चांदवडच्या विद्यार्थिनीचा आत्महत्येचा इशारा; दिरंगाईचा कळस
चांदवड : वार्ताहर
आधार माझी ओळख, अशी जाहिरात केंद्र सरकारकडून वारंवार केली जाते. मात्र, चांदवड तालुक्यातील 15 वर्षीय विद्यार्थिनीसाठी हेच आधार कार्ड गेल्या 12 वर्षांपासून अनोळखी ठरले आहे. आधार कार्ड नसल्यामुळे शिक्षण, रेशन आणि बँक खात्यापासून वंचित राहिलेल्या अनुष्का आप्पासाहेब शिरसाठ या विद्यार्थिनीने अखेर संताप व्यक्त करत ‘आठ दिवसांत न्याय न मिळाल्यास आत्महत्या करेन,‘ असा हृदयद्रावक इशारा प्रशासनाला दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
देवरगाव (ता. चांदवड) येथील रहिवासी अनुष्का शिरसाठ (वय 15, रा. चांदवड) ही इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. तिची जन्मतारीख 2 नोव्हेंबर 2011 आहे. तिने लहानपणीच आधार नोंदणी केली होती. मात्र, तांत्रिक कारणास्तव तिचे आधार कार्ड कार्यान्वित नसल्याचे समोर आले. गेल्या 12 वर्षांपासून अनुष्का व तिचे कुटुंबीय हे कार्ड अपडेट करण्यासाठी स्थानिक आधार केंद्रांपासून ते तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि अगदी मुंबईतील आधार मुख्य कार्यालयाकडेही पाठपुरावा करत आहेत.
प्रत्येक वेळी तिचे हाताचे ठसे घेऊन ‘15 दिवसांत आधार कार्ड येईल,‘ असे आश्वासन दिले जाते. मात्र, प्रत्यक्षात अद्याप तिला आधार कार्ड मिळालेले नाही. आधारअभावी रेशन, बँक खाते आणि शालेय प्रवेशासाठी तिच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
भविष्याची टांगती तलवार
अनुष्का सध्या नववीत असून, पुढील वर्षी ती दहावीच्या वर्षात प्रवेश घेणार आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी आणि पुढील उच्च शिक्षणासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. जर वेळेत आधार कार्ड मिळाले नाही, तर तिचे एक महत्त्वाचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ‘जर मला आधार कार्डविना शिक्षण आणि जगण्याचा अधिकारच मिळणार नसेल, तर मी स्वतः आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही,“ असे तिने सोमवारी प्रशासनाकडे सादर केलेल्या लेखी निवेदनात व्यथित होऊन नमूद केले आहे.
प्रशासकीय टोलवाटोलवी
अनुष्काने आधार कार्डसाठी चांदवड तालुक्यातील जवळपास सर्वच केंद्रांवर वारंवार चकरा मारल्या. प्रत्येक वेळी तांत्रिक त्रुटींचे कारण सांगून तिची बोळवण करण्यात आली. इतक्या वर्षांच्या धावपळीनंतरही पदरी केवळ निराशाच आल्याने तिने हा टोकाचा पवित्रा घेतला आहे. 12 वर्षे सतत प्रयत्न करूनही हक्काचे ओळखपत्र मिळत नसल्याने प्रशासकीय कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
प्रशासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम
अनुष्काने काल उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालय, चांदवड येथे अर्ज सादर करून आपला आक्रोश मांडला. “येत्या आठ दिवसांत मला न्याय मिळावा, अन्यथा माझ्या जीवाचे काही बरे-वाईट झाल्यास त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील,“ असा थेट इशारा तिने दिला आहे. या अर्जाची प्रत तिने सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियालाही माहितीसाठी दिली आहे. या संवेदनशील प्रकरणाची प्रशासन आता गांभीर्याने दखल घेणार का, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
12 years of exile for Aadhaar card
मालेगाव : प्रतिनिधी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचारवर्षीय बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण खूनप्रकरणी येथील…
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…