्या पुढे शासनापर्यंत पोहोचवण्याचा मनसेचा मानस आहे. व्हिडिओ, फोटो, चित्र अशा विविध माध्यमांतून कल्पना सादर करण्याची सुविधा देऊन हा उपक्रम अधिक व्यापक आणि लोकाभिमुख बनवण्याचा प्रयत्न दिसतो. खरं तर पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी कार्यकर्त्यांना नवा अजेंडा देणे आवश्यक होते. ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ ही त्याच दिशेने टाकलेली पायरी म्हणावी लागेल. परंतु, याआधीच्या अनुभवावरून केवळ संकल्पना मांडणे पुरेसे नाही. त्याची सातत्यपूर्ण अंमलबजावणी आणि परिणामकारक पाठपुरावा तितकाच महत्त्वाचा आहे. आज मनसेसमोर सर्वांत मोठे आव्हान म्हणजे विश्वासार्हता पुन्हा निर्माण करणे. विकासाचा अजेंडा प्रभावी ठरवण्यासाठी संघटनात्मक बळ, स्पष्ट भूमिका आणि सातत्यपूर्ण कृती आवश्यक आहे. शॅडो कॅबिनेटसारख्या संकल्पनांना प्रत्यक्षात उतरवून जर पक्षाने प्रशासनावर अभ्यासपूर्ण पकड दाखवली असती तर तो जनतेसमोर एक सक्षम पर्याय म्हणून उभा राहू शकला असता. मात्र, शॅडो कॅबिनेटचे पुढे काय झाले हे जनतेला कळलेच नाही. ठाकरेंकडून मांडण्यात येणार्‍या नवनवीन संकल्पना या निश्चितच पारंपरिक राजकारणाला छेद देणार्‍या असतात. मात्र, संकल्पनांचा सातत्याने पाठपुरावा न केल्याने त्या संकल्पनाही बारगळल्या आणि पक्षाला उभारी मिळू शकली नाही.
‘महाराष्ट्र नेक्स्ट’ हा उपक्रम विकासाभिमुख राजकारणाच्या दिशेने सकारात्मक पाऊल असून, ही स्वागतार्ह बाब आहे. यातून निश्चितच महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देऊ शकतील अशा नवीन मुद्याचा संकल्पनेचा उदय होईल. मात्र, राज ठाकरे यांनी मांडलेली ‘महाराष्ट्र नेक्स्ट’ची संकल्पना मनसेच्या नवनिर्माणाची गुढी उभारणार का? हे येणार्‍या काळातच स्पष्ट होईल.

When will MNS raise the banner of Navnirman?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

6 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

6 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

6 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

6 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

6 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

6 hours ago