संपादकीय

‘नोबेल शांतता’ स्वप्नभंग

यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले होते. आपण आठ युद्धे थांबवली, असा दावा करून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार आपल्याला मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी मोहीमच उघडली होती. त्यामुळेच यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळेल, याकडे जगाचे लक्ष वेधले गेले होते. नॉर्वेच्या नोबेल पुरस्कार समितीने व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर केल्याने ट्रम्प यांचे स्वप्न भंगले. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी आधी सात युद्धे थांबवली, असा दावा केला होता. नंतर ही संख्या आठवर आली. ट्रम्प यांना रशिया-युक्रेन युद्ध थांबविता आले नाही. मध्यपूर्व आशियातील इस्रायल-हमास युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांनी 20 सूत्री प्रस्ताव मांडला होता. त्याला इस्रायलने मान्यता दिली होती. पॅलेस्टाईनमधील हमास ही संघटना गाझा पट्टीतील युद्ध थांबविण्यास राजी झाल्याचे सांगितले जात होते; परंतु इस्रायल आणि हमास यांच्यात कोणताही युद्धबंदी करार झाला नाही. हे युद्ध थांबले असते, तर ट्रम्प यांचा शांततेच्या नोबेल पुरस्कारावर दावा पक्का झाला असता. अर्थात, त्यांना शांतता पुरस्कार मिळण्याची शक्यताही तितकीच कमी होती. पण पुरस्कार जाहीर होण्याच्या एक दिवस आधी ट्रम्प यांनी मीडिया आणि सोशल मीडियातून आपली दावेदारी पक्की करण्याचा प्रयत्न केला. शांततेचा नोबेल पुरस्काराच्या घोषणेच्या एक दिवस आधी इस्रायल आणि हमास यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती दर्शवली. आहे. व्हाइट हाउसने लगेचच ट्रम्प यांना द पीस प्रेसिडेंट (शांतता अध्यक्ष), असे संबोधून ट्विट केले. शांतता पुरस्कार मिळाला आहे, असे भासविण्याचा ट्रम्प यांचा हा एक प्रयत्न होता. 79 वर्षीय ट्रम्प यांनी या प्रतिष्ठित पुरस्कारावर दीर्घकाळ नजर ठेवली होती. ट्रम्प यांचे रिपब्लिकन सहकारीच नव्हे, तर अनेक जागतिक नेत्यांनीही ट्रम्प त्यांचे कौतुक केले होते. पाकिस्तानसह अनेक देशांच्या नेत्यांनी त्यांना नोबेल (शांतता) पुरस्कारासाठी नामांकन दिले होते. इस्रायल-हमास युद्ध संपविण्यासाठी त्यांनी मांडलेल्या वीस सूत्री कार्यक्रमाचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वागत केले होते. मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी पुरस्कार जाहीर होण्याच्या आधी दूरध्वनीवरून संवाद साधला होता; परंतु ट्रम्प यांना पुरस्कार मिळणार नाही, हे आधीच स्पष्ट झाले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नोबेल (शांतता) पुरस्कार जिंकण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीने पुष्टी केली आहे की, त्यांनी गाझा युद्धबंदी करारापूर्वी आपला निर्णय अंतिम केला होता. तसे नॉर्वेजियन नोबेल समितीने आधीच स्पष्ट केले होते. इस्रायली नेत्यांना पाठिंबा देऊन आणि जागतिक संघर्ष सोडवण्याच्या ट्रम्प यांच्या वारंवार दाव्यांनंतरही नोबेल समितीने निवडप्रक्रिया लवकर बंद केली होती. नोबेल शांतता पुरस्कार जगातील सर्वांत प्रतिष्ठित असल्याचे त्यांनी 2020 मध्ये म्हटले होते. तेव्हापासून त्यांनी या पुरस्कारावर नजर ठेवली होती. फक्त नऊ महिन्यांच्या कालावधीत आठ युद्धे संपवली, या दाव्यावर ते ठाम होते. ट्रम्प ज्या युद्धांचा अंत केल्याचा दावा करतात त्यात इस्रायल-इराण, भारत- पाकिस्तान (ऑपरेशन सिंदूर), काँगो-रवांडा, कंबोडिया-थायलंड, आर्मेनिया-अझरबैजान, इजिप्त-इथिओपिया, सर्बिया-कोसोवो ही युद्धे थांबविल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. भारत-पाकिस्तान युद्ध म्हणजे ऑपरेशन सिंदूर थांबविल्याचा ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळून लावला होता. गेल्या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगाचा पुरस्कार करणारी जपानी संघटना निहोन हिडानक्योला देण्यात आला होता. यंदाचा पुरस्कार लोकशाहीसाठी संघर्ष करणार्‍या व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला. यामुळे ट्रम्प यांची नोबेल मोहीम अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. ट्रम्प यांना डावलले गेले, तर त्यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे नॉर्वेतील लोकांचे लक्ष लागले होते. ट्रम्प यांच्या दहशतीची
नॉर्वेत भीती व्यक्त केली जात होती. ट्रम्प यांच्याविषयी नकारात्मकताही व्यक्त केली जात होती. नॉर्वेच्या सोशालिस्ट लेफ्ट पक्षाच्या नेत्या आणि परराष्ट्र धोरण प्रवक्त्या किर्स्टी बरिगस्टो यांंचे वक्तव्य महत्त्वाचे ठरते. नॉर्वेने कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहिले पाहिजे, असे त्या म्हणाल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला टोकाच्या
दिशेने घेऊन जात आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करत आहेत, दिवसाढवळ्या मास्क घातलेले गुप्त पोलिस लोकांचे अपहरण करत आहेत, संस्था आणि न्यायालयांवर दबाव टाकला जात आहे. जेव्हा राष्ट्राध्यक्ष इतके अस्थिर आणि हुकूमशाही असतात, तेव्हा नक्कीच आपण कोणत्याही गोष्टीसाठी तयार असायला हवे, असे त्या म्हणाल्या. द नोबेल कमिटी ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे आणि
नॉर्वेजियन सरकारचा पुरस्कार निश्चित करण्यात कोणताही सहभाग नाही. पण ट्रम्प यांना हे माहिती असल्याबद्दल मी खात्रीने सांगू शकत नाही. त्यांच्याकडून कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला तयार राहावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. नॉर्वेच्या ग्रीन पक्षाचे नेते अरिल्ड हर्मस्टॅड यांनीही ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. नोबेल कमिटीचे स्वातंत्र्य हेच या पुरस्काराला त्याची विश्वासार्हता देते. शांतता पुरस्कार हे सातत्यपूर्ण वचनबद्धतेतून मिळवले जातात, सोशल मीडियावरील लहान मुलांप्रमाणे केलेल्या हट्टांमधून किंवा भीती घालून मिळत नाहीत, असे ते म्हणाले होते. ट्रम्प यांनी नुकत्याच झालेल्या इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविरामाला पाठिंबा दिला, ही चांगली गोष्ट आहे. गाझामधील वेदना संपवण्यासाठी घेतलेला कोणताही निर्णय स्वागतार्ह आहे. पण उशिरा दिलेले योगदान हे वर्षानुवर्षे सुरू असलेला हिंसाचार आणि विभाजन पुसून टाकत नाही, असेही ते म्हणाले होते. जर त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला नाही, तर हा त्यांच्या देशाचा म्हणजेच अमेरिकेचा अपमान ठरेलत असे ट्रम्प यांनी म्हटले होते. मी माझ्या अध्यक्षपदाच्या आतापर्यंतच्या सात महिन्यांच्या कार्यकाळात सात युद्धे रोखली आहेत. असे ते म्हणाले होते. हा दावा त्यांनी 50 हून अधिक वेळा केला. इस्रायल व हमासमधील युद्ध थांबल्यानंतर हे माझं आठवे यश असेल, असेही ते म्हणाले होते. अमेरिकन जनतेला उद्देशून ट्रम्प म्हणाले होते की, आपण सात महिन्यांमध्ये सात युद्धे रोखली आहेत. आता इस्रायल व हमासमधील युद्ध थांबवण्यात आपल्याला यश मिळेल, असं दिसतंय. म्हणजेच आठ महिन्यात आठवं यश. तरीदेखील मला नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असे ते अमेरिकन जनतेला उद्देशून म्हणाले होते. भारत-पाकिस्तानसारखे युद्ध आपण रोखले, एवढं करूनही आपल्याला नोबेल पुरस्कार मिळेल का? अजिबात नाही. हा पुरस्कार अशा एखाद्या व्यक्तीला दिला जाईल ज्याने काहीही केलेलं नसेल. असं झाल्यास हा आपल्या देशाचा मोठा अपमान असेल. मला हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे, तर आपल्या देशासाठी हवा आहे. कारण असं यापूर्वी कधीही घडलेलं नाही, असेही ट्रम्प म्हणाले होते. पुरस्कार जाहीर होण्यापूर्वीच त्यांची वक्तव्ये पुरस्कार कमिटीवर आणि नॉर्वेवर दबाव टाकण्यासारखी होती. व्हेनेझुएलाच्या लोकांसाठी लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी अथक परिश्रम आणि हुकूमशाहीपासून लोकशाहीपर्यंत न्याय्य आणि शांततापूर्ण संक्रमण साध्य करण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल मचाडो यांना सन्मानित करण्यात आले, असे नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष जोर्गन वॅटने फ्रायडनेस यांनी सांगितले. येथेच ट्रम्प यांचा स्वप्नभंग झाला.

Editorial Team

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

3 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

4 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

4 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

4 days ago