संपादकीय

कोठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?

रोजचं वर्तमानपत्र वाचलं, वृत्तवाहिन्या पाहिल्या तसेच समाजमाध्यमावर फेरफटका मारला तरी महाराष्ट्राच्या अब्रूचे धिंडवडे निघालेले दिसतील. काय चाललंय महाराष्ट्रात, असा प्रश्न राज्याच्या कानाकोपर्‍यातून विचारला जात आहे. महाराष्ट्रात ड्रग्जमाफियांनी घट्ट पाय रोवले आहेत आणि लैंगिक शोषण सहज केले जात असल्याचे संदेश सर्वत्र जात आहे. गुन्हेगारांना कडक शासन केले जाईल, कुणालाही मोकळे सोडले जाणार नाही, चौकशीअंती सत्य बाहेर येईल हे शब्द आता गुळमुळीत झाले आहेत. कारण रोज नवीन धक्कादायक प्रकरणे बाहेर येत आहेत आणि सरकारची अब्रू चव्हाट्यावर मांडली जात आहे. एवढे होऊन सर्वकाही आलबेल असल्याचे मंत्री, नेते आणि त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर ते आपण कुठल्या नंदनवनात वावरत आहोत, याचा विचार करण्याची गरज आहे.
गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये कॉन्सर्टआडून रेव्ह पार्टी होते आणि पोलिसांना याची खबरही नसते, यावर कुणाचा विश्वास बसू शकतो का? नेस्को सेंटरमध्ये हजारो तरुण येतात, खुलेआम ड्रग्जचे सेवन करतात, त्यात दोघांचा बळी गेल्यावर सरकारी यंत्रणा जागी होते. मग या अपयशाचे खापर कुणावर फोडायचे? राज्यात अमली पदार्थाची खुलेआम विक्री होत आहे.नेस्कोमधील ड्रग्ज पार्टीचे प्रकरण बाहेर येताच अंधेरीत एका भाड्याच्या खोलीतील ड्रग्जची फॅक्टरी पोलिसांनी उद्ध्वस्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याची जबाबदारी आहे. त्यांनी ड्रग्जची पाळेमुळे खोदण्यासाठी कंबर कसली आहे. ड्रग्ज पकडले जात आहेत, हे पोलिसांचे यश मानले तरी ड्रग्जच्या फॅक्टरीचे सूत्रधार कोण, ड्रग्जची खुलेआम विक्री कशी होते, याची उत्तरे मिळत नाहीत. ठाणे पोलिसांनी यंदा जानेवारीमध्ये 27 कोटी 21 लाखांचे एमडी ड्रग्ज मुंब्रा परिसरात जप्त करून पाच जणांना अटक केली होती. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील पाचुपतेवाडीतून यंदा जानेवारीत महसूल गुप्तचर संचालनालयाने तब्बल 6 हजार कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. तर डिसेंबर 2025 मध्ये याच सातारा जिल्ह्यामधील सावरी गावातील शेडवर मुंबई पोलिसांनी छापा टाकत 45 किलोचा म्हणजेच तब्बल 145 कोटी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या प्रकरणांचे पुढे काय झाले, यांच्यावर राजकीय वरदहस्त होता का, हे अजून स्पष्ट झालेले नाही. नाशिकमधील एमआयडीसीमधील ललित पाटीलची ड्रग्ज फॅक्टरी ऑक्टोबर 2023 मध्ये साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त करून 300 कोटींचे 150 किलो ड्रग्ज जप्त केले होते. हाच ड्रग्जमाफिया 2 ऑक्टोबर 2023 मध्ये पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झाला होता. त्याला 15 दिवसांनी चेन्नईमधून अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचे काय झाले, याची फारशी माहिती बाहेर आली नाही. राज्यात गुटखाबंदी असताना खुलेआम विक्री होते. ड्रग्जचेही असेच झाले आहे. त्यामुळे उडता महाराष्ट्र,अशी महाराष्ट्राची प्रतिमा होत आहे.
ड्रग्जचे आव्हान पेलत असताना लैंगिक शोषण, अत्याचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्राची प्रतिमा अत्यंत मलिन होत आहे. भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण सध्या खूपच चर्चेत आहे. त्याने महिलांना फसवून त्यांच्यावर केलेले लैंगिक अत्याचार, जमवलेली आर्थिक माया आणि या सर्वांवर असलेला राजकीय वरदहस्त लपून राहिलेला नाही. अनेक संसार उद्ध्वस्त करणार्‍या या लिंगपिसाट भोंदू खरातला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. मात्र, या प्रकरणात खरातची पत्नी फरार झाली आहे. ज्यांच्यावर आरोप झाले त्यांची अजून चौकशीही झाली नाही. त्यामुळे जरी एसआयटीकडून चौकशी सुरू असली तरी याचा तपास खरंच गांभीर्याने होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खरात फाइल्स सुरू असतानाच नाशिकमधील एका मल्टिनॅशनल कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरण समोर आले. हे प्रकरणही खरात फाइल्सएवढेच गंभीर आहे. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. लक्षात आलेली बाब म्हणजे, यातील आरोपी मुस्लिम आहेत. त्यानंतर अमरावतीमध्ये एका युवकाने 180 लैंगिक अत्याचार केल्याचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. याने त्यांचे साडेतीनशे व्हिडिओ बनवून व्हायरल केले आहेत. यातील आरोपीही मुस्लिम आहेत. ही तिन्ही प्रकरणे महाभयंकर असून, यातील कुठलेही आरोपी सुटता कामा नयेत. मात्र, इथे आरोपींमध्ये धार्मिक भेदभाव केल्याचे चित्र दिसत आहे. खरात प्रकरणात भाजपकडून विधाने करणे टाळली जात होती. मात्र, नाशिक आणि अमरावतीमधील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा मुद्दा आल्यानंतर भाजप अचानक जास्तच आक्रमक झाला आहे. त्यांचे आमदार-खासदार बोलू लागले आहेत. मुळात महिलांवरील अत्याचार हा कुठल्याही जात-पंथ-धर्मापुरता विषय असू शकत नाही. एखाद्यावर आरोप झाल्यानंतर तो कोणत्या पक्षाचा आहे, याची चर्चा आपल्याकडे पहिल्यांदा होते. त्यानंतर त्याच्या पक्षाला त्या गुन्ह्याशी जोडले जाते. हे चुकीचे असून, त्याचा पायंडा पडला आहे. राज्यात लैंगिक अत्याचारांच्या घटना उघडकीस येत आहेत, ड्रग्ज पकडले जात आहेत. याचा अर्थ गुन्हेगारांची हिंमत वाढली आहे, असाच होतो. गुन्हे करण्याची हिंमत होणार नाही, एवढी आपली पोलीस यंत्रणा सक्षम असायला हवी. दुर्दैवाने राजकीय दावणीला पोलीस बांधले गेल्याचे चित्र दिसत आहे. म्हणूनच उडता महाराष्ट्र आणि बुडता महाराष्ट्र ही निर्माण होणारी प्रतिमा तातडीने पुसून टाकण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्राच्या नावामागे आजही पुरोगामी असे बिरुद आहे, ते पुसले जाणार नाही, याची काळजी सरकारने घ्यायला हवी.

 

 

Where has Maharashtra been taken?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

‘पॅड’साठीही लढा

सरकारकडे मासिक पाळी स्वच्छतेसाठी धोरण आहे, योजना आहेत, कागदोपत्री आकडे आहेत. पण या धोरणाची अंमलबजावणी…

4 minutes ago

नेपाळचे बदलते राजकारण

नेपाळचे राजकारण गेल्या दोन दशकांपासून अस्थिरतेच्या भोवर्‍यात अडकलेले होते. राजेशाही संपल्यानंतर लोकशाहीची स्थापना झाली असली…

19 minutes ago

‘नारी’शक्तीच्या आडून मिशन निवडणूक

पश्चिम बंगाल, तामिळनाडूमधील मतदान तोंडावर आले असतानाच कोणताही संदर्भ नसताना केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात संसदेचे…

27 minutes ago

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर की संधी?

आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे तंत्रज्ञान वेगाने सर्व क्षेत्रांमध्ये प्रवेश करत आहे. शिक्षण…

32 minutes ago

मजा करणारे, कष्ट करणारे समजून घ्या

संपलेल्या दहा दिवसांत समाजातील दोन प्रकार मी जवळून बघितले. एक प्रकार म्हणजे कोकणातून मजुरीसाठी आलेले,…

44 minutes ago

कठीण वज्रास भेदू ऐसे…

नाशिक जिल्हा परिषदेचा कारभार गेल्या काही महिन्यांपासून लाचखोरी, कामातील अनियमितता, सोलर घोटाळा यांसारख्या प्रकरणांनी चांगलाच…

54 minutes ago