हल्लीचा काळ झपाट्याने बदलतो आहे. कालपर्यंत संगणक, महासंगणक याला तंत्रज्ञानाच्या युगात श्रेष्ठ स्थान होते. आज त्याची जागा कृत्रिम बुद्धिमत्तेने (एआय) घेतली आहे. आज एआयचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये होऊ लागला आहे, ज्यामुळे घंटोका काम मिनीटो में होऊ लागले आहे. काळागणिक मानवाच्या राहणीमानातही बदल होत गेला. वाहतुकीची विविध साधने आल्याने जुनी बैलगाडी, टमटम यांसारखी वाहतुकीची साधने कालबाह्य झाली. बाजारात जाऊन आवश्यक वस्तूंची खरेदीही आता हळूहळू कमी होत चालली आहे. गरजेच्या सर्व वस्तू आता ऑनलाइन ऑर्डर करून घरपोच मागवल्या जाऊ लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांत माणसाच्या पोषाखांतही कमालीचा बदल झालेला दिसून येतो. प्रत्येकाच्या हातात मोबाइल आल्यामुळे तर मानवाचा समाजाशीही हळूहळू संबंध तुटू लागला आहे. शहरासारख्या ठिकाणी धावपळीच्या जीवनाचा प्रभाव आता सण-उत्सव साजरे करण्यावरही होत चालला आहे.
पूर्वी दसरा झाला की, दिवाळीच्या स्वागताची तयारी सुरू होत असे. अख्खे घर झाडून त्याला रंगरंगोटी केली जात असे. घरातील बच्चेकंपनीपासून वयोवृद्धही आपापल्या परीने या मोहिमेत उत्साहाने सहभागी होत असत. साफसफाई झाली की, घराघरांतून दिवाळीच्या फराळाचे सुगंध येऊ लागत. या फराळ बनवण्याच्या प्रक्रियेतही घरातील समस्त मंडळी आपापल्या परीने सहभागी होत असत. घरातील कर्त्या पुरुषाचा बोनस झालेला असायचा, मग टेलरकडे जाऊन नवीन कपडे शिवण्यासाठी माप दिले जाई. कंदिलासाठी काठ्या गोळा करून सुरीने तासून आणि मापात कापून त्यापासून आकाशकंदील बनवला जाई किंवा माळ्यावर ठेवलेला कंदिलाचा जुना सांगाडा काढून त्याला नवीन कागद लावला जाई. घरातील महिलावर्गाची रांगोळ्यांची विशेष तयारी चालू असायची. ठिपक्यांच्या रांगोळीसाठी कागदावर मापात रेषा आखून अगरबत्तीच्या सहाय्याने त्यावर छिद्रे पाडले जात. गेल्या वर्षीचे शिल्लक रंग आणि रांगोळी यांचा अंदाज घेऊन नवीन रंग खरेदी करण्याचा बेत आखला जात असे. चार दिवसांत दारात कोणत्या चार रांगोळ्या काढायच्या, त्या वहीच्या पानावर पेन्सिलने काढून त्यात रंग कोणते भरायचे, हेही निश्चित केले जात असे. बच्चेकंपनी मातीचे किल्ले बनवण्याची तयारी करत. त्यासाठी आवश्यक साहित्याची जमवाजमव केली जात असे. आपण बनवलेला किल्ला इतरांपेक्षा अधिक उठून कसा दिसेल, याची आगळी चढाओढ चालत असे.
नरक चतुर्दशीच्या पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करायचे म्हणून त्याची तयारी आदल्या संध्याकाळपासूनच केली जात असे. घरातील गृहिणी घरीच उटणे बनवत असे. दिवाळीच्या गुलाबी थंडीत पहाटे लवकर उठून अंगाला सुगंधी तेल आणि उटणे लावून आंघोळ करण्यात आणि त्यानंतर अंगठ्याने नरकासुराचे प्रतीक म्हणून अंगठ्याने कारेटे फोडून त्याची कडुशार बी जिभेवर ठेवण्यात वेगळीच मौज असे. दिवाळीच्या पहिल्या आंघोळीची सर वर्षभरात पुन्हा कधीच अनुभवाला येत नसे.सहामाही परीक्षा संपून बच्चेकंपनीला दिवाळीची सुट्टी लागलेली असायची. सुट्टी पडल्यावर सर्वप्रथम मुले शाळेत शिकवल्यानुसार शुभेच्छापत्र बनवायची आणि या शुभेच्छापत्रांवर दिवाळीच्या शुभेच्छांसह आपुलकीचा संदेश लिहून ती पोस्टाने आपल्या आप्तेष्टांना आणि मित्रमंडळींना पाठवत. घरी बनवलेल्या फराळाच्या विविध पदार्थांची शेजार्यापाजार्यांकडे देवाणघेवाण व्हायची. घरोघरी जाऊन मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जात असत.
आता मात्र चित्र बदलले आहे. शहरासारख्या ठिकाणी घरातील स्त्री-पुरुष दोघेही नोकरी-व्यवसायानिमित्त प्रतिदिन घराबाहेर पडत असल्याने दिवाळीच्या तयारीवर आणि सण साजरा करण्यावर ऑनलाइनचा आणि रेडिमेडचा प्रभाव दिसू लागला आहे. अनेक घरांत माणसे बोलावून घराची साफसफाई आणि रंगरंगोटी केली जाते. दारात रांगोळी काढण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने किंवा रांगोळी काढण्याची कला अवगत करण्यासाठी कधी प्रयत्नच न केल्यामुळे रांगोळीचे स्टिकर्स लावले जातात किंवा रांगोळीसाठी तयार छाप वापरले जातात. वाढती मागणी लक्षात घेऊन रांगोळ्यांचे विविध आकाराचे छाप आता बाजारातही मिळू लागले आहेत. कंदीलही रेडिमेड विकत आणून दारावर लावले जाऊ लागले आहेत. मातीच्या पणत्यांची जागा आता विजेच्या तोरणांनी घेतली आहे. दैनंदिन कामाच्या दगदगीत फराळ तरी केव्हा बनवणार? त्यामुळे दिवाळीसाठीचा फराळही रेडिमेड विकत आणला जाऊ लागला आहे. लोकांची वाढती मागणी लक्षात घेऊन रेडिमेड फराळाच्या उद्योगालाही गती मिळू लागली आहे. विकत आणलेला फराळ बेताचाच असल्याने आणि तो रेडिमेड असल्याने शेजारीपाजारी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ऐन दिवाळीतही टेलर्सची दुकाने ओस पडू लागळी आहेत, रेडिमेड कपड्यांचा प्रभाव वाढल्याने सराईत टेलर्सनीसुद्धा टेलरिंग सोडून रेडिमेड कपड्यांच्या अल्ट्रेशनला सुरुवात केली आहे. भाऊ बहिणींना भाऊबीजेच्या निमित्ताने दिल्या जाणार्या भेटवस्तूसुद्धा त्यांना भाऊबीजेच्या आधीच मिळू लागल्या आहेत. त्यामुळे यंदा दादा ताईकडून काय भेटवस्तू मिळणार याबाबतची उत्सुकताच संपून गेली आहे. हल्ली तर किल्ले, शुभेच्छापत्रे रेडिमेड मिळू लागली आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आल्याने आता शुभेच्छांची देवाणघेवाणही व्हॉट्सअॅपवर होऊ लागली आहे. इतर सुट्यांप्रमाणे दिवाळीलाही लोक उशिरा उठू लागले आहेत. त्यामुळे अभ्यंगस्नान तर बाजूलाच राहिले. शहरातील लोकांचे राहणीमान उंचावल्याने पूर्वी ज्याप्रकारे दिवाळी श्रीमंतांच्या घरी साजरी होत असे तशी आता चाळीचाळींतूनही ती साजरी होऊ लागली आहे. कामाच्या व्यापामुळे व वेळेच्या अभावामुळे आताच्या पिढीला दिवाळीची सारी सिद्धता करण्यास वेळ मिळत नसेलही मात्र, रेडिमेडच्या नादात दीपावलीचा खरा आनंद आपण गमावत आहोत. धकाधकीच्या जीवनातही काही मंडळी आपली संस्कृती जोपासत आहेत, परंपरांचे पालन करत आहेत. मात्र, भावी पिढी ही परंपरा पुढेही चालवतील का? की करिअरच्या नादात आपल्या संस्कृतीला विसरतील, हाही एक प्रश्न आहे. हिंदू धमीर्र्यांनी काळानुसार आपल्या परंपरांत, चालीरीतींमध्ये बदल केलेला आहे. मात्र, आपण आपल्या संस्कृतीशी जेवढी तडजोड करू तेवढे खर्या आनंदापासून दूर जाऊ, हेही तितकेच सत्य आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…