नाशिक : प्रतिनिधी
नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून, शहरात तब्बल 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू असल्याने ‘गंगापूर’सह जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. परिणामी, गोदावरी नदीला मोठा पूर आला असून, रामकुंड, दुतोंड्या मारुती, नारोशंकर मंदिर, सुंदरनारायण मंदिर परिसरासह नदीकाठचा विस्तृत भाग पाण्याखाली गेला आहे. गोदावरीची पूरस्थिती सलग दुसर्या दिवशीही कायम असून, दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आहे. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर ठेवली आहे.
सततच्या पावसामुळे गंगापूर, कडवा, दारणा, भाम, वालदेवी, भावली, पुणेगाव, भोजापूर आदी धरणांमध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे धरण प्रशासनाकडून परिस्थितीनुसार विसर्गात सातत्याने बदल करण्यात येत आहेत. काही तासांतच जवळपास दहा हजार क्यूसेकने विसर्ग वाढल्याने गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले. नदीचा वेग प्रचंड वाढल्याने रामकुंडातील सर्व घाट, पायर्या आणि नदीकाठची अनेक प्राचीन मंदिरे पूर्णपणे पाण्याखाली गेली. नदीपात्रातील पाणी वेगाने वाहत असल्याने घाट परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पूरस्थितीमुळे शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले असून, काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने नदीकाठच्या सर्व संवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. होळकर पूल, व्हिक्टोरिया पूल, रामसेतू, रामकुंड तसेच इतर घाट परिसरात बॅरिकेड्स उभारून नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात येत आहे. बचाव पथके आणि आपत्कालीन यंत्रणाही सतत सज्ज ठेवण्यात आली आहेत.
मात्र, गोदावरीचा महापूर पाहण्यासाठी शहरातील विविध पुलांवर आणि घाट परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली. विशेषतः होळकर पूल, व्हिक्टोरिया पूल आणि रामसेतू परिसरात पूर पाहण्यासाठी व छायाचित्रणासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमले होते.
त्यामुळे काही काळ वाहतुकीवरही ताण निर्माण झाला.
पोलिसांनी वारंवार सूचना देत नागरिकांना पुलांवर थांबू नये, सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्यासाठी जीव धोक्यात घालू नये आणि नदीपात्रापासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन केले.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, नदीपात्र, घाट आणि पुलांवर अनावश्यक गर्दी टाळावी तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे. पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने पूरस्थितीवर चोवीस तास लक्ष ठेवण्यात येत असून, आवश्यकतेनुसार तातडीच्या उपाययोजना करण्यात
येत आहेत.
होळकर पुलावरील विसर्गाचा आलेख
सायं. 6 वा. 18,232 क्यूसेक
पहाटे 4 वा. 27,747 क्यूसेक (विक्रमी विसर्ग)
धोकादायक पातळी 1846.20 फूट
गोदावरीतील सर्वाधिक ऐतिहासिक विसर्ग 62 हजार क्यूसेक
2008 मधील विसर्ग 42 हजार क्यूसेक
धरणांमधून सुरू असलेला विसर्ग
गंगापूर 15,394 क्यूसेक
कडवा 15,780 क्यूसेक
दारणा 16,958 क्यूसेक
भावली 2,500 क्यूसेक
पालखेड 310 क्यूसेक
पुणेगाव 1,748 क्यूसेक
वालदेवी 2,832 क्यूसेक
भाम 6,138 क्यूसेक
भोजापूर 2,800 क्यूसेक
होळकर पूल 18,232 क्यूसेक
गौतमी गोदावरी 1,000 क्यूसेक
नांदूर-मध्यमेश्वर बंधारा 94,497 क्यूसेक
धरण स्थिती टक्केवारी
गंगापूर 98.26
गौतमी गोदावरी 95.34
भावली 100
वालदेवी 100
भाम 100
भोजापूर 100
हरणबारी 100
केळझर 100
ओझरखेड 89
118 mm of rainfall in 24 hours; record discharge of 27,747 cusecs from Holkar Bridge at dawn.
- डॉ. मुक्तेश्वर मुनशेट्टीवार भारताची अध्यात्मिक व धार्मिक परंपरा, संस्कृतीची विविधता आणि सामाजिक सलोखा यांचे…
- अश्विनी पांडे पार्किंग मार्चपर्यंत, प्रमुख महामार्गांची कामे मेअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सिंहस्थाच्या प्रत्येक कामासाठी…
ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबूलवर कब्जा मिळवून अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत केली होती. या घटनेला पाच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही खात्याच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलण्याचा किंवा त्यात थेट हस्तक्षेप करण्याचा…
आदिवासी विकास विभाग : ‘पवित्र’ पोर्टलवरून शंभर टक्के पदे भरली जाणार नाशिक : प्रतिनिधी महाराष्ट्र…
पंचवीस वर्षांपासून शेतकर्यांवर अन्याय, नुकसान होणार नाही; आयुक्तांचे आश्वासन नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थसाठी 2002 मध्ये…