महाराष्ट्र

दमणगंगा-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्पासाठी 13,497 कोटी

5.5 टीएमसी पाण्यामुळे सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

सिन्नर : प्रतिनिधी
अवर्षणग्रस्त सिन्नर तालुक्याला वरदान ठरणार्‍या बहुप्रतीक्षित दमणगंगा-वैतरणा-गोदावरी (कडवादेव) नदीजोड प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात 13 हजार 497 कोटींंची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.6) ही घोषणा केल्याने सिन्नरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकल्पातून सिन्नर तालुक्यासाठी 5.5 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होईल.

गेल्या 14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नातून हा निर्णय झाला होता. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. दादांच्या पश्चात या प्रकल्पासाठी निधी मिळणार की नाही, याकडे सिन्नरकरांचे लक्ष लागले होते. मात्र, अर्थसंकल्पात तरतूद झाल्याने हा प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून या प्रकल्पासाठी आमदार कोकाटे प्रयत्नशील होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचाळे येथे झालेल्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेस मान्यता देण्याचा शब्द सिन्नरकरांना दिला होता. राज्य शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याशिवाय प्रकल्प पूर्णत्वास जाणे शक्य नव्हते. आता अर्थसंकल्पात निधीची तरतूद झाल्याने सिन्नरच्या दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली
जात आहे.
कडवा धरणातून सिन्नर तालुक्यासाठी राखीव असलेले सुमारे 5.5 टीएमसी पाणी बोरखिंड येथील प्रस्तावित धरणात कोळवाल नाल्याद्वारे सोडले जाईल. तेथून पाइपलाइनद्वारे सोनांबे येथे देवनदीत पाणी सोडण्यात येईल. देवनदीतील हे पाणी उजव्या कालव्याद्वारे सोनांबे, सोनारी, डुबेरे, पाटोळे, गोंदे, दापूर, नांदूर शिंगोटेपर्यंत पोहोचेल. डाव्या कालव्याद्वारे सोनांबे, खापराळे, माळेगाव, ढग्याडोंगर, सुळेवाडी, पाटपिंप्री, गुळवंचमार्गे वडांगळीपर्यंत पाणी नेले जाईल. याशिवाय खापराळे परिसरातून वडगाव-पिंगळा, चिंचोली, वडझिरे, नायगाव, जायगाव या शिवारातही पाणी पोहोचणार आहे. देवनदीवरील कुंदेवाडी, सायाळे व खोपडी, मिरगाव, पूरकालवे तसेच सेकंड क्लास कालव्यांद्वारे तालुक्यातील बहुतांश भाग सिंचनाखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील दोन्ही औद्योगिक वसाहती आणि मुंबई-दिल्ली औद्योगिक कॉरिडॉरसाठी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. औद्योगिक पाण्याचा पुनर्वापर करून शेतीसाठीही उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काळात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. आता निधीची तरतूद झाल्यामुळे भविष्यात सिन्नरमध्ये बारमाही सिंचनासह टँकरमुक्तीचा मार्ग मोकळा होईल. लवकरच या कामाचे टेंडर निघेल. चार वर्षांत टप्प्याटप्प्याने या प्रकल्पासाठी निधी मिळणार आहे आणि काम पूर्ण होणार आहे. यामुळे संपूर्ण सिन्नर तालुका सिंचनाखाली येणार आहे. – माणिकराव कोकाटे, आमदार, सिन्नर

चार धरणांची होणार उभारणी

या नदीजोड प्रकल्पाद्वारे पश्चिम वाहिनी नद्यांचे 7.14 टीएमसी पाणी वळविण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा परिसरातून हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. दमणगंगा उपखोर्‍यातील वाल नदीवर निलमाती, वाघ नदीवर मेट, वैतरणा उपखोर्‍यात पिंजाळ नदीवर कोशिम शेत आणि गारगाई नदीवर उधळे, अशी चार धरणे उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पातील धरणे, वितरण व्यवस्था तसेच रोहित्र व उपकेंद्रांच्या संरक्षणासाठी सुमारे 1280.5 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. या योजनेतून तब्बल 17,960 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, औद्योगिक पाण्याचे शुद्धीकरण करून एकूण सुमारे 20 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे शासनाचे नियोजन आहे.

असा आहे नदीजोड प्रकल्प

समुद्राला वाहून जाणारे गारगाई, दमणगंगा आणि वैतरणा या पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी चार धरणांद्वारे अडवले जाणार आहे. यातील 20 टक्के पाणी स्थानिक शेतकर्‍यांसाठी राखीव ठेवण्यात येईल, तर उर्वरित पाणी उपसा पद्धतीने वैतरणा धरणात सोडले जाईल. तेथून कॅनॉल किंवा पाइपलाइनद्वारे हे पाणी कडवा धरणात आणले जाईल.

13,497 crores for Damanganga-Vaitarna-Godavari river linking project

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

स्वच्छता ही सेवा अभियानात सात टन कचरा संकलित

पालकमंत्री महाजनांसह महापौर आडके मोहिमेत सहभागी नाशिक : प्रतिनिधी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत विशेष स्वच्छता…

7 hours ago

रिंगरोडबाधित शेतकर्‍यांचा प्रशासनावर संताप

तीन तास पालकमंत्र्यांची प्रतीक्षा; भूसंपादन दरावरून आक्रमक भूमिका नाशिक : प्रतिनिधी रिंगरोड भूसंपादनामुळे बाधित शेतकरी…

7 hours ago

‘अग्निशमन’च्या वाहनांना जीपीएस यंत्रणा

ई-फायर सॉफ्टवेअरची अंमलबजावणी नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागातील सर्व सेवांचे डिजिटायझेशनचे काम केले…

7 hours ago

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत घुमणार खा. वाजेंचा आवाज

अमेरिकेत करणार देशाचे प्रतिनिधित्व, राज्यातून एकमेव खासदार नाशिक : प्रतिनिधी नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ…

7 hours ago

इगतपुरी शहरात स्वच्छतेसह 500 रोपांची लागवड

महात्मा गांधी जयंतीनिमित्त नगरपालिकेतर्फे सेवा संकल्प अभियान इगतपुरी : प्रतिनिधी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त…

8 hours ago

पावसाचा खंड, अघोषित भारनियमन अन् कमी दाब

विहिरीत पाणी असूनही विजेविना पिके करपण्याच्या मार्गावर दिक्षी : वार्ताहर पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप…

8 hours ago