संपादकीय

मुंबईत मराठीचा प्रश्न महत्त्वाचा ठरणार का?

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून मुंबईत महायुतीचा हिंदू मराठी महापौर होणार, असे विधान करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मराठी मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला असला, तरी गेल्या काही महिन्यांत मुंबई व ठाण्यात मराठीच्या मुद्यावर झालेल्या वादात भाजपने हात आखडता घेतला होता, याची जाणीव मुंबईकरांना आहेच. शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि शिंदेसेनेचे मुंबईत वाढत चाललेले प्राबल्य मुंबईत महायुतीसाठी जमेची बाजू असली, तरी महाविकास आघाडीत मराठीला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य देणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रवेश झाल्याने मराठीच्या बाबतीत तरी महाविकास आघाडीचे पारडे जड झालेले आहे. मुंबईतून घटत चाललेला मराठी टक्का, मुंबईत वाढत चाललेले परप्रांतीयांचे लोंढे, त्यामुळे मूलभूत सोयीृ सुविधांच्या पुरवठ्यावर पडणारा अतिरिक्त भार, मुंबईला आलेले बकाल स्वरूप, शहरात वाढलेली गुन्हेगारी, मराठी माणसांना मिळणारी हीन वागणूक, मराठी शाळांना लागलेली घरघर, या प्रश्नांवर तोडगा काढण्यास विद्यमान राज्य सरकार सपशेल फेल ठरलेले आहे, त्यामुळे मुंबईत तरी मराठीचा मुद्दा महाविकास विकास आघाडीसाठी हुकमी एक्क्याचे काम करणार आहे. मुंबई वगळल्यास देशभरात एकही शहर नसेल ज्याच्या महापालिकेत तेथील स्थानिक भाषिकांव्यतितिरिक्त परप्रांतीयांना निवडणुकीत उमेदवारी दिली जाते आणि निवडून आणले जाते. मग मुंबईतच परप्रांतीयांची दादागिरी कशासाठी? 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून आणि हजारो मराठी कुटुंबीयांच्या त्यागातून महाराष्ट्राला मुंबई राज्याची राजधानी म्हणून प्राप्त झाली आहे. आज सुधारणांच्या नावाखाली तिला महाराष्ट्रापासून तोडण्याचा घाट घातला जात असेल तर त्याला कडाडून विरोध झालाच पाहिजे. मराठी माणसांनी आज या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर काही वर्षांनी मुंबईत मराठी माणूस नावालाही शिल्लक राहणार नाही. मराठीचे भविष्य सांगणारा भरत जाधव याचा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात मराठीचे प्रतीकात्मक रूप असलेला भरत जाधव अन्य प्राण्यांप्रमाणे प्राणिसंग्रहालयात लोकांना दाखवण्यासाठी ठेवण्यात आलेला दिसून येतो. कधीकाळी ज्याला मुंबई आपली वाटत होती तोच मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाल्याने भविष्यातील पिढीला अन्य वन्यजीवांप्रमाणे तो दाखविण्यासाठी पिंजर्‍यात ठेवलेला पाहायला मिळतो. मराठीला गांभीर्याने न घेणार्‍या मराठी भाषिकांच्या आणि मराठी राजकारण्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा सदर व्हिडीओ मराठीची होत असलेल्या दुर्दशेकडे बोट दाखवणारा आहे. भविष्यात ही स्थिती यायला नको म्हणून मराठी माणसांनी मराठीसाठी जागृत होणे गरजेचे आहे.
आजमितीला राज्यात अनेक ठिकाणी झपाट्याने शहरीकरण होत चालले आहे. शहरीकरणासोबत उद्योगधंद्याची साधनेही निर्माण होतात आणि त्यासोबतच अशा ठिकाणी नोकरी व्यवसायासाठी परप्रांतीय येऊन आपले बस्तान मांडू लागतात. सकाळी 9 ते 5 नोकरी करून उरलेला वेळ कुटुंब, मित्रमंडळी यांमध्ये व्यतीत करणार्‍या मराठी माणसांना व्यवसाय करण्यात अधिक रुची नसल्याने परप्रांतीयांचे फावते. लहानमोठे उद्योग करून ही माणसे मराठी माणसांच्या जीवावर इथेच मोठी होतात. नोकर्‍यांमध्ये कमी वेतनात अधिकाधिक काम करून ही मंडळी मालकांची मने जिंकण्यातही तरबेज असतात. शिवाय मराठी माणसांच्या तुलनेत अनावश्यक खर्च करण्यात ही दोन हात मागे असल्याने कमी काळात अधिक पैसा गोळा करण्यात यांचा हातखंडा असतो. मराठी माणसांना जिथे आयुष्यभर राबून मुंबईत स्वतःचे घर घेता येत नाही त्याच मुंबईत ही मंडळी पै पै वाचवून सुरुवातीला भाड्याने आणि कालांतराने चांगल्या सोसायट्यांमध्ये स्वतःची घरे घेतात. गेल्या काही वर्षांत मुंबईतील मराठी माणसांचा टक्का झपाट्याने घसरत चालला आहे. ऐषोरामाची सवय असलेला मराठी माणूस आपली घरे गुजराती, मारवाडी अथवा यूपी-बिहार्‍याला विकून स्वतः बदलापूर, कर्जत, कसारा, वांगणी यांसारख्या ठिकाणी इमारतींमध्ये वसू लागला आहे. मुंबईचे घर विकून आलेले गडगंज पैसे बँकेत ठेवून व्याजावर जगू लागला आहे. मुंबईचे हे लोण हळूहळू ठाणे, कल्याण आणि नवी मुंबईमध्येही पसरायला लागले आहे. परप्रांतीयांची टक्केवारी वाढू लागल्याने त्यांची मुजोरीही वाढू लागली आहे. याचा प्रत्यय आज अनेक ठिकाणी दिसून येतो. मराठी माणसांना घर, दुकान भाड्याने न देणे, मराठी मुलांना नोकरीला न ठेवणे, मराठी माणसांना मोठ्या हॉटेलांत प्रवेश न देणे, शेजारी राहणार्‍या मराठी कुटुंबाशी लहानसहान कारणांवरून वाद घालणे यांसारख्या घटना अधूनमधून उजेडात येतात आणि मग मराठी आणि परप्रांतीय वाद निर्माण होऊन वातावरण ढवळून निघते. काही दिवसांनी हे वाद क्षमतात. लोकही विसरून जातात आणि पुन्हा आपापल्या कामाला लागतात. मराठी माणसांची हेटाळणी करणारी, मराठी भाषिकांचा अवमान करणारी, त्यांना भाषेवरून शिवीगाळ करणारी जी प्रकरणे उजेडात येतात त्यापेक्षा कितीतरी प्रकरणे शहरी भागांत प्रतिदिन घडत असतात. नोकरी करणार्‍या मराठी माणसांना त्यांच्या परप्रांतीय मालकांकडून हीन वागणूक दिली जाणे, हे तर नित्याने सर्वत्रच घडत असते. नोकरी टिकविण्यासाठी हा अवमान मराठी माणूससुद्धा निमूटपणे सहन करत असतो.
चारी पातशाह्यांना पायाशी लोळण घ्यायला लावणारा, जगावर राज्य गाजवणार्‍या इंग्रजांच्या उरात धडकी भरवणारा, स्वराज्याची भगवी पताका अटकेपार फडकावणारा, दिल्लीचे तख्त राखणारा मराठी माणूस आज आपली अस्मिताच विसरला असल्याने आज त्याच्यावर ही नामुष्की ओढवली आहे. ’मुंबई मराठी माणसाची आहे, कोणाच्या बापाची नाही. त्यामुळे इथे आवाजही मराठी माणसाचाच असायला हवा,’ असे हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे नेहमी ठणकावून सांगत. मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी आणि त्यांना मुंबईत मानाने जगता यावे यासाठी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. राजकारणापेक्षा समाजकारणाला प्रथम प्राधान्य देणार्‍या शिवसेनेने मुंबईत मराठी माणसाचा आवाज बुलंद केला. आज तोच आवाज कुठेतरी हरवत चालला होता. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी युती केल्याने मुंबईतील मराठी माणसाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईतील मराठी माणूस मराठीच्या मुद्यावर महायुतीच्या झोळीत मतांचे दान टाकणार की मुख्यमंत्र्यांच्या मुंबईला मराठी महापौर देण्याच्या आश्वासनाला जागणार, हे येत्या 16 तारखेलाच कळणार
आहे.

Will the Marathi issue become important in Mumbai?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

6 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

6 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

6 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

6 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

6 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

6 hours ago